यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३९

पण त्यानंतर लवकरच महाराष्ट्र काँग्रेस कामचलाऊ प्रमाणावरही एकसंध टिकून राहू शकली नाही.  यशवंतरावांच्या एकमुखी नेतृत्वामुळे किमान तेवढे ऐक्य तोपर्यंतच्या काळात साध्य झाले होते.  श्रीमती गांधींच्या राजकीय शैलीमुळे ते नष्ट झाले.  मराठा-मराठेतर वादाला निरनिराळे संदर्भ चिकटवून नाईक मंत्रिमंडळाविरुद्ध असंतोषाचे उद्रेक त्यांच्याच पक्षातली मंडळी घडवून आणू लागली.  या कामी त्यांच्यापैकी काहींनी शिवसेनेचेही साह्य घेतले.  मराठवाडा विकास आंदोलन हेही नाईकांच्या नेतृत्वाला प्रच्छन्न आव्हानच होते.  'नाईक नकोत' यावर महाराष्ट्र काँग्रेस पुढा-यांचे एकमत होते, पण 'कोण पाहिजे ?' यावर मतांतरेच मतांतरे होती.  वसंतदादा पाटील व पी. के. सावंत प्रभृतींनी यशवंतरावांना डावलून सरळ इंदिरा गांधींसमोरच साकडे घातले.  त्या म्हणतील, तो मुख्यमंत्री स्वीकारण्याची तयारी दाखवली.  तरी इंदिराजी काही निर्णय घेत नव्हत्या; पण बोर्डीच्या शिबिरात जेव्हा त्यांना जाणवले, की अजूनही महाराष्ट्रात यशवंतरावांना बराच पाठिंबा आहे, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री बदलण्याचा तात्काळ निर्णय घेतला.  त्यांनी रजनी पटेल, सावंत व शंकरराव चव्हाण यांना पाचारण करून शंकररावांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.  यशवंतरावांना 'एक सिद्ध गोष्ट' (फेट अकम्पली) या स्वरूपात हा 'निर्णय' कळवून त्यांची त्यास 'संमती' फक्त श्रीमती गांधींनी मिळवली.

शंकरराव चव्हाणांची निवड म्हणजे एका परीने महाराष्ट्राच्या राजकारणातील 'यशवंत' - पर्वाची अधिकृत परिसमाप्तीच होती.  स्वाभिमानशून्य मराठा लॉबीने मध्यमजातीकडून स्वतःकडे सत्ता खेचून आणण्याच्या एकमात्र स्वार्थी हेतूने 'डायरेक्ट' इंदिराजींकडून त्यांच्याच मर्जीनुरूप मिळवलेले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हीच शंकरराव चव्हाणांची प्रतिमा होती.  आणीबाणीच्या काळात इंदिरा-संजय जोडीचे आज्ञाधारक सुभेदार म्हणून शंकररावांनी निष्ठेने कारभार केला.  पण त्यांना अजिबात राजकीय पाया नसल्यामुळे १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात प्रचंड हादरे बसले.  दादा, मोहिते, नाईक या मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंड करून उठले.

यशवंतरावांनी केंद्रात श्रीमती गांधींच्या एकाधिकाराविरुद्ध ठाम भूमिका घेतली, तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसच्या मुखंडांनी पुन्हा त्यांची कास धरली.  पक्षफूट झाली.  इंदिरा काँग्रेस नामक नवा पक्ष निर्माण झाला.  तरी मराठा लॉबी बव्हंशी यशवंतरावांसोबत मूळ पक्षात राहिली.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या.  कोणत्याच पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही; पण जनता पक्षाला सार्वत्रिक जागा मिळाल्या.  पण त्या पक्षाला संधी न देता राज्यपाल सादिक यांनी काँग्रेस-इंदिरा काँग्रेस यांच्या युतीला मान्यता देऊन वसंतदादांना मुख्यमंत्री केले.  एस. एम. जोशींनी म्हटल्याप्रमाणे - ''खरे तर जनता पक्ष व स्वर्णर्सिंग काँग्रेस या दोघांत एकाधिकारशाही विरोधाचा समानधर्म होता.  पण यशवंतराव जनता पक्षाचा श्यामकर्ण वारू अडवण्याच्या इरेस पडले व आय काँग्रेसचा लांडगा त्यांनी खुशाल घरात घेतला !  हे त्यांचे अंदाज त्यांच्या अंगाशी आले.''  ('मी : एसेम', ३७४).

हा काळ यशवंतरावांच्या राजकीय हयातीत कमाल संदिग्धतेचा व राजकीय किंकर्तव्यतेचा काळ ठरला.  श्रीमती गांधींच्या अटकेचे निमित्त साधून तिरपुडे-मोहिते प्रभृतींनी यशवंतरावांच्या 'चौकडी' प्रभुत्वाविरुद्ध एल्गार पुकारला.  यशवंतरावांच्या कृपेने मुख्यमंत्रिपदावर असलेल्या वसंतदादांनाही यशवंतरावांचा भरोसा वाटत नव्हता.  ते केव्हा शरद पवारांना पाठिंबा देतील, याचा त्यांना नेम वाटेना.  यशवंतरावांविरुद्ध भूमिका घेणे हे इंदिरानिष्ठेचे गमक या काळी महाराष्ट्रात समजले जाऊ लागले.

दादांची भीती खरी ठरली.  यशवंतरावांच्या प्रच्छन्न पाठिंब्याच्या बळावर पवारांनी बंडखोरी करून वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला व समांतर काँग्रेस स्थापन केली.  या समांतर काँग्रेसने जनता पक्षाशी समझौता करून पुरोगामी लोक दलाचे संयुक्त सरकार महाराष्ट्रात उभे केले.  पण तेही अल्पजीवी ठरले.  

आयुष्याच्या अखेरीस वसंतदादांशी मैत्री करून पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहण्याचा एक क्षीण प्रयत्न यशवंतरावांनी केला.  पण इतिहासजमा झालेला त्यांचा प्रभाव त्यांना पुन्हा कधीच प्रस्थापित करता आला नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org