यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७७

समारोप

''आपण समाजवादी आहात काय ?'' या पत्रकारांच्या प्रश्नाला यशवंतरावांनी ठाम होकारार्थी उत्तर देऊन ''पण माझा समाजवाद निराळा आहे'', हेही आवर्जून सांगितले आहे.  त्यांचा समाजवाद रॉय, मार्क्स, गांधी, लेनिन, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष वगैरेंपेक्षा निराळा होता हे समजू शकते; पण त्याचे त्यांनी सांगितलेले कारण मात्र पटू शकत नाही आणि त्यांच्या समाजवादाचा आशयही नीट हाती लागत नाही.  नव-समाजरचना अस्तित्वात आणण्याची आकांक्षा आपल्याला पाठ्यपुस्तकांतून मिळालेली नाही.  समाजवादावरचा आपला विश्वास आपण ज्यांच्यात जन्मलो, वाढलो, त्या कोट्यवधी देशबांधवांच्या दैन्य-दारिद्र्यातून प्रादुर्भूत झाला आहे.  कारण समाजवादच त्यांना त्यातून मुक्त करणार आहे (कुन्हीकृष्णन् ९) असे त्यांनी एका संदर्भात म्हटले आहे.  समाजवादाकडे त्यांचा असलेला स्वाभाविक कल त्यांच्या संस्कारक्षम वयात भोवताली असलेल्या परिस्थितीमुळे झाला होता.  हे यावरून समजू शकते.  पण समाजवादी विचारसरणी आत्मसात करून आचरणात आणण्याच्या दृष्टीने हा 'स्वाभाविक कल' पुरेसा ठरू शकत नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.  यशवंतरावांनी त्या स्वाभाविक कलाला वैचारिक परिबद्धतेची जोड दिली नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैगुण्य म्हणावे लागेल.

रॉय यांचे संस्कार त्यांनी वरवर व प्रसंगापुरतेच स्वीकारले.  अधिक खोलवर त्यांनी त्यांचा अंगीकार केला नाही, हे त्यांच्याच निवेदनांवरून स्पष्ट होते.  रॉय यांच्याकडून आपल्याला आर्थिक न्यायाची निकड पटली असली, तरी केवळ खाजगी मालमत्तेच्या निराकरणातून सामाजिक न्याय साध्य होऊ शकेल, असे कधीच वाटले नाही, हे चव्हाणांचे म्हणणे समजू शकते.  खाजगी मालमत्ता नष्ट झालेल्या देशात छळ व दमन झाले, हेही मान्य करायला हरकत नाही.  प्रश्न एवढाच पडतो, की नेहरूंनी ज्या लोकशाही समाजवादाचे प्रतिपादन केले होते, त्याच्याशी तरी बांधिलकी सत्तारूढ पक्षाने ठेवली होती काय ?  आणि ती ठेवलेली नाही, हे चव्हाणांनीच दिलेल्या कबुलायतींवरून जर स्पष्ट होते, तर अशा पक्षाला चिकटून राहण्यातून आपल्या दुःखदैन्यग्रस्त ग्रामीण देशबांधवांसाठी चव्हाणांनी काय मिळवले ?

समाजवादाची व्याख्या करण्याचा ज्या ज्या वेळी यशवंतरावांनी प्रयत्न केला, त्या वेळी लोककल्याणकारी राज्याच्याच कल्पनेपर्यंत त्यांची मजल गेलेली दिसून येते.  राज्य शासनाने केलेल्या कायद्यांमधून दिलेल्या सोयी-सवलती-संरक्षणे वगैरे लाभांमधून शोषितांना दिलासा मिळणे एवढेच कल्याणकारी उपायांचे प्रयोजन असते.  क्रांतिकारक समाजवादी परिवर्तनाच्या शक्यता अशा उपायांनी स्थगित होत असतात, हे चव्हाणांनी लक्षातच घेतले नव्हते, सत्तास्थानांपासून दूर राहूनही समाजवादी शक्ती बळकट केल्या जाऊ शकतात, हा पर्याय त्यांच्या राजकारणी मनाने कधी स्वीकारलाच नाही.  डाव्या-उजव्यांच्या तत्त्वशून्य तडजोडीचेच राजकारण ते जन्मभर करीत राहिले.  महाराष्ट्रात त्यांच्या पुरोगामी कायद्यांमधून व विकास-योजनांमधून सधन शेतकरी व शहरी भांडवलदारांची युती होऊन समाजवादाच्या शक्यता संपल्या, तर राष्ट्रीय पातळीवर नेहरूंच्या हयातीतील फक्त संकल्पनात्मक, तर इंदिरा गांधींच्या हयातीतील फक्त प्रचारमूल्यात्मक पातळीवर समाजवाद गाजत राहिला आणि यशवंतराव हे त्याचे मूक साक्षीदार व निमूट हस्तक ठरले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org