यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २६

प्रतिसरकार

सत्याग्रह करून कारावास पत्करण्याऐवजी भूमिगत राहून चळवळ पुढे न्यायची, असे सातारा जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांनी ठरविले.  यशवंतराव सांगतात,

''आमच्यापुढे दोन पर्याय होते.  एक, म्हणजे ब्रिटिश सत्ता खिळखिळी करण्यासाठी त्या सत्तेला आधारभूत असलेल्या गोष्टींचा विध्वंस करणे किंवा स्वातंत्र्य-लढ्याचा संदेश जनतेपर्यंत नेऊन तिला लढ्यासाठी संघटित करणे.  माझ्या दृष्टीने दुसरा पर्याय महत्त्वाचा व आवश्यक होता आणि तोच आम्ही स्वीकारला.''  ('ॠणानुबंध', ६५).

सातारा जिल्ह्यातील या काळातल्या स्वातंत्र्य-लढ्याचे दोन टप्पे पडतात.  पहिला, जागृत जनतेने उठवलेल्या आवाजाचा; आणि दुसरा ह्याच जनतेने ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला दिलेल्या प्रत्युत्तराचा- असे सांगून आपला संबंध यांपैकी पहिल्याच टप्प्याशी जवळचा होता, असे यशवंतरावांनी नमूद केले आहे.

परंतु वस्तुस्थिती अशी दिसते, की चळवळीच्या दुस-या टप्प्याशीही यशवंतराव बराच काळ संबंधित होते; पण त्यांनी स्वतः व त्यांच्या चरित्रकारांनी बहुधा बदलत्या काळाची पावले ओळखून त्यांचा या टप्प्यातील सहभाग कमी करून सांगण्याचा प्रयत्न केला असावा.

ब्रिटिश सत्ता, आपण समजतो, तेवढी अभेद्य व सर्वसमर्थ नाही, असा आत्मविश्वास जनमानसांत निर्माण करण्याच्या हेतूने कराड, तासगाव, वडूज, इस्लामपूर, पाटण, सातारा वगैरे ठिकाणी तालुका कचे-यांवर निदर्शने केली गेली.  तिरंगी ध्वज लावण्यात आले.  सरकारने प्रचंड सामर्थ्यानिशी चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला.

मोर्च्यांमधला प्रत्यक्ष अनुभव पाहिल्यानंतर यापुढे सभा, मोर्चे वा सत्याग्रह या निःशस्त्र मार्गांनी लढा यशस्वी होणे नाही, हे कार्यकर्त्यांना कळून चुकले.  नाना पाटील, जी. डी. लाड, नाथाजी लाड, अप्पासाहेब लाड, शंकरराव लुपणे, शाहीर शंकरराव लुपणे, शाहीर शंकरराव निकम, आत्माराम बापूजी पाटील, नागनाथ नायकवाडी, बर्डेमास्तर, पांडुरंग मास्तर वगैरे मंडळींनी सशस्त्र क्रांतीचा निर्णय घेऊन अमलात आणला; नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'प्रतिसरकार' ('पत्री सरकार') आंदोलन जिल्ह्यात उभे राहिले.  गनिमी पद्धतीने काम करणा-या हजारो तरुणांचे बळ या चळवळीला लाभले होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org