यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७३

चव्हाणांचे संबंध नेहमीप्रमाणे दोन्ही अंतर्विग्रही गटांशी सलोख्याचे होते.  स्वतः ते पुरोगामी पक्षाचे होते.  तरीही प्रतिगामी पक्षांशी ते संवाद करु शकत असत.  बंगलोर अधिवेशनात पंतप्रधानांच्या टिपणात तरुण तुर्कांनी 'राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमाची रूपरेषा' मांडली, त्यात पुन्हा समाजवादी कार्यक्रमाचे अधोरेखन केले गेले होते.  इंदिरा गांधी त्या वेळी हजर नसल्यामुळे या कार्यक्रमाचे समर्थन-स्पष्टीकरण चव्हाणांनीच केले होते.  तरुण तुर्कांशी त्यांची वैचारिक जवळीक या काळात होती.  दोन्ही गटांना संमत व्हावा, असा तडजोड-मसुदा चव्हाणांनी तयार करून मांडला, तरी पण मोरारजींनी मोडता घातलाच, चव्हाण या प्रसंगी म्हणाले होते, की-

''निरनिराळ्या वर्गांच्या आपापसांतील संबंधात रचनात्मक बदल होणे समाजवादात गृहीत असते.  आणि ज्याअर्थी असे बदल भारतात आजपर्यंत झालेले नाहीत, त्याअर्थी नव्या प्रयत्नांची अजून गरज आहे.  पंतप्रधानांच्या टिपणात देशातील आर्थिक परिस्थितीचे प्रामाणिक मूल्यांकन असून राष्ट्राच्या अस्वस्थ मनःस्थितीचे यथार्थ प्रतिबिंब उमटले आहे.''  इतिहासाने स्वीकारलेली ही दिशा असून काँग्रेस पक्षाला आता मागे पाय घेता येणार नाही.  (कुन्हीकृष्णन्, ३०७).

पक्षांतर्गत फुटीत चव्हाणांनी श्रीमती गांधींची बाजू अशी पुरोगामी असण्याच्या कारणावरून उचलून धरली असली, तरी हे कथित पुरोगामित्व हा श्रीमती गांधींच्या राजकारणाचा भाग आहे.  व्यक्तिगत नेतृत्व- स्पर्धेत प्रतिपक्षाला शह देण्यासाठी टाकलेला तो डाव आहे, याची बहुधा यशवंतरावांना जाणीव नसावी.  कायद्यांच्या द्वारे समाजवादाची रुजवात करता येईल, हा त्यांचा भाबडा आशावादच बहुधा प्रबळ ठरला असावा, असे दिसते.  पुरोगामी कायदे करूनही प्रत्यक्षात काहीही मूलभूत परिवर्तन घडत नाही, हा अनुभव स्वीकारायलाच त्यांचे मन तयार नसावे.  

राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे निमित्त घडून पक्षात फूट पडली.  'सरकारच्या पुरोगामी कार्यक्रमांना वृद्ध नेते खीळ घालतात,' अशी हाकाटी करून श्रीमती गांधी बंडाचे निशाण घेऊन उभ्या राहिल्या.  राष्ट्रपतिपदाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मतदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.  पक्षशिस्तीला प्रमाण मानणा-या चव्हाणांना हे पटले नाही.  त्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्या अनुयायांसह पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मत दिले.  पण पक्षाचा उमेदवार पराभूत होऊन श्रीमती गांधीपुरस्कृत उमेदवार स्पर्धेत यशस्वी झाला.  पुरोगामी प्रतिमेमुळे एरव्ही चव्हाणांना श्रीमती गांधी जवळच्या होत्याच आणि सिंडिकेटशी त्यांची कोणत्याच अर्थाने जवळीक नव्हती.  मात्र पक्ष फुटू नये, यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि पक्षशिस्तीखातर अधिकृत उमेदवाराचा घेतलेला कैवार या दोन गोष्टींमुळे चव्हाणांची 'कुंपणावरचे' ही प्रतिमा लोकांच्या नजरेत भरली.  नंतर श्रीमती गांधींनी त्यांना वेळोवेळी आपल्या राजकारणासाठी वापरले असले, तरी पूर्ण विश्वसनीय कधीच मानले नाही.

तरुण तुर्कांप्रमाणेच काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट अॅक्शनशीही चव्हाण जवळून संबंधित होते.  ऑक्टोबर १९७० मध्ये फोरमच्या चवथ्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते,

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org