यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ५५

पराभवानंतरचे आत्मपरीक्षण

१९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व पराभव झाला.  पण त्या पराभवाचे तटस्थ विश्लेषण करून अपराध्यांना शासन करण्याच्या मनःस्थितीत हा पक्ष त्यानंतरही नव्हता.  यशवंतरावांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी यांच्या सहकार्याने थोडेसे सत्यान्वेषण व आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला; पण तो त्यांना तडीस नेता आला नाही.  आपल्या पक्षाने पक्षांतर्गत लोकशाही गमावली आणि एकचालकानुवर्तित्व स्वीकारले, यातच आपल्या पक्षाच्या पराभवाचे मूळ आहे आणि म्हणून यापुढे जर पुन्हा पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था यायची असेल, तर पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू करणे आणि सामुदायिक नेतृत्वाची प्रतिष्ठापना करणे ही पावले ताबडतोब उचलावी लागतील, असे चव्हाण-रेड्डी यांचे निदान होते.

श्रीमती गांधींना, हे सरळसरळ त्यांच्या एकतंत्री नेतृत्वाला दिलेले आव्हान आहे, असे वाटले.  त्यांना त्या दोन्ही गोष्टी साफ नामंजूर होत्या.  पक्ष ही आपली खाजगी इस्टेट समजून हव्या त्या सुभेदारांना हव्या त्या पदांवर हव्या तितक्या काळासाठी नेमायचे, बदलायचे वा काढून टाकायचे, हा अनिर्बंध अधिकार चालवण्याची उणीपुरी दशकभराची वहिवाट सोडायला त्या स्वाभाविकच तयार नव्हत्या.  सामुदायिक नेतृत्व तर त्यांच्या राजकीय शैलीत मुळीच बसणारे नव्हते.  एकीकडे त्या सामुदायिक नेतृत्वात चंचुप्रवेश करीत असतानाच दुसरीकडून त्यांनी स्वतःभोवती निष्ठावंतांचा गोतावळा गोळा करायला प्रारंभ केला.

मधल्या काळात जनतापक्षीय राज्यकर्त्यांनी श्रीमती गांधींना अटक केली आणि दुस-याच दिवशी सोडून दिले.  पण या दोन दिवसांत इंदिरानिष्ठांनी देशभर नुसता हैदोस घातला.  ब्रह्मानंद रेड्डींना काढून इंदिराजींना पक्षाध्यक्ष करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.  त्यासाठी महासमितीने खास अधिवेशन भरवावे, अशी त्यांनी सह्यांची मोहीम काढली.  रेड्डी व चव्हाण यांनी खंबीर भूमिका घेऊन श्रीमती गांधींना एकमेवाद्वितीय नेतृत्व देण्यास कसून विरोध केला.  त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी इंदिराजींनी केलेला दक्षिणदौरा त्यांना तिथल्या निदर्शनांमुळे आवरता घ्यावा लागला.  चव्हाण-रेड्डी द्वयीचे पक्षात वजन वाढल्यासारखे दिसले.  पक्षांतर्गत लोकशाहीला मारक ठरू शकतील, अशा सर्व सूचना त्यांनी फेळाळून लावल्या.  आणीबाणीत स्वैराचारी वर्तनामुळे बदनाम झालेली संजयसेवना (यूथ काँग्रेस) बरखास्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org