यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १८

नेतृत्वगुण-समुच्चय

राजकीय दूरदृष्टी, मनाचा पक्केपणा, स्व-पर-बलाबल पारखण्याची सावधगिरी, परिस्थितीचा अचूक अंदाज टिपण साधण्याचे कौशल्य, लाघवी भाषा, सौम्य तरीही तेजस्वी वाणी, विजिगीषू कर्तृत्व, रसज्ञता, अभिरुचिसंपन्नता वगैरे अनेक 'यशवंत' गुण चव्हाणांच्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळेच एक लोकोत्तर नेतृत्व त्यातून उभे राहू शकले.  या गुणांमध्ये जन्मसिद्धतेपेक्षो कष्टासाध्यतेचाच भाग मोठा होता, हे विशेषच लक्षणीय ठरते.  किंबहुना त्यामुळेच 'कर्षकाच्या कुळीचा (हा) महाधोरणी धूर्त लोकाग्रणी' समकालीन शाहिरांच्या पोवाड्यांचा विषय झाला होता.  

- आणि या गुणसमुच्चयामुळेच यशवंतराव नेहरूंच्या नंतर संबंध देशाचे समर्थपणे नेतृत्व करू शकतील, असा होरा अनेकांनी व्यक्त केला होता.  हँजेनसारख्या अभ्यासकाने 'हू आफ्टर नेहरू ?' या आपल्या ग्रंथात नेहरूंच्या सर्व संभाव्य वारसदारांच्या गुणावगुणांचा परामर्श घेताना चव्हाणांबद्दल म्हटले होते, की इतर कुणाहीपेक्षा नेहरूंचे वारसदार म्हणून पुढे येण्याची संधी यशवंतराव चव्हाणांनाच सर्वाधिक आहे.  'मँचेस्टर गार्डियन'नेसुद्धा या विधानाला पुष्टी देऊन असे म्हटले होते, की नेहरू आणखी एखादी निवडणूक होईपर्यंत जगले, तर त्यांच्यानंतर चव्हाण हेच त्यांचे वारसदार होण्याच्या योग्यतेचे असतील.

खुद्द यशवंतरावांनाही बहुधा या आपल्या बलस्थानांची यथोचित जाणीव असावी, हे त्यांच्या पुढील निवेदनावरूनच दिसून येते.  ते लिहितात :  

''गेल्या चाळीस वर्षांत... दहा निवडणुका मी लढवल्या... मी (त्या) सर्व जिंकल्या आहेत..... १९४६ (ची) निवडणूक आणि नासिकची पार्लमेंटरी निवडणूक सोडली, तर माझ्या सर्व निवडणुका वादळी होत्या.  प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या.  अभद्र आणि कटुतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला.  या सर्व निवडणुकांत माझा मोठा प्रचारक मीच असे.  संभाषण-शैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले आणि या सर्व वादळांत... मी अपराजित ठरलो'' ('कृष्णाकाठ' : ३०८).

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org