यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८७

प्रवासचिंतने

नद्यांप्रमाणेच डोंगरद-या, अरण्ये, प्रेक्षणीय स्थाने यांचे असे मनस्वी आकर्षण असल्यामुळेच प्रवासाचे निमित्त कोणतेही असो, नव्या प्रदेशातल्या निसर्गाशी व तिथल्या इतिहासवास्तूंशी संवाद साधल्यावाचून यशवंतरावांना चैन पडत नसे.  प्रवासाच्या निमित्ताने केलेल्या भ्रमंतीत मनावर कायमची मुद्रा उमटवून गेलेल्या कित्येक प्रसंगांची नोंद यशवंतरावांनी करून ठेवली आहे.  त्या सर्व नोंदी ओळीने वाचल्यास यशवंतरावांची प्रतिभा त्यातून दिसून येते.  समोर डोळ्यांना दिसत असलेला प्रसंग छायामुद्रकाच्या तटस्थतेने न टिपता तो आपल्या भावविश्वाच्या मुशीत घालून यशवंतराव त्याला लेखणीतून आविष्कृत करतात, असे वाटते.  त्यामुळे ते जे लिहितात, ते केवळ प्रवासवर्णन न राहता प्रवासचिंतन होऊन जाते.  उंच डोंगरावरून पायथ्याशी असलेल्या शेतांकडे पाहताना डोळ्यांना दिसणा-या दृश्याच्या पल्याड त्यांच्या मनाची झेप जाते आणि ते लिहून जातात :

''सृष्टीच्या रूपाने अशा वेळी मला वारक-यांचेच दर्शन घडायचे... ... पताका, गळ्यातला वीणा, खांद्यावरची पडशी, हातांतले टाळ, गळ्यातली माळ; डोक्यावर मुंडासे.... पाहताक्षणी निरागसता लक्षात यावी; पवित्र वाटावे, अशी सगळी ठेवण.  डोंगरावरून शेताचे, सृष्टीचे दर्शन असेच व्हायचे.  जीवनातले ते सुगीचे दिवस वाटत असत.'' (कित्ता, १०२).

ऐतिहासिक वास्तू पाहताना तिच्या ललाटावरचे लेख वाचण्याचा यशवंतराव प्रयत्न करतात.

''मानवमात्राच्या ललाटाप्रमाणे अशा वास्तूंच्या ललाटावरही सटवाई काही लिहून जात असली पाहिजे.'' अशी त्यांना खात्री असते.

या वास्तूंच्या ललाटानुसार माणसांचा इतिहास घडतो, की माणसांच्या ललाटानुसार वास्तूंचा, हे नक्की सांगता येत नसले, तरी ''त्या दोन्हींचा काही तरी आंतरिक संबंध असला पाहिजे खास !''  अशी ग्वाही त्यांचे मन त्यांना देते.  ते म्हणतात,

''ऐतिहासिक वास्तूच्या छायेत जेव्हा मी जातो, तेव्हा तो वास्तुपुरुष हसू लागतो.  आनंदाने, भेसूरपणाने !  काळाचा पडदा बाजूला सारून सोन्याच्या टाकाने लिहिलेला वेभवशाली इतिहास वाचताना त्याला आनंदाचे भरते येते आणि मळलेली भाग्यरेखा दाखवताना तो भेसूर हसतो.  तो सांगतो, रत्नजडित सिंहासनावर आरूढ झालेला मी- आज हा असा आहे पडलेला, पिचलेला, जळमटलेला !  ते पाहताना अंतःकरण विदीर्ण होते.'' (कित्ता १२४).

वाचनातून झालेले वाङ्मयीन संस्कार, उपजत लाभलेले संवेदनक्षम मन व सूक्ष्म दृष्टी आणि आपपरनिरपेक्ष तादात्म्यबुद्धी या गुणांमुळे यशवंतरावांची प्रवासवर्णनात्मक टिपणे अत्यंत वेधक उतरली आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org