यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २७

कार्यकर्ते आधीच गोंधळलेल्या मनःस्थितीत होते, त्यातच दडपशाहीमुळे त्यांची माथी भडकली होती.  काही ठिकाणी प्राणांची पर्वा न करता त्यांनी घातपाती कृत्ये केली. रेल्वे-रूढ उखडले, सरकारी खजिने लुटले, पोस्ट-ऑफिसे व पोलिस-चौक्या यांना आगी लावल्या, सरकारी व सावकारी दप्तरे भस्मसात केली, समाजकंटकांना व चळवळ-शत्रूंना पत्र्या ठोकल्या.  पण त्याचबरोबर या प्रतिसरकारने जनसामान्यांना न्याय दिला, संरक्षण दिले, सामाजिक सुधारणा केल्या, लोकाभिमुख्य अशी सरकारी यंत्रणा उभी केली, चोर-दरवडेखोरांचा बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्थाही निर्माण केली.  परिणामी या चळवळीचे कार्यकर्ते सामान्य लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.  लोकांचे त्यांना संरक्षण असल्यामुळे सरकार त्यांना पकडू शकत नव्हते.  

या चळवळीसंबंधी यशवंतरावांची भूमिका संदिग्ध आढळते.  जिल्हा काँग्रेसमधील एक बुद्धिमान नेता अशी त्यांची प्रतिमा त्यावेळपावेतो निर्माण झाली होती.  त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांनी जनमानस जिंकले होते.  त्यांच्या उमद्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो तरुण चळवळीत प्रविष्ट झाले होते.  भूमिगत चळवळीचे ते काही काळ 'डिक्टेटर' होते.  पण नंतर ते बाहेर पडले.  त्यांचा या चळवळीत नेमका सहभाग किती होता, हे अजूनही अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.  तरी पण वेल्स हॅन्जेन यांनी 'आफ्टर नेहरू, व्हू ?' (पृ. १३८) या आपल्या ग्रंथात, या चळवळीने नेमलेल्या एका दहशतवादी नासधूसकारी टोळीत आपण होतो, अशी चव्हाणांची स्पष्ट कबुली उद्धृत केली आहे.  हा लेखक पुढे असेही म्हणतो, की

''आज चव्हाण मान्य करतात, त्यापेक्षा अधिक क्रियाशील, उत्साहपूर्ण स्वरुपाचा सहभाग त्यांनी प्रतिसरकारच्या उपक्रमात केला होता, असे मानण्यास सबळ कारण माझ्यापाशी आहे.''

अर्थात एक गोष्ट तितकीच खरी, की त्यांचे हे दहशतवादी कार्य अल्पकाळ चालले.  या चळवळीने सुसंगत, चोख व जबदस्त संघटनाबांधणी केली, तोपावेतो चव्हाण तिच्यापासून दुरावले होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org