यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४४

३.  यशवंतराव - राजधानी दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक संकटाला संधीत रूपांतरित करून यशवंतरावांचे नेतृत्व तावून सुलाखून निघत असतनाच केंद्रपातळीवर चीनच्या आक्रमणामुळे एक मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता व त्याने खुद्द नेहरूंच्याही नेतृत्वाला हादरे दिले होते.  संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांना काढून टाकण्याची मागणी सत्तारूढ व विरोधी-दोन्ही पक्षगटांनी केली होती.  नेहरूंची इच्छा काहीही असली, तरी त्या मागणीचा जोर वाढल्यावर त्यांना पर्यायच उरला नव्हता.  त्यांनी लालबहादूर शास्त्रींशी नव्या संरक्षण-मंत्र्याच्या निवडीबद्दल चर्चा केली.  टी. टी. कृष्णम्माचारी, बिजू पटनाईक व यशवंतराव चव्हाण ही तीन नावे चर्चेत पुढे आली.  या पदावरची व्यक्ती वादातील असावी, प्रशासकीय कौशल्य तिने सिद्ध केलेले असावे आणि तिला बळकट राजकीय पाठिंबा असावा, या तिन्ही निकषांच्या कसोटीला नेहरू-शास्त्रींच्या मते फक्त चव्हाणच उतरत होते.  (कुन्हीकृष्णन् : 'चव्हाण अॅण्ड दि ट्रबल्ड डीकेड', - ७७).  चव्हाणांनी नेहरूंना नम्रपणे सांगितले, की आपल्याला लष्करी बाबींचा पूर्वपरिचय नाही आणि राष्ट्रभक्तीखेरीज त्या पदाला लागणारी गुणवत्ताही नाही.  पण नेहरूंचा निर्णय कायम राहिला.  १४ नोव्हेंबर, १९६२ रोजी चव्हाणांची संरक्षणमंत्रिपदावरील नियुक्ती जाहीर झाली आणि त्यांच्या राजकीय जीवनातील नव्या पर्वाला प्रारंभ झाला.  


संरक्षणमंत्री

संरक्षण-मंत्रिपदाचा प्रभार घेतल्यानंतर लवकरच यशवंतरावांनी त्या खात्याच्या कारभाराची माहिती बारकाईने करून घेतली, नेफा व लडाख सीमांना भेटी देऊन युद्धाचे बारकावे समजावून घेतले.  लष्करी अधिका-यांशी सविस्तर चर्चा केल्या. प्रत्येक आघडी त्यांनी नजरेखालून घातली.  लष्करी प्रशिक्षण केंद्रांत जाऊन चर्चा केल्या. सैनिकांच्या आधीच्या काही घडामोडींमुळे डळमळीत आलेला आत्मविश्वास त्यांनी पुन्हा बळकट केला.  त्यांच्यांतील हताशपाणाची भावना पुसून त्यांचे नीतिधैर्य वाढवले.  चव्हाणांनी आधी ज्या पदांच्या जबाबदा-या पार पाडल्या होत्या, त्यांपेक्षा अगदीच वेगळ्या प्रकारच्या जबाबदा-या या नव्या पदावरून त्यांना पत्करायच्या होत्या.  इथल्या समस्यांचे स्वरूप मूलतः निराळे होते.  त्यांची परिभाषा, सोडवण्याची रीत आणि आयाम-सारेच काही एकदम वेगळ्या प्रकारचे होते.  पण अंगभूत चिकाटी, व्यासंगी वृत्ती व कार्यनिष्ठा या गुणांच्या बळावर चव्हाणांनी नव्या पदासाठी आवश्यक असलेली नवी पात्रता आत्मसात केली.  संरक्षण ही केवळ लष्कराशी संबंधित बाब नसून तिला महत्त्वाचे राजकीय, आर्थिक व मानसशास्त्रीय पदर असतात, याचे भान ठेवून त्यांनी संरक्षण-खात्याचा कारभार चालविला.

संरक्षणाशी संबंधित विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समित्या चव्हाणांनी नेमल्या. विभिन्न क्षेत्रांचा व खात्यांचा परस्परांशी जो संपर्क व सुसंवाद संरक्षणदृष्ट्या आवश्यक असतो, तो प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली.  जनसामान्यांमध्ये लष्कराच्या भूमिकेसंबंधीची जाण वाढवण्याचे प्रयत्न केले.  लष्करी दलांची फेररचना व शस्त्रसज्जता याबाबतीत त्यांनी स्वतः तर हस्तक्षेप केलाच नाही; पण अन्य कुणालाही करू दिला नाही.  लष्कराच्या आधुनिकीकरणाचे उपाय त्यांनी तातडीने योजिले.  परदेशांकडून साहित्य व शस्त्रसामग्री मिळवली.  आधीच्या संरक्षण-मंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी संरक्षणविषयक प्रश्नांबाबत संसदेला व सर्वसामान्य जनतेला अधिक विश्वासात घेतले, असा अभिप्राय वृत्तपत्रांनी व्यक्त केला होता.  (उद्धृत, कित्ता, १०१).  त्यांना त्यांच्या प्रशासकीय पूर्वानुभवाचा व कार्यक्षमतेचा खूप उपयोग झाला.  आव्हाने पाहून उफाळणा-या त्यांच्या आत्मविश्वासाने व महत्त्वाकांक्षेने त्यांना उत्तम साथ दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org