यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ७०

पुरवठामंत्री असताना अन्नधान्यांवरची नियंत्रणे यशवंतरावांनी काढून टाकली होती, किंवा शेतक-यांनी अधिक धान्य पिकवावे, म्हणून त्यांना आर्थिक प्रलोभने दिली होती.  शेतक-यांची उत्पादनप्रेरणा जमिनीच्या स्वामित्त्वाशी निबद्ध आहे, असे मत मांडून त्यांनी सहकारी शेतीची कल्पना उडवून लावली होती.  यशवंतरावांचा दृष्टिकोन व्यवहारी व फलितदर्शी असल्याचे सांगून काही भाष्यकारांनी या त्यांच्या समाजवादाशी विसंगत भूमिकांचा गौरवही केला होता.  परिस्थितीतील वास्तवाशी चव्हाण कसे चपखलपणे जुळवून घेत, हे सांगताना हँजेन म्हणतो, की शेती-उत्पादनात वाढ करण्यासाठी आर्थिक प्रलोभने प्रभावी ठरतात, हे चिनी नेत्यांनी उपेक्षिलेले सत्य चव्हाणांनी अचूक हेरले होते. (हँजेन, १४०).  तर शेतीची उत्पादन-प्रेरणा यशवंतरावांनी स्वामित्वाशी जोडल्यावर, त्यांचा समाजवाद पाठ्यपुस्तकी नसून 'लोकांचा' समाजवाद असल्याचे शिफारसपत्र 'ब्लिट्झ' चे संपादक आर. के करंजिया यांनी दिले होते ('चव्हाण अभिनंदन ग्रंथ', २१).  चव्हाणांच्या समाजवादास मार्क्सची नीतिवचने नसली, तरी मार्क्सवाद भारतीय परिस्थितीला लागू करण्याचे मनोधैर्य असल्यामुळे पुस्तकी समाजवाद्यांनाच नव्हे, तर समाजवादाचा उच्चार, पण समाजवादविरोधी आचार करणा-या काँग्रेसवाल्यांनाही आपल्या मागे खेचून नेण्याचे सामर्थ्यही त्या संपादकांना यशवंतरावांच्या ठिकाणी जाणवले होते.

संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे चव्हाण मुख्यमंत्री होते.  त्या काळात अत्यंत प्रतिकूल राजकीय पर्यावरण असूनदेखील ते ग्रामीण बहुजन-समाजप्रमाणेच मुंबईतील अ-मराठी भांडवलदारांची मने आपलीशी करू शकले.  वास्तविक आधीच आवडी अधिवेशनाच्या समाजवादी समाजरचनेच्या घोषणेने किंचित चिंताक्रांत झालेला हा भांडवलदारवर्ग तळागाळातून आलेल्या एका मराठी माणसाच्या हाती सत्तेची सूत्रे गेल्यामुळे अधिकच हवालदिल झाला होता.  गुजराती व्यापा-यांच्या देशी वसाहतवादावर चव्हाणांनी डागलेल्या तोफेचे पडसाद अजूनही पुरते विरलेले नव्हते.  तरी पण अल्पावधीत मुख्यमंत्री चव्हाणांनी या व्यापारीवर्गाचा विश्वास आपल्या प्रत्यक्ष कारभारातून संपादित केला.  समाजवादविषयक संदिग्धतेतच त्यांच्या या यशाचे रहस्य शोधावे लागेल.  विचाराने डावी, पण व्यवहारात लवचीक माणसे नेहरूंना आवडायची.  यशवंतराव नेहरूंना त्यामुळे लवकरच प्रिय झाले.  (हँजेन, १५७).  ए. डी. श्रॉफ या मुंबईच्या एका बड्या सावकाराने चव्हाणांसंबंधी केलेले विधान या संदर्भात लक्षणीय आहे.  तो म्हणतो,

''यशवंतराव नेहरूंना खूश करण्यासाठी इतर अनेकांप्रमाणे समाजवादी असल्याचा देखावा करीत असले, तरी खाजगी उद्योगक्षेत्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सहानुभूतीचा आहे.'' (कित्ता, १४७).

संयुक्त महाराष्ट्र झाला, त्या वेळी तर वातावरणात समाजवादाची हवा प्रखर होती.  संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असल्यामुळे महाराष्ट्रात समाजवादी सरकार यावे, हे समितीचे साध्य होतेच; पण काँग्रेसलाही आता तीच भाषा करण्यावाचून चळवळीच्या वातावरणामुळे गत्यंतर उरले नव्हते.  'संयुक्त महाराष्ट्रात समाजवादाचा पहिला पाळणा हलेल', अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री चव्हाणांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने मुंबईत उच्चारली.  महाराष्ट्रात कृषी-औद्योगिक-अर्थव्यवस्थेची पायाभरणी करण्यातून इथे ख-या अर्थाने न्याय्य व स्वतंत्र समाज उभा राहू शकेल.  शेती आणि ग्रामीण उद्योगधंदे या दोन्ही क्षेत्रांत सहकारी संस्थांचे जाळे विणण्यातून समाजवाद अवतरू शकेल आणि ग्रामीण- शहरी विकासांतील दरी बुजविता येईल, अशीही चव्हाणांची अटकळ होती.  पण प्रत्यक्षात मात्र मुंबईचे कारखानदार-भांडवलदार आणि खेड्यांतील सधन शेतकरी यांच्या युतीचे पौरोहित्य या मुख्यमंत्र्यांना करणे भाग पडले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org