यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८

नेतृत्व-संगोपन

देवराष्ट्र हे यशवंतरावांचे जन्मगाव आणि आजोळ.  लक्षावधी गरीब कुटुंबांतील मुलांचे असते, तसेच बालपण त्यांच्याही वाट्याला आले होते.  शहरी उच्चवर्णीयवर्गीय घरांतल्या मुलांना आपापतःच संभाषणचातुर्य, सभाधीटपणा व बहुश्रुतता येते, ती कौटुंबिक संस्कारांतून यशवंतरावांसारख्या खेडुताच्या मुलाला मिळणे दुरापास्तच होते.  पण ते नसले, तरी जमेच्या इतर ब-याच बाजू आपल्यापाशी आहेत, याचे भान ठेवल्यामुळे त्यांच्यासारख्या पर्यावरणात वाढणा-या मुलाच्या ठिकाणी जो न्यूनगंड अपरिहार्यतः फोफावतो, तो यशवंतरावांनी कटाक्षाने दूर ठेवला.  ग्रामीण परिसराविषयीचे कुतूहल आणि जिव्हाळा, लहानपणी प्रत्यक्ष दारिद्रय व काबाडकष्टाचे ओढघस्ती जीवन जवळून पाहिल्यामुळे अशा स्तरातील व परिसरातील मुलां-माणसांबद्दलची आत्मीयता आणि या समाजाचे धुरीणत्व या समाजाशी जैविकरीत्या जोडल्या गेलेल्यालाच ख-या अर्थाने करता येऊ शकेल, असा आत्मविश्वास यशवंतरावांच्या मनात निर्माण झाला.  घरचे वातावरण सत्यशोधकी असल्यामुळे महार, मांग, चांभार, रामोशी, मुसलमान, धनगर, सणगर वगैरे भिन्न जातिधर्मीय मंडळीला मुक्तद्वार होते, याचा फार मोठा उदारमतवादी संस्कार बालपणीच घडला.  वडीलबंधू सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते असल्यामुळे सामाजिक प्रश्नांचा खल चालायचा.  त्यातूनही बरेच शिकता आले.

कराड येथे शिक्षणानिमित्त आल्यावर तर चौफेर वाचनाची नामी संधी मिळाली.  ब्राह्मणेतरांच्या वृत्तपत्रांप्रमाणेच इतरही वृत्तपत्रे वाचता आली.  चळवळींची तोंडओळख झाली.  सार्वजनिक कार्यात भाग घेता आला.  ग्रामीण संस्कृतीचा साक्षात आणि सखोल संस्कार आणि त्याच्या जोडीला हे चौफेर वाचन यातून खेड्यातल्या एका तरुणाचे रूपांतर स्वातंत्र्यसैनिकात होण्याची प्रक्रिया खास देशी पद्धतीने घडून येत होती.  पुढारीपणासाठी लागणारे गुण भोवतालच्या पर्यावरणातून त्यांना सहजोपलब्ध होत होते.  बाहेरच्या वृत्तपत्रांतून मिळणारे ज्ञान आणि घरीच असलेली ब्राह्मणेतर चळवळीची शिकवण यात कुठे तरी अंतर्विरोध आहे, असे यशवंतरावांना जाणवू लागले होते.  आपले बंधू गणपतराव यांच्याशी ते यासंबंधी सविस्तर चर्चा करीत.  

बंधूंनी यशवंतरावांना महात्मा फुल्यांचे चरित्र वाचायला दिले.  'महात्मा फुल्यांचा विचार मूलगामी आहे व तो काही नवीन दिशा दाखवतो आहे... त्यांनी उभे केलेले काही प्रश्न तर निरुत्तर करणारे होते.  शेतकरी-समाजाची होणारी पिळवणूक, दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजन-समाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडवल्याखेरीज देशाचे कार्य होणार नाही,' हा त्यांच्या विचारांचा सारांश.'  ('कृष्णाकाठ' ३४) यशवंतरावांच्या मनावर ठसला.  मात्र ते ब्राह्मणेतर चळवळीशी सहमत होऊ शकले नाहीत.  सत्यशोधकी तत्त्वज्ञानाची मूळ प्रेरणा रास्त असली, तरी ब्राह्मणविरोधात पर्यवसित झालेली ती चळवळ त्यांना आपली कधीच वाटली नाही.  जवळकरांनी 'देशाचे दुष्मन'मधून टिळकांवर केलेली टीका त्यांना पटली नाही.  इंग्रजांविरुद्ध लढणारे एक सेनापती अशी टिळकांविषयी भावना झालेल्या यशवंतरावांना टिळकांवर टीका करणारी माणसे इंग्रजांचे मित्र वाटू लागली.  त्यांचे मन त्या संकुचित संस्कारांमधून बाहेर ओढ घेऊ लागले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org