यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ४१

सहकारी चळवळ आणि सत्तेचे विकेंद्रीकरण यांतून अपेक्षित परिणाम साधलेच नाहीत.  उलट, अनपेक्षित दुष्परिणाम मात्र मोठ्या प्रमाणावर पुढे आले.  सहकारी साखर कारखान्यांभोवती बागायती सधन शेतक-यांचा एक वर्ग ग्रामीण भागात आघाडीस आला आणि विकेंद्रीकरणातून उपलब्ध झालेली सत्तास्थाने त्यानेच बळकावली.  सरकारी योजनांमधून घडून आलेला विकास मूल्यमुक्त (व्हॅल्यू-फ्री) स्वरूपात झाल्यामुळे त्यातून ग्रामीण भागातील विषमतेला वा सर्वांगीण शोषणाला आळा बसला नाही.  श्रमिक घटक विकास-प्रक्रियेपासून दूरच राहिले.  समृद्धांची काही बेटे फक्त ग्रामीण समाजात निर्माण झाली आणि त्यांनी शहरातील भांडवलदार वर्गाशी साटेलोटे जुळवून घेतले.  कमाल जमीनधारणा व शेतजमिनींचे फेरवाटप कागदोपत्रीच राहिले.  शेतीचे आधुनिकीकरण झाले, तरी शेतीक्षेत्रातील धुरीणांची मानसिकता सरंजामीच राहिली आणि नेतृत्वाचे आधारही पारंपारिकच राहिले.  कौटुंबिक मोठेपणा, सामाजिक प्रतिष्ठा व सांपत्तिक सुस्थिती हेच ते आधार होते.  तरुण व पुरोगामी हे यशवंतरावांच्या मनातले नेतृत्व राजकारणात पुढे येऊच शकले नाही.  बहुजन-समाजाच्या अभ्युदयापेक्षा व्यग्तिगत, आप्तस्वकीय व जातिगट यांच्या स्वार्थाचा पाठपुरावा हेच राजकारणाचे साध्य होऊन बसले.

काही अंशी यशवंतरावांच्या व्यक्तिकेंद्री नेतृत्व-बांधणीचाही या शोकांतिकेत वाटा आहेच.  परिवर्तनाग्रही नेतृत्व सत्तेच्या अडणीवर बसून सहसा निर्माण होतच नसते.  ते चळवळीतूनच आकार घेते.  बिळाशी सत्याग्रहाच्या वेळी जनशक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय घेतलेल्या, चळवळीत निराशेचे वातावरण येऊ नये, यासाठी आत्माराम बापूंच्या उमेदवारीचा आग्रह धरणा-या आणि ४२ च्या आंदोलनात प्रतिसरकारच्या प्रयोगात चळवळीचे बळ अनुभवलेल्या यशवंतरावांनी नंतर चळवळींपेक्षा सत्ताकारणालाच समाजपरिवर्तनाचे साधन मानले.  यामुळेच चळवळीतले त्यांचे साथीदार आणि सत्तापर्वातील सहकारी हे पूर्णतया वेगळे असल्याचे दिसून आले.  'हे राज्य मराठी आहे, मराठा नव्हे', हे सूत्र आपल्या सहका-यांपर्यंत संक्रमित करणे यशवंतरावांना कधीच साध्य झाले नाही.  ग्रामीण मानसिकतेत बदल घडवण्यासाठी सुरू झालेली सत्यशोधक चळवळ पुढे रेटण्याचे प्रयत्न यशवंतरावांकडून झाले नाही.  प्रतिसरकारचा अधिकृत इतिहास शासनातर्फे प्रकाशित करण्याचेही कधी त्यांच्या मनात आले नाही, इतके ते या चळवळींपासून दुरावले होते.  विचारसरणीच्या दृष्टीने त्यांचे राजकीय सहकारी कायम दिवाळखोरच राहिले.

मोरारजींची भेट होण्यापूर्वी तळपातळीवर ध्येयवादी तरुण कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसला नवी दिशा, नवे पर्यायी नेतृत्व व सामाजिक-आर्थिक उद्दिष्टे देण्यासाठी धडपडणारे यशवंतराव आणि १९४६ नंतर संसदीय मनोवृत्तीची शिकार झालेले, चळवळींचा भूतकाळ दडपू पाहणारे आणि शासकीय सत्तेतूनच समाजसेवा शक्य आहे, या निर्णयाप्रत आलेले यशवंतराव-हे परस्परव्यावर्तक दोन टप्पे यशवंतरावांच्या राजकीय प्रवासात स्पष्ट दिसतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org