यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४३

यशवंतरावांचे व्यक्तिगत यश आणि त्यांचे पक्षगत अपयश यांतील अंतर्विरोध मराठी राजकारणावर यशवंतरावांचा जास्तीत जास्त प्रभाव असण्याच्या काळातसुद्धा स्पष्ट जाणवत होता.  मराठवाडा-कोकण या प्रदेशांतील लोकांचा चव्हाणांच्या सद्गुणांवर व शब्दांवर विश्वास होता, पण त्यांच्या राज्यप्रशासनाबद्दल मात्र ते सदैव साशंक होते.  वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्यक्तिशः चव्हाणांच्या गुणग्राहक-जिज्ञासू व्यवहार-चातुर्याबद्दल भारावून बोलत असत.  पण यशवंतरावांच्या पक्षाबद्दल मात्र त्यांच्या मनात कधीच अनुकूल भाव नव्हता.  विरोधी पक्षनेते यशवंतरावांच्या सौजन्यशील, आस्थेवाईक व सहिष्णू वृत्तीबद्दल कृतज्ञ असत, पण या गुणांचे संस्कार महाराष्ट्र काँग्रेसवर यशवंतराव करू शकतील, अशा भ्रमात ते कधीच नव्हते.  यशवंतरावांच्या तोंडच्या समाजवादाच्या भाषेने भांडवलदार-जमीनदार वर्ग कधीच बुजत नसत, कारण एकंदर राजकीय चौकटीच्या भांडवली निष्ठा ते पूर्ण ओळखून होते.  या परिस्थितीचा एकच अर्थ होता, तो असा, की यशवंतरावांचे जे जे म्हणून यश आपण नोंदवले, ते त्यांचे व्यक्तिगत यश होते, त्यांना मिळालेला सर्वस्तरीय पाठिंबा हा ते तिथे असेपर्यंतच टिकणार होता आणि वारसदारांना यांपैकी कशाचाच आयता लाभ व्हावा, अशी परिस्थिती नव्हती; तो करून घ्यावा, ही त्यांची कुवत नव्हती किंवा तसे त्यांचे प्रशिक्षणही झालेले नव्हते.  

संयुक्त महाराष्ट्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षात मराठा महासंघ किंवा पतितपावन संघटना यांच्यासारख्या उच्चकुलीन मराठ्यांच्या संस्था दलितांच्या आरक्षणाला विरोध करतात, याहून मोठी यशवंतरावांच्या पराभवाची दुसरी कोणतीच बाब असू शकत नाही.  मराठा समाज चाळीस टक्के आहे, याचा व्यावहारिक राजकारणासाठी उपयोग करून घेणा-या चव्हाणांनी तसे करण्याचा हा संभाव्य दुष्परिणाम कदाचित कधीच अपेक्षिला नसेल.  पण आज तो घडून आला आहे, हे कुणालाच नाकारता येणार नाही.  शिवसेनेला 'अपायकारी फॅसिझम' म्हणणा-या चव्हाणांच्या वारसदारांनी स्वार्थी राजकारणासाठी शिवसेनेला आतून पाठिंबा दिला, ही भयंकर वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही.  किंबहुना असेही म्हणता येईल, की महाराष्ट्र सोडताना यशवंतरावांना या नव्या संकुचित प्रादेशिक मराठा अहंकाराची पूर्वकल्पना कदाचित आली असावी, आणि त्यामुळेच आपला वारसदार त्यांनी मध्यम जातीतून निवडला असावा आणि नंतर तेच धोरण पुढे दहा-बारा वर्षे चालवले असावे.

महाराष्ट्राची राजकीय सत्ता शहराकडून खेड्याकडे नेण्याचे श्रेय यशवंतरावांना देत असतानाच त्यांच्या काही धोरणांमधून शहरी भांडवलदार वर्ग आणि ग्रामीण जमीनदार वर्ग यांच्यात एक अनिष्ट युती होऊन ती समाजवादी महाराष्ट्राच्या उभारणीआड संयुक्तपणे उभी राहिली, याचे अपश्रेयही यशवंतरावांच्याच पदरात टाकावे लागले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org