यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७६

समाजवाद हे एक सामाजिक-आर्थिक तत्त्वज्ञान असून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष दूर सारण्यासाठी ते अस्तित्वात आले आहे, असं सांगून 'व्यक्तीचे हितसंबंध सामाजिक कल्याणापेक्षा दुय्यम ठरवणे, आर्थिक विकासापेक्षा मानवी मूल्ये, मानवी प्रतिष्ठा व कल्याण यांना प्राधान्य देणे, विकासाचे अर्थकारण व सामाजिक न्यायाचे अर्थकारण यांचा समन्वय केला जाणे, आणि मुख्य म्हणजे आधुनिक, विवेकपूर्ण, समताधिष्ठित आणि मानवी स्वरूपाची समाजव्यवस्था उभी करणे' हा समाजवादाचा स्थूल अर्थ त्यांनी एका लेखात नमूद केला आहे. ('विण्डस् ऑफ चेंज', १५६).  ही समाजव्यवस्था पुरोगामी व भविष्यलक्ष्यी असणे; धर्म-जात-पंथ वगैरे आधारांनी उभ्या असलेल्या तटबंद्यांना तीत स्थान नसणे, इत्यादी गोष्टीही त्यांना अभिप्रेत होत्या.  मात्र हे अमूकच मार्गाने होईल, असे सांगता येणार नाही.  कारण इतिहास हा काही आंधळा पीर नाही.  प्रत्येक देशाला समाजवादाची स्वतःची व्याख्या करावी लागते.  इथेही ती प्रत्यक्ष अनुभवातून केली जाईल, असे त्यांचे प्रतिपादन होते.  आपण समाजवादाची फक्त भाषा करतो; पण त्या दिशेने ठोस वाटचाल मात्र करीत नाही, ही खंत त्यांनी आयुष्याच्या अखेरीपावेतो अनेकदा व्यक्त केली होती.  

समाजवादाचे समीकरण साम्यवादी देशांमधील लोकशाहीच्या संकोचाशी घालून आमचा समाजवाद लोकशाही मूल्यांची बूज राखील, असेही एक ठोक विधान चव्हाणांच्या भाषणांत वारंवार आले आहे.  १९६० च्या महाबळेश्वर शिबिरापासून नंतरच्या अनेक प्रासंगिक भाषणांमधून समाजवादासंबंधी विवेचन त्यांनी केले असले, तरी उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांत व अन्य भाषिक अलंकरणे यामुळे त्यांच्या मांडणीचे स्वरूप कमालीचे शब्दाळ, भोंगळ व पसरट होत असे.  उदाहरणार्थ, समाजवाद ही नुसती चर्चा करण्याची कल्पना उरली नसून, ती आता प्रत्यक्षात आणता यावी, लोकांना उपलब्ध करून देता यावी, ती तरुणांनी जगावी व संपादावी, अशी बाब झाली आहे..... थोडक्यात, समाजवाद हा जीवनमार्ग आहे.  (उद्धृत 'चव्हाण अभिनंदन ग्रंथ', ६७), तत्त्वज्ञानावर जास्त विसंबून न राहता व्यावहारिकदृष्ट्या जी गोष्ट योग्य दिसते, तीच करायची.  आकाशात भरा-या नकोत, जमिनीवर चालायचे आहे.  ('सह्याद्रीचे वारे', १०९), समाजवादी मूल्यांवर माझा विश्वास आहे, म्हणून मला आश्वासन द्यावयास हरकत वाटत नाही, की या योजनेच्या विकासाची जी गती आहे, ती पर्यायाने आपल्याला समाजवादाकडे घेऊन जाणारी आहे (कित्ता, १०७), आम्ही ग्रंथनिष्ठ नाही, मार्क्स आम्ही संपूर्ण सत्य समजत नाही (कित्ता, २३८).  समाजवादाचे आपले तरुणपणीचे रोमँटिक विचार परिस्थितीवशात व मंत्रिपदांच्या प्रत्यक्ष अनुभवांमुळे अधिक वस्तुनिष्ठ झाल्याचेही त्यांनी वारंवार सांगितले आहे.  समाजवाद न म्हणता समाजवादी समाजरचना असा शब्दप्रयोग करण्याचे स्पष्टीकरणही त्यांनी देशकालपरिस्थिती-विशिष्टत्वाशी सोडून दिले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org