यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १४

या वैचारिकतेतून चव्हाणांना अनेक लाभ झालेले आढळतात.  एक तर प्रश्न कोणताही असो, त्यातल्या मूलभूत मुद्यांचे त्यांना चटकन आकलन होत असे आणि त्यांच्या आधाराने स्वतंत्रपणे निर्णय घेणे त्यांना शक्य होत असे.  विद्यार्थि-आंदोलन, नक्षलवाद, प्रादेशिक-भाषिक-धार्मिक पिसाटपणा वगैरे प्रश्नांची यशवंतरावांनी केलेली मांडणी या संदर्भात लक्षणीय ठरते.  दुसरे असे, की कोणत्याही प्रसंगाकडे व्यापक व साक्षेपी दृष्टीने पाहणे त्यांना शक्य झाले होते.  त्यांच्या नेतृत्वाचा प्रादेशिक पाया किंवा मराठी माणसाच्या मनात काही ऐतिहासिक कारणांनी पक्की पेरून ठेवलेली आत्मकेंद्रितता यांच्या मर्यादा ते आपल्या वैचारिक प्रगल्भतेतूनच ओलांडू शकले.  मराठी अस्मिता आणि राष्ट्रनिष्ठा यांत त्यांना कधीच अंतर्विग्रह जाणवला नाही.  तिसरा लाभ असा, की या त्यांच्या व्यासंगामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वात, इतर चंचल व शब्दशूर नेत्यांच्या तुलनेने, घनगंभीर संयम आणि लोभस अबोलपणाही प्रादुर्भूत झाला असावा.  शिवाय, जातीयतेकडे स्वाभाविक कल असणा-या राजकारणाला जात्यतीत करण्याची निकडही त्यांना या परिपक्वतेतून भासली असावी.  परिणामी खालच्या पातळीवरचे कुटिल कपट-कारस्थान किंवा आपमतलबी छक्केपंजे असे स्वरूप त्यांच्या राजकारणाला कधीच आले नाही.  त्यांचे व्यक्तिमत्त्व व राजकीय चारित्र्य इतके तगडे विरोधक सामन्याला असतानादेखील, कधीच टीकास्पद ठरले नाही.  मराठीच नव्हे, तर भारतीय राजकारणातही त्यांच्या या निरपवाद शुचितेला बहुधा तोड नसावी.

संसदीय नेतृत्व आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व

व्यक्तिमत्त्वाची ठेवणच वैचारिक आणि व्यासंगी अशी असल्यामुळे यशवंतराव कोणत्याही व्यासपीठावरून जे बोलत असत, ते अत्यंत मुद्देसूद, मर्मग्राही आणि प्रसंगोचित असायचे.  प्रसंगावधान व समयसूचकता बाळगणारा त्यांच्याइतका राजकीय पुढारी विरळाच !  मुख्यमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री वगैरे पदांवरून त्यांनी विधिमंडळांमध्ये जी वेळोवेळी भाषणे केली, त्यातून त्यांचे संसदीय नैपुण्य पुरेपूर व्यक्त होते.  विरोधी पक्षसदस्यांना विश्वासात घेण्याचे त्यांचे आपले स्वतःचे खास तंत्र होते.  ज्या खात्याचा प्रभार त्यांच्याकडे असायचा, त्याच्याशी संबंधित सर्व प्रश्नांचा व बाजूंचा ते सूक्ष्म अभ्यास करीत असत.  विधिमंडळाच्या कामकाजात ते मनःपूर्वक सहभागी होत असत.  पूर्वतयारी पुरेशी नसणे, उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून देणे, विरोधकांचा अकारण अधिक्षेप करणे वा अरेरावी करणे असे प्रकार त्यांच्या संसदीय कारकीर्दीत त्यांच्या हातून सहसा घडले नाहीत.  ते एक मातब्बर संसदपटू असल्याची साक्ष त्यांच्या अनेक समकालीनांनी दिली आहे.  

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org