यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३८

केंद्रातून महाराष्ट्राचे राजकारण

केंद्रात जाताना यशवंतरावांनी मारोतराव कन्नमवार यांना आपला वारसदार नेमले.  हा बदल फारच मोठा होता.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा शैलीदारपणा, रुबाब आणि चौफेर बहुश्रुतपणा कन्नमवारांच्या ठायी नव्हता; पण ते उत्तम संघटक होते.  सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.  यशवंतरावांनी त्यांना मुख्यमंत्री केले, याच्या अनेक भिन्नभिन्न प्रतिक्रिया उमटल्या.  काहींना ही नेमणूक यशवंतरावांच्या एकूण जातिनिरपेक्ष व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत अशीच वाटली, काहींच्या मते मात्र स्वतःच्या नेतृत्वाला पर्यायी असे सत्ताकेंद्र मराठा समाजातून उभे राहू नये, अशा हिशेबातून चव्हाणांनी कन्नमवारांच्या पारड्यात आपले वजन टाकले असावे.  

दुर्दैवाने कन्नमवार त्यानंतर फार दिवस जगू शकले नाहीत.  त्यांच्या निधनानंतर नेतृत्वाची पाळी मराठवाड्याची होती.  पण यशवंतरावांनी पुन्हा विदर्भाच्याच वसंतराव नाईकांच्या बाजूने कौल दिला.  दुस-यांदा मराठेतर व्यक्तीच्या बाजूने चव्हाण उभे राहिलेले पाहून त्यांच्या अनेक चाहत्यांनाही त्यांच्या हेतूंविषयी शंका वाटू लागली.  परंतु यशवंतरावांविरुद्ध बंड करण्याचा विचारही महाराष्ट्रातील काँग्रेस-पुढारी करू शकत नव्हते, इतकी त्यांची घट्ट पकड मराठी राजकारणावर होती.

वसंतराव नाईक कोणत्याच अर्थाने यशवंतरावांचा वारसा चालवणारे नव्हते.  किंबहुना त्या दोघांची व्यक्तिमत्वे, पार्श्वभूमी व वैचारिक निष्ठा सपशेल अंतर्विरोधी होत्या.  नाईक स्वातंत्र्यलढ्यापासून तर दूर होतेच; पण त्यांचा सामाजिक परिवर्तनासाठी वा न्यायासाठी चाललेल्या कोणत्याही चळवळीशी दूरान्वयानेही संबंध आलेला नव्हता.  समाजवादाशी तर त्यांची तोंडओळखही नव्हती.  तरीही १९६७ च्या निवडणुकीनंतर पुन्हा वसंतराव नाईकच यशवंतकृपेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले; आणि १९७२ च्या निवडणुकीनंतरही नेतृत्वबदलाच्या प्रयत्नास खो घालण्याचा यशवंतरावांनी प्रयत्न केला.  नाइकांसोबत मराठवाड्यात दौरा करून यशवंतरावांनी 'नाईकच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील', असे जाहीर करून टाकले.  

१९६९ च्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत यशवंतरावांनी श्रीमती गांधींच्या विरोधात पवित्रा घेतला, तेव्हाही महाराष्ट्र काँग्रेस एकमुखाने चव्हाणांच्या मागे उभी होती.  पण १९७२ पर्यंत ही परिस्थिती राहिलेली नव्हती.  श्रीमती गांधींनी प्रादेशिक राजकारणात बळकट पाये असणा-या नेत्यांचे ते पाये खिळखिळे करण्याचे जोरदार प्रयत्न मधल्या काळात नेटाने चालवले होते.  याची झळ यशवंतरावांनाही लागणे ओघानेच आले होते.  

नाईक हे यशवंतरावांचे उमेदवार असतील, तर आपला पाठिंबा शंकरराव चव्हाणांना, अशी भूमिका श्रीमती गांधींची होती.  मोहन धारियांना त्यांनी तसे आश्वासनही दिले होते.  यशवंतरावांनी आपली पकड टिकवण्यासाठी वापरलेल्या नीतीचाच वापर करून इंदिरा गांधी त्यांची मुळे छाटण्याचा खटाटोप करीत आहेत, हे स्पष्ट दिसत होते.  नाईकांनी हे हेरले असावे.  त्यांनी यशवंतरावांना सोडून द्वारकाप्रसाद मिश्र यांना हाताशी धरले.  त्यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या यादीत आपली माणसे त्यांनी मोठ्या संख्येने घुसवली.  श्रीमती गांधींनी 'शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रिपद पेलणार नाही', असे लटके कारण सांगून नाईकांनाच हिरवा कंदील दाखवला.  नाईक तिस-यांदा मुख्यमंत्री झाले, पण तिस-या वेळेचे श्रेय यशवंतरावांना देता येणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org