यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ५४

'वचनपूर्ती'कडून दडपशाहीकडे

श्रीमती गांधींच्या दृष्टीने समाजवाद ही केवळ एक निवडणूक घोषणा होती आणि 'गरिबी हटाव'च्या त्यांच्या प्रभावी प्रचारातून त्यांनी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळवलाही होता.  पण प्रत्यक्षात त्यांच्या धोरणांतून आधीचीच मळवाट तुडवली गेल्यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीत अपेक्षित बदल होण्याची सुतराम् शक्यता नव्हती.  वचनपूर्तीच्या राजकारणाची हवा थोडे दिवसच टिकली, पुढे 'वाढलेल्या अपेक्षांच्या क्रांती'चे आव्हान पेलणे अशक्यच ठरले.  भ्रमनिरस्तर जनतेचा असंतोष वाढत राहिला.  आंदोलने वेगवेगळी निमित्ते घेऊन प्रखर होते गेली.

दिव्यवलयी नेत्यांना लाभलेल्या लोकप्रियतेची नौका अशा आव्हानांच्या खडकावर आदळून फुटली, की दमनाखेरीज दुसरा मार्गच त्यांना दिसत नाही.  श्रीमती गांधींनी तोच मार्ग पत्करला.  अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवडणूक रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला, तर एकजात सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून दडपण्याचा हुकूमशाही पवित्रा त्यांनी आणीबाणीच्या स्वरूपात घेतला.  ज्येष्ठ विपक्षी नेत्यांना तर त्यांनी तुरुंगात डांबलेच; पण स्वपक्षीय सहका-यांवरही त्यांनी नजर कैद ठेवल्याची वार्ता होती.  सेन्सॉरशिपमुळे अधिकृत काहीच कळत नव्हते.  पण या नजरबंद सहका-यांच्या यादीत यशवंतरावांचेही नाव असायचे.

यशवंतरावांनी आणीबाणीचा निषेध करावा, ही त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण झाली नाही.  या राक्षसी राजवटीचे अंतःस्थ हेतू पूर्णतया स्वार्थी होते, ज्यांच्या डोक्यांवर प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याचा वरवंटा फिरत होता, त्यांच्यापैकी अनेकांच्या त्यागी देशभक्तीबद्दल चव्हाणांना अंतर्यामी आदर होता, उद्धोषित कार्यक्रमांच्या बजावणीसाठी अशा उपायांची मुळीच गरज नाही, हे उघड दिसत होते, आणीबाणीत दंडसत्तेचे अतिरेक उघड्या डोळ्यांनी बघणे क्लेशकारक होते.  संजय गांधींच्या रूपाने काँग्रेसमध्ये शिरलेल्या अपप्रवृत्ती काँग्रेसच्या संपूर्ण ध्येयनिष्ठेला व परंपरांना तिलांजली देणा-या होत्या, वगैरे सगळे दिसत असूनही यशवंतराव मिठाची गुळणी तोंडात धरून बसले, याचा अनेकांना अचंबा वाटत होता.  त्यांच्या मनाची या काळात प्रचंड घालमेल होत असावी; पण परतायचे दोर कापून टाकल्याप्रमाणे त्यांची अगतिक अवस्था झाली असावी; असे दिसते.  एका परीने ते स्वतःच्याय कार्यपद्धतीचे बंदिवान झाले होते.  परराष्ट्रमंत्री म्हणून ते रुमानियात गेलेले असताना तिथल्या कौन्सलने त्यांना जेव्हा सांगितले, की प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी निवडणुका घोषित करण्याचे ठरवले असल्याची बातमी भारतातून आली आहे, तेव्हाची बोलणी प्रतिक्रिया चव्हाणांनी नोंदवली आहे.  ते लिहितात, ''संदेश ऐकून मनावरचे ओझे एकदम हलके झाले.''

आणखी दोन देशांचा दौरा योजलेला होता, पण तो रद्द करून तडक मायभूमीला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  पुढे ते म्हणतात,

''सार्वत्रिक निवडणुकांना आम्ही कायमचे मुकलो की काय, अशी धास्ती गेले कित्येक महिने वाटत होती, ती नाहीशी झाली.  मी माझ्या पत्नीला त्या दिवशी तेथूनच पत्र लिहिले.  त्यात म्हटले आहे, की '.... बहुतेक सर्व राजबंदी सुटतील व निवडणुकीचे वातावरण प्रस्थापित होईल.  This is gain.  हवा मोकळी हाईल.  आज मी आनंदात आहे.''  ('ॠणानुबंध', ३२)

त्यांच्या आणीबाणीकालीन मनःस्थितीचे प्रतिबिंब या पत्रातून उमटले आहे.  निवडणुका होणार, एवढा संदेश नुसता कानांवर आला, आणि ते इतके संतुष्ट झाले, यावरून त्यांच्या मनावर परिस्थितीचे किती प्रचंड दडपण होते, याचा प्रत्यय येतो.

ते लिहितात,

''.... तो संदेश ऐकल्यानंतर दिवसभर माझ्या मनात, सकाळच्या कोवळ्या उन्हाचा उल्हास होता- एका नव्या आशावादी दृष्टीने देशाच्या भवितव्याकडे पाहण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली होती.'' (कित्ता).

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org