यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८४

शब्दचमत्कृती व कल्पना-चमत्कृतीतून खांडेकरांच्या कादंब-यांकडे संस्कारक्षम वयातच आकर्षित झालेले यशवंतराव पुढे त्यांच्या कादंब-यांमधील सामाजिक आशयामुळे लुब्ध होतात.  १९३० ते १९४० या काळातील खांडेकरांच्या लेखनात मराठी जीवनाचे आणि विशेषतः निम्न मध्यमवर्गीय जीवनातील संघर्षाचे जे चित्रण आहे, ते यशवंतरावांना मराठी मनाचे समर्पक चित्रण वाटते.  वरिष्ठ मध्यमवर्गाची नजर ऊर्ध्वगामी, तर कनिष्ठ मध्यमवर्गाची अधोगामी असते, जो आपल्यापेक्षा गरीब व दुबळा आहे, त्याच्या दुःखांना वाचा फोडण्याचा प्रयत्न कनष्ठ मध्यमवर्ग करतो.  खांडेकर या वर्गाला आपला मुख्य लेखनविषय करतात आणि त्याचे हुबेहूब आविष्करण करतात, हीच त्यांची खरी थोरवी यशवंतरावांना वाटते.  खांडेकरांची 'जीवनासाठी कला' ही भूमिका यशवंतरावांना पटते.  खांडेकरांचे साहित्य मराठी जीवनाचे असले, तरी भाषांतरित स्वरूपात त्याचा आस्वाद सबंध देशभरातले वाचक घेऊ शकतात, यामागच्या रहस्याची उकलही यशवंतरावांनी केली आहे.  त्यांच्या मते 'दोन ध्रुव'सारख्या कादंबरीतील पात्रे मराठी असली, तरी सामाजिक विषमतेचा तिचा आशय आणि तिने स्पर्श केलेल्या मूलभूत मानवी भावना सार्वत्रिक असतात आणि म्हणून ती कोणत्याही प्रदेशातल्या वाचकांना भिडते.

माडखोलकरांच्या निमित्ताने लिहीत असताना यशवंतरावांनी मराठीतील राजकीय कादंबरीविषयी फार मौलिक विचार मांडले आहेत.  माडखोलकरांनीच प्रथम मराठीत राजकीय कादंबरी लिहिली.  त्यांच्यानंतर आणखी काहींनी तो प्रयत्न केला; ''परंतु त्यांच्या राजकीय कादंबरीला मागे टाकील, अशी राजकीय कादंबरी अद्याप पहायला मिळायची आहे'' ('ॠणानुबंध' : २५२) माडखोलकरांच्या राजकीय कादंब-या मौलिक ठरण्याचे कारण सांगताना यशवंतराव पुढे म्हणतात, ''त्यांना स्वतःला राजकारणात फार रस होता.  राजकारणातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.  कलाविषयक लेखनाला लागणारी अनुभूतीची जोड त्यांना सहजप्राप्त होती.  शिवाय तपशिलाचा अभ्यास करून मगच विषयाला हात घालण्याचा शिरस्ता त्यांनी पाळला होता'' (कित्ता, २५४).  अन्यत्र याच विषयासंबंधी बोलताना राजकारणाचे मराठी कादंब-यांतील चित्रण अतिशय अपुरे व फसवे असल्याचे सांगून 'सिंहासन' व 'जनांचा प्रवाहो चालिला' या कादंब-यांचा निर्देश केला होता.  ते म्हणतात, ''अरुण साधूंच्या 'सिंहासन' या कादंबरीत मला प्रचाराचा वास येतो.  राजकीय कादंब-या लिहिण्याचा साधूंचा प्रयत्न आहे.  पण त्यांचा थाट प्रचारकी आहे.  'सिंहासन' कादंबरीपेक्षा 'रिपोर्टिंग वाटते.  'जनांचा प्रवाहो चालिला'.... हे पुस्तक निकृष्ट (थर्ड ग्रेड) आहे'' ('पुस्तक पंढरी', दिवाळी अंक १९८३, ३५).  यशवंतरावांच्या मते देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या प्रेरणांशी सहानुभूती नसलेले, जागतिक राजकारणातील वेगवेगळे प्रवाह ठाऊक नसलेले, केवळ आपले गाव किंवा आपली गल्ली यातच रममाण होणारे लेखक जेव्हा राजकीय कादंब-या लिहिण्याचा आटापिटा करतात, तेव्हा त्यांच्या त्या कादंब-या पूर्वग्रह व गैरसमज यांना बळी पडल्यावाचून राहत नाही (कित्ता).

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org