यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७८

नेहरूंची समाजवादाबद्दलची आस्था प्रामाणिक आणि आयुष्यभराची होती.  परिस्थितीवशात त्यांना त्यांचा समाजवाद पातळ करावा लागला असला, तरी त्याबद्दल आंतरिक हळहळ त्यांना वाटत असे.  श्रीमती गांधींबद्दल असे म्हणता येणार नाही.  क्रांतिकारक घोषणांचा व उपायांचा प्रचारार्थ जाणिवपूर्वक उपयोग करून घेणेच फक्त त्यांना अभिप्रेत होते.  बंगलोर अधिवेशनात श्रीमती गांधींच्या नावे जो आर्थिक कार्यक्रम मांडला गेला व ज्याचे ठरावरूपातील पौराहित्य यशवंतरावांनाच पार पाडावे लागले, हे इंदिराजींनीच पुढे म्हटल्याप्रमाणे आदल्या दिवशी 'सहज स्फुरलेले विचार (रॅण्डम थॉटस्) फक्त होते.  पुढे आणीबाणीत त्यांनी दिलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचेही स्वरूप असेच होते.  पण दरवेळी यशवंतराव आपल्या परीने या नवनव्या समाजवादी धोरणांचे प्रवत्तेफ्पण करीत राहिले.  प्रचारात्मक पातळीवर समाजवादी असणा-या घोषवाक्यांचा उद्धोष करीत राहिले.

''समाजवादी समाजव्यवस्थेच्या उभारणीसाठी जो लढा द्यावयाचा, त्याची ऐतिहासिक संधी सत्तरनंतरच्या दशकात चालून आली आहे, हे दशक आपल्याकडून आपल्या ध्येयांवर अविचल निष्ठा ठेवण्याची, धारिष्ट्याची व सर्व अडथळे पार करण्यासाठी लागणा-या निग्रहाची मागणी करीत आहे.  पण लढ्यातून काय निष्पन्न होणार, हे या महान व पुरातन देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक महत्त्वाचे आहे'' ('विण्डस् ऑफ चेंज', १६१) अशी आवाहने करीत राहिले.

यशवंतरावांच्या इंदिरा गांधींना मिळालेल्या या पाठिंब्यामध्ये प्रामाणिक गफलतींचा भाग किती आणि निरुपायास्तव केलेल्या आत्मवंचनेचा किती, हे आता सांगणे अवघड आहे.  परंतु समाजवादाच्या त्यांनी सांगितलेल्या स्थूल कल्पनेशीही श्रीमती गांधींचे व्यक्तिगत व सार्वजनिक आचरण व धोरण जुळत नाही, हे यशवंतरावांच्या इतक्या जवळूनही दिसत नसावे, यावर विश्वास ठेवणेही तितकेच अवघड आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org