यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १५

ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर मोरारजींच्या नंतर व मोरारजींच्या अनुग्रहाने आले असले, तरी त्यांची विरोधकांशी वागण्याची शैली मात्र मोरारजींपेक्षा मूलतः निराळी होती.  विरोधकांची भूमिका ते आस्थेवाईकपणे समजावून घेत असत.  मोरारजी आपल्या फटकळपणामुळे आपल्या समर्थकांनाही तोडीत, तर यशवंतराव आपल्या सौहार्दाद्वारे आपल्या विरोधकांनाही जोडीत असत, हा फरक अल्पावधीतच स्पष्ट झाला.  आपल्या संसदीय कारकीर्दीत विरोधी आमदार-खासदारांच्या भाषणांच्या वेळी सभागृहात आवर्जून हजर राहणे, सभागृहाच्या कामकाजात यावच्छक्य जास्तीत जास्त काळ भाग घेणे, विरोधकांनी प्रसंगी उपहास वा टवाळी केली, तरी आपला तोल जाऊ न देता मार्मिक व नर्म विनोदी शैलीत हल्ला परतवून लावणे व आपली बाजू ठामपणे मांडणे, इत्यादी गोष्टी यशवंतरावांनी कटाक्षपूर्वक केल्या.  सभागृहातील त्यांचे वर्तन परमसहिष्णू व आत्मविश्वासपूर्ण असूनही समतोल व संयम असायचे.  सत्तारूढ, तरीही विनम्र ही मंत्रिपदाची आदर्श प्रतिमा चव्हाणांनी निर्माण केली होती.  त्यांच्या राजकीय यशात या प्रतिमेचा वाटा फार मोठा होता.  चर्चेच्या वेळी शाब्दिक वितंडवादापेक्षा वादास्पद प्रश्नाच्या साधकबाधक गुणवत्तेवर त्यांचा अधिक भर असायचा.  अर्थात तरीसुद्धा तार्किक युक्तिवाद किंवा कोरडी आकडेवारी फेकून प्रतिपक्षाचे तोंड बंद करण्यापेक्षा सौहार्द हेच त्यांचे विरोधकांना गारद करण्याचे प्रभावी अस्त्र होते.

आपल्या खात्याची माहिती सभागृहासमोर यथातथ्य ठेवण्यासाठी ते कमालीचे कष्ट घेत असत.  प्रश्न कितीही नवखे व गुंतागुंतीचे असोत, सतत माहिती मिळवणे, वस्तुस्थिती टिपत जाणे,  स्वयंशिक्षण अखंड चालू ठेवणे, तक्रारींच्या अनुषंगाने आपल्या खात्याच्या कार्याची चिकित्सा करणे, लोकमताच्या सतत संपर्कात राहणे हा उद्योग चव्हाण निरंतर करीत असत.  (हँजेन, १४८).  सभागृहातले त्यांचे वक्तव्य त्यामुळे अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ तर असायचेच, शिवाय जनहितैकबुद्धी त्याच्या मुळाशी असल्याची साक्ष ऐकणा-याला ताबडतोब मिळत असे.  'स्टेट्समन'च्या संपादकाने म्हटल्यानुसार 'त्यांच्या भाषणात खोचक वाक्यांच्या फैरी नसल्या, तरीही ती प्रभावी होत, कारण त्यातून त्यांचे प्रसंगावधान, वैचारिक समतोलपणा, क्लिष्ट समस्यांची उकल करण्यासाठी लागणारा चिवटपणा, त्याच्या विधानांचा समयोजितपणा व संयतपणा श्रोत्यांच्या प्रत्ययास येत असे.'  (उद्धृत, कुन्हीकृष्णन, २२८).  त्या काळात सत्तारूढ बाकांवरचे ते सर्वोत्तम वत्तेफ् ठरले होते.  सभागृहातच नव्हे, तर बाहेरसुद्धा वक्तृत्व हे चव्हाणांच्या नेतृत्वाचे मौलिक साधन झाले होते.  श्रोत्यांसमोर लांबलचक प्रवचने ते कधीच झोडीत नसत.  मोजके आणि प्रसंगोचित तेवढेच बोलत.  हँजेन यांनी एक मार्मिक तुलना केली आहे, ते म्हणतात, 'मुलींच्या शाळेचे उद्घाटन असेल, तर चव्हाण स्त्रीशिक्षण विषयावर बोलतील, मोरारजी कदाचित आत्मसुखत्यागाचे बोधामृत अशा प्रसंगी पाजतील, तर नेहरू आपण कशाचे उद्घाटन करतोय, हेच साफ विसरून अणुबॉम्ब-चाचणी आणि आशियाचे भवितव्य असल्या विषयावर विचार मांडतील.' (हँजेन, १४३).

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org