यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८६

भारताबद्दल ते लिहितात :

''खरोखरच हा एक अलौकिक देश !  निसर्ग चमत्काराच्या अनेक गुहा आणि लक्ष्मीच्या अनेक खाणी असलेली ही भूमी, सिद्धांचा आणि सिद्धांतांचा परिमल येथील दर्याखोर्यांत अखंड दरवळत राहिलेला आहे.  सज्जनांचा जिव्हाळा आणि सरस्वतीचे सौंदर्य या भूमीला जसे लाभले आहे, तसे तिच्या सद्गुणाला चांगुलपणाचे तेज आहे.  भव्यत्व आणि दिव्यत्व यांनी इथे परिसीमा गाठली आहे.'' (कित्ता).

प्रीतिसंगमातून त्यांना एक तर एकजिनसी मनुष्यजीवनाच्या आदर्शाचा साक्षात्कार होत असे आणि दुसरे म्हणजे आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींचा सहवास आठवे.  कामाच्या रगाड्यात मनाला क्षणाचीही उसंत मिळाली, की यशवंतराव या परिसराची स्मरणसाखळी मनातल्या मनात ओढीत असावेत, असे दिसते.  सर्व कामांतून सवड काढून कर्हाडच्या प्रीतिसंगमावर काही काळ निवांतपणे घालवावा, अशी इच्छा त्यांच्या मनात वारंवार उसळून येत असे.  तिथे जाऊन आले आणि घरच्या मंडळींच्या प्रेमळ सहवासाच्या आठवणींच्या सहवासात, मनाने का होईना, राहून आले, की त्यांना जणू कामाचा नवा हुरूप येत असे.

जगात जिथे जिथे ते कामानिमित्त गेले, तिथल्या नद्यांच्या ते प्रेमात पडले होते.

''सागराचा प्रचंड जलाशय पाहून मन प्रसन्न होते, हे तर खरेच; पण नद्यांचे काठ मला त्यापेक्षाही सुंदर दिसतात.  नदीची मला फार भुरळ पडते.  मी नदीकाठचा आहे, त्याचा हा परिणाम असेल कदाचित.'' (कित्ता, ११०) अशा शब्दांत ते आपली भावना व्यक्त करतात.  हिंदूंना नद्या पवित्र वाटतात, पण त्या केवळ धार्मिक अर्थाने, यशवंतराव मात्र त्यांना भौतिक अर्थानेच पवित्र समजतात, म्हणून धर्माच्या नावाने पूजा करून एरव्ही नदीकाठांना गलिच्छ ठेवणा-या हिंदूंपेक्षा नदीकाठांची नीट निगा घेणारे परकीय लोक त्यांना विशेष आवडतात.

नदी ही त्यांना माताच वाटते.  आणि माती व माता यांच्याशी एकरूप होणे हा तर त्यांचा जन्मजात स्वभावच होता; जीवनविषयक समर्पणाचे सारे तत्त्वज्ञान आपल्याला माती आणि माता यांच्या सहवासात लाभलेल्या साक्षात्कारातून झाले आहे, अशी त्यांची धारणा होती.  कृष्णामाई किंवा गंगायमुनाच नाही, तर थेट वोल्गाच्या काठी गेल्यावरही आपली भावसमाधी लागल्याची आठवण त्यांनी नमूद केली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org