यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४५

नव्या प्रधानमंत्र्यांची निवड

मे १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले.  वारसदारीचा प्रश्न निर्माण झाला.  मोरारजी व लालबहादूर शास्त्री यांची नावे पुढे आली होती.

''यशवंतरावांच्या नावाची चर्चा झाली, ती पर्यायी उमेदवार म्हणून... मोरारजी आणि शास्त्रीजी यांच्यामध्ये जी चुरस निर्माण झाली, तीत एकाने जरी माघार घेतली असती, तरी पर्यायी उमेदवार म्हणून चव्हाण यांचेच नाव पुढे आले असते.'' असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार द्वा. भ. कर्णिक यांनी नमूद केले आहे.  ('चैतन्ययुग' ४७).  आपण केलेला अनुग्रह स्मरून यशवंतराव या निवडणूक-स्पर्धेत आपल्या बाजूने उभे राहतील, अशी मोरारजींची अपेक्षा होती.  पण व्यक्तिगत ॠणापेक्षा राजकीय ध्येयनिष्ठेला प्राधान्य देऊन यशवंतरावांनी मोरारजींना निरोप पाठविला, की ''आपली निवड झाली, तर मला आनंद वाटेल; पण सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मात्र मी आपल्याला पाठिंबा देऊ शकत नाही.'' (उद्धृत, कित्ता, ४९).

त्याच वेळी यशवंतरावांनी असाही आग्रह धरला, की प्रधानमंत्रिपदी करावयाची निवड शक्यतो एकमताने व्हावी.  मतदान घेण्याचा मार्ग शक्यतो अवलंबावा लागू नये.  'मतसाधारणतेचा' (कॉन्सेन्सस्) मार्ग म्हणून पुढे ज्याची भारताच्या राजकीय इतिहासात नोंद झाली, त्याचे प्रवर्तक याप्रसंगी यशवंतरावच ठरले.  त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीपुढे बोलताना सांगितले,

''भारताच्या भवितव्याकडे सा-या जगाचे लक्ष लागलेले होते.  आपण नेत्याची निवड समजुतीने कशी करतो, हे जगाला पाहावयाचे आहे.  तेव्हा आपल्यांतील मतभेद या वेळी तरी प्रगट होऊ नयेत.  बहुमताचा कौल घेऊन स्पर्धेशिवाय आपण नेता निवडला पाहिजे.'' (कित्ता)

बहुमताचा कौल घेण्याची जबाबदारी कामराज यांच्यावर टाकण्यात आली.  मोरारजींना एकूण परिस्थिती प्रतिकूल असल्याचा अंदाज येऊन त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.  शास्त्रीजींची निवड अविरोध झाली.

शास्त्रींची कारकीर्द अठरा महिन्यांचीच झाली; पण पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयामुळे ती दैदीप्यमान ठरली.  शास्त्रींबरोबरच संरक्षणमंत्री चव्हाण यांची कीर्ती या काळात जगभर पसरली.  चव्हाणांचे नेतृत्व राष्ट्रव्यापी होण्यास आणि त्यांच्या गुणांचा लौकिक सर्वत्र पसरण्यास पाकिस्तानचे १९६५ चे आक्रमण मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले.  चव्हाणांच्या समर्थ राजकीय नेतृत्वाखाली भारतीय सेनादलांचे नीतिधैर्य या लढ्याच्या वेळी खूपच उंचावलेले होते.  आक्रमणाला जो जोरदार प्रतिसाद या दलांनी दिला, त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी राजवटीचे धाबेच दणाणले.  हवाई दलाने लष्कराला दिलेल्या उत्तर साथीमुळेच ते पाकिस्तानचा पराभव करू शकले.  युद्धबंदी झाली, तेव्हा पाकिस्तानने व्यापलेल्या भारताच्या प्रदेशापेक्षा तिपटीहून जास्त पाकिस्तानचा प्रदेश भारताच्या ताब्यात होता.      

४ जानेवारी, १९६६ रोजी शास्त्री-अयूबखान बोलणी ताश्कंदमध्ये सुरू झाली.  चव्हाण शास्त्रींच्या सोबत होते.  युद्धभूमीवरील यशातून जसे चव्हाणांचे संरक्षणमंत्री म्हणून गुण दिसून आले होते, तसे समेटाच्या वाटाघाटींच्या बैठकीत त्यांचे राजनयनैपुण्य सिद्ध झाले.  प्रधानमंत्र्यांच्या अतिविश्वासाचे सहकारी ते त्यामुळे ठरले.  ताश्कंद करारावर सही केल्यानंतर दुस-या दिवशी ११ जानेवारी, रोजी हृदयविकाराने शास्त्री निधन पावले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org