यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २०

संसदीय नेतृत्व-आघाडीला प्राथम्य देऊन सामाजिक-आर्थिक चळवळींची आघाडी दुर्लक्षित ठेवणे ही यशवंतरावांच्या नेतृत्व-बांधणीतील दुसरी त्रुटी जाणवते.  १९४२ साली ज्या साथीदारांबरोबर चव्हाणांनी आपल्या पुढारीपणाची उमेदवारी केली, ते जवळपास सगळेच त्यांना पुढील राजकीय आयुष्यात दुरावले होते.  असे घडण्याचे स्पष्टीकरण या त्रुटीतच सापडते.  चव्हाणांना ग्रामीण-शोषित बहुजन-समाजाच्या प्रश्नांबद्दल पोटतिडीक असली, तरी त्यांच्या वतीने चळवळी करण्याकडे त्यांचा फारसा कल नव्हता.  सत्यशोधक चळवळ ही मुळात दलित-शोषितांवरील अन्यायाच्या निराकरणार्थ सुरू झालेली झुंजार चळवळ होती.  तिच्याबद्दल सार्वजनिक जीवनाच्या आरंभापासूनच चव्हाणांच्या मनात अढी होती.  सत्यशोधक समाजाची विचारसरणी 'एकांगी, जातीयवादी, राष्ट्रद्रोही व संकुचित आहे,' या पूर्वग्रहापोटी यशवंतराव त्या चळवळीचा पुरोगामी, क्रांतिकारी, परिवर्तनाग्रही व बहुजन-समाजाला नवे आत्मभान देणारा मूळ गाभा समजून घेऊच शकले नाही.  विकसनशील समाजातील शोषितांच्या चळवळी सकृद्दर्शनी जातिवाचक वाटल्या, तरी तेवढ्यावरून त्यांचे क्रांतिकारकत्व नाकारणे चूक ठरते.  इतकेच नव्हे, तर आपल्यासारख्या समाजात चळवळ कितीही क्रांतिकारक असली, तरी तिचा प्रथमाविष्कार जातीय परिभाषेत होणे अपरिहार्य असते.  चव्हाणांनी अशा दृष्टिकोनातून या चळवळींचा विचार न केल्यामुळे ते त्यांच्याशी तादात्म्य पावू शकले नाहीत. व्यापक निष्ठेचे अधिष्ठान म्हणून त्यांनी काँग्रेसला जवळ केले आणि काँग्रेस जसजशी संसदीय मनोवृत्तीच्या आहारी गेली, तसतसे यशवंतरावही तिच्या मागे फरफटत गेले.  

बहुजन-शोषितांच्या चळवळीपासून आलेला हा दुरावाच त्यांना सत्ताकारणात व्यग्र ठेवण्यास कारणीभूत ठरला.  सत्ताकारण ही चव्हाणांच्या नेतृत्वाची गंभीर मर्यादा होऊन बसली.  काँग्रेसच्या बाहेर जायचे, तर सत्तेवर राहता येणार नाही.  सरकारच्या विरोधात उभे राहून चळवळी कराव्या लागतील.  सत्तेवाचून समाजहिताचे कार्य कसे करायचे ?  असा प्रश्न बहुधा चव्हाणांना दरवेळी पडला असावा.  पंख छाटलेल्या पक्ष्यागत त्यांची राजकीय स्थिती झाली होती.  विचारसरणी काय होती ?  तिचे वर्गीय अंतरंग कसे होते ?  वगैरे प्रश्न त्यांनी वेळीच विचारले असते, तर ''ज्या वातावरणात आम्ही वाढत होतो, त्या दुखणा-या हिंदू समाजातील उच्चनीचपणामधील विषमता, गरीब-श्रीमंत, महात्मा फुले यांचे विचार या बाबतीत फार काही करू शकलो नाही.  हा अपुरेपणा, त्यांची तीव्र जाणीव, विफलतेची भावना आजही बोचते.  म्हणूनच कर्तृत्वाचे पूर्ण सार्थक झाले नाही, असे वाटते'' (कित्ता, ६१).  असा विषाद त्यांना राजकीय वानप्रस्थाश्रमात करावा लागला नसता जन-आंदोलनांचे नेतृत्व करून त्यांचा पुरोगामी आशय वाढवीत नेणे आणि त्यांच्यांतील हीण क्रमशः कमी करीत जाणे यशवंतरावांना शक्य होते.  पण ते त्यांच्या नेतृत्व-बांधणीत बसले नाही.  परिणामी संसदीय राजकारणात ते गुंतून पडले.  तिथे त्यांची सरशीही वेगाने झाली.  पण परिवर्तनाग्रही बहुजन-चळवळीला त्यातून फारशी चालना मिळू शकली नाही.  'नेतृत्व हे समूहकार्य असते' (लीडरशिप इज् ए ग्रूप-फंक्शन) असे मानल्यास या निकषावर चव्हाणांचे नेतृत्व अपुरे पडले, हे मान्य करणे भाग ठरते.

प्रवाहाबाहेर पडण्याच्या भीतीमुळेच यशवंतरावांच्या नेतृत्वातील अंगभूत लवचिकपणा कसोटीस लागला.  त्यांच्या राजकीय कारकीर्दीत असे अनेक प्रसंग उद्भवले होते, की जेव्हा तत्त्वनिष्ठेचे राजकारण करून वेळ पडल्यास पदावरही पाणी सोडण्याचा तडफदारपणा त्यांना दाखवता आला असता.  आणि त्यांनी तसे केले असते, तर इतिहास बदलला असता.  पण त्यांनी तसे करायचे टाळले.  हातची सत्ता सुटली, तरी आपण पुन्हा नव्याने पर्यायी ताकद खडी करू शकू, अशी धमक, आत्मविश्वास व निर्धार यशवंतरावांनी उमेदीच्या काळात दाखवला नाही आणि शेवटी जेव्हा दाखवला, तेव्हा फार उशीर झाला होता.  'संधिसाधू', 'कुंपणावरचे', 'तडजोडवादी', 'कचखाऊ' ही त्यांची प्रतिमा घडवण्यास यशवंतरावांच्या नेतृत्व-बांधणीतील हा कच्चा दुवाच कारणीभूत ठरला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org