यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २२

उदाहरणार्थ, सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्याशी त्यांचे मतभेद नेमके कोणत्या मुद्द्यांवर होते आणि त्यांच्याविषयी यशवंतरावांचे निश्चित मूल्यमापन कसे होते ?  सातारच्या प्रतिसरकारच्या आंदोलनात यशवंतरावांचा सहभाग कितपत होता आणि मतभिन्नतेचा नेमका आशय काय होता ?  रॉयवादी गट, काँग्रेस समाजवादी पक्ष व शेतकरी कामगार पक्ष काही निश्चित भूमिका घेऊन काँग्रेसबाहेर पडले, त्या प्रत्येक वेळी या बंडखोरांशी वैचारिक जवळीक असूनही चव्हाण काँग्रेसला चिकटून का राहिले आणि आपल्या प्रतिष्ठेचे व लोकप्रियतेचे बळ त्यांनी काँग्रेसच्या पाठीशी कशासाठी उभे केले ?  स्वतः मनाने संयुक्त महाराष्ट्रवादी असूनही द्वैभाषिकाचे जोखड त्यांनी का पत्करले आणि जिवाच्या आकांताने ते यशस्वी करण्याचा खटाटोप त्यांनी का केला ?  संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरूंना मोठे मानण्याची घोषणा करून लोकमताला त्यांनी का डिवचले ?  काळाची गरज म्हणून देव-देवगिरीकर प्रभृतींच्या नेतृत्वाला शह देणे समजू शकते, पण भाऊसाहेब हिरे यांना शह देण्यामागे यशवंतरावांची नेमकी कोणती प्रेरणा होती ?  

महाराष्ट्रात मराठा अहंकाराची मुहूर्तमेढ कळत-नकळत यशवंतरावांनी रोवली, या आक्षेपात कितपत तथ्यांश आहे ?  तळापासून पक्षबांधणीचे संकल्प अनेकदा सोडणा-या यशवंतरावांना त्या कार्यात कोणत्या कारणांमुळे अपयश पत्करावे लागले ?  ते मुख्यमंत्रिपदावर असताना राज्याच्या यशाची जी चढती कमान आढळली, ती ते त्या पदावरून जाताच खाली घसरण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत झाली ?  मराठा समाज हा महाराष्ट्र काँग्रेसचा खंबीर पाया आहे, हे ठाऊक असूनही आपल्यानंतर मराठेतर समाजाचे एक नव्हे, तर दोन मुख्यमंत्री महाराष्ट्रावर लादण्यामागे चव्हाणांचे कोणते राजकीय गणित होते ?  पुढच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या सुंदोपसुंदीचे अपश्रेय यशवंतरावांना टाळता येईला काय ?

यशवंतरावांकडून वरीलपैकी कोणत्याच प्रश्नाचे समाधानकारक व तर्कसंगत उत्तर अभ्यासकांना मिळालेले नाही आणि या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळाल्यावाचून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात यशवंतरावांनी पार पाडलेल्या भूमिकेचे साक्षेपी मूल्यमापन होण्याची शक्यताच दिसत नाही.  ही उत्तरे शोधण्यासाठी यशवंतरावांचे संकीर्ण प्रासंगिक उद्गार आणि वक्तव्ये, त्यांचे आत्मकथनपर लेखन, परिस्थितिजन्य पुरावे, काही सविस्तर मुलाखती, चरित्रात्मक लेखन आणि घटनाक्रमातील कार्यकारणाची चिकित्सा एवढ्यावरच भिस्त ठेवावी लागते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org