यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ११५

तरुण मराठा वर्ग तत्त्ववैचारिकदृष्ट्या असंस्कारित होता, कृषिऔद्योगिकीकरणातून त्याची आर्थिक स्थिती सुधारली होती, झपाट्याने झालेल्या शैक्षणिक विकासातून तो पदवीधर झाला असला तरी बौद्धिक क्षेत्रात फारशी रुची त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली नव्हती.  काँग्रेस ज्या स्पर्धात्मक एकसंधतेवर उभी होती तिच्या आधारे लाभणा-या सत्तापदांवर त्याचे समाधान होणारे नव्हते.  स्वातंत्र्योत्तरकाळात जन्म घेऊन लहानाचा मोठा झाल्यामुळे फुले-शाहू-भाऊराव पाटील प्रभृतींच्या ध्येयवादाशी या वर्गाला देणे-घेणे नव्हते.  राजकारणातील चलनी प्रतीके एवढेच त्याच्या लेखी त्यांचे महत्त्व होते.  संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात लोकप्रिय झालेली शिवाजी महाराजांची प्रतिमाही त्याच्या दृष्टीने तेवढ्यापुरतीच होती.  ब्राह्मणविरोधी धारणा मनात तीव्र असल्या तरी 'ब्राह्मणां'चा कोणताच दोष त्याने स्वतःपासून दूर ठेवलेला नव्हता.  जुने मराठे व नवे मराठे यांच्यातील हे अंतर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भ व मराठवाडा या गावांत अधिक प्रत्ययकारीपणे पुढे आले.  नव्यांना सामावून घेणा-या पायाभूत संधीची कमतरता आणि धाक वाटावा अशा नेतृत्वाचा अभाव ही त्याची दोन कारणे संभवतात.  पण एवढे खरे की प्रस्थापित राजकारणाला पर्याय शोधत निघालेल्या त्या तरुण रक्ताने जे पर्याय जवळ केले त्यात विचारपूर्वकतेपेक्षा भावनिकतेचा व उतावीळपणाचाच भाग अधिक दिसून आला.  शरद पवारांकडून अवसाधनघात होत असल्याचे जाणवताच मोठ्या प्रमाणावर मराठा तरुण शिवसेनेकडे किंवा शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे वळले.  अल्पावधीत या दोन्ही संघटनांची ताकद त्यामुळे अपेक्षेबाहेर वाढली.

शिवसेनेला वसंतसेना म्हणून ओळखले जाण्याइतपत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त तिला लाभला होता; पण तोपर्यंत ती मुंबईपुरती आणि केवळ दाक्षिणात्त्यांच्या विरुद्ध होती.  पुढे मात्र तिचा भौगोलिक विस्तार आणि राजकीय प्रभावक्षेत्र विस्तारत गेले.  काँग्रेसमधील गटांचे शह-काटशहाचे राजकारण जसे याला कारणीभूत आहे; तसेच पक्षावरची शहरी श्रीमंतांची पकड सैल करण्यासाठी ग्रामीण काँग्रेसश्रेष्ठींनी खेळलेल्या चालीही वेळोवेळी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्या आहेत.  काँग्रेसने धर्मनिरपक्षतेचे धोरण निष्ठापूर्वक न सांभाळल्यामुळे कथित धर्मनिरपेक्ष काँग्रेसमधून सांप्रदायिक शिवसेनेत किंवा भारतीय जनता पक्षात जाताना कार्यकर्त्यांना फारशी अडचण कधीच वाटली नाही.  दलितांशी सहकार्याचे राजकारण करीत असताना बौध्देतर दलितांकडे काँग्रेसने दुर्लक्ष करणेही शिवसेनेला फायद्याचे झाले.  मातंग, चांभार वगैरे जाती हिंदुत्वाच्या चौकटीतच राहिल्यामुळे सांप्रदायिक पक्षाच्या गळाला त्या सहज लागल्या.  अर्थात काँग्रेसएवढेच हे अपयश रिपब्लिकन पक्ष आणि दलित पँथर यांचेही आहे.  मुंबई-पुणे-नाशिक पट्याचे वेगाने औद्योगीकरण झाले.  त्यामुळे मोठी कामगारशक्ती तिथे अस्तित्वात आली.  ती शक्ती प्रारंभी साम्यवादी-समाजवादी पक्षांशी संलग्न होती.  महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासूनच काँग्रेसने डाव्या राजकीय शक्तीच्या खच्चीकरणाचा विडा उचलला होता.  'लोकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, अन्यथा राज्यात साम्यवादी वर्चस्वाचा धोका संभवतो, कारण संयुक्त महाराष्ट्र समिती जरी अनेक विरोधी पक्षांची आघाडी असली तरी तिचे प्रमुख सूत्रधार कम्युनिस्ट पुढारीच आहेत,' अशी जोरदार भूमिका यशवंतरावांनी घेतलीच होती, तीच पुढे नेते त्यांच्या राजकीय वारसदारांनी कामगार क्षेत्रातून साम्यवादीसमाजवाद्यांना हद्दपार करण्यासाठी चक्क शिवसेनेला हाताशी धरले.  खुद्द समितीतही साम्यवादविरोधी लाट उफळल्यामुळे काही प्रजा समाजवाद्यांनीही शिवसेना जवळ केली.  वेळोवेळी शिवसेनेने आपले लक्ष्यगट बदलले.  प्रारंभी दाक्षिणात्य भारतीय, पुढे दलित आणि त्यानंतर मुस्लिम यांना त्यांनी टीकेचे विषय बनवून क्रमशः मराठी माणसे, सवर्ण समाज व हिंदू जनता यांना आपल्या पाठीशी खेचून आणण्यात यश मिळवले.  आज जरी शिवसेना शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आणण्याची भूमिका जाहीरपणे मांडत असली, तरी जातीच्या प्रश्नाबाबत किंवा जातिनिर्मूलनाच्या कार्यक्रमाबद्दल तिला फार प्रामाणिक कळकळ किंवा आस्था वाटते असे मुळीच नाही.  केवळ व्यावहारिक व तात्कालिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सुसंगत तत्त्ववैचारिक भूमिका घेणे शिवसेनेला कधीच जमले नाही.  शिवसेनेचे सावट महाराष्ट्रावर ओढवले याचे सर्वात मोठे अपश्रेय अर्थातच यशवंतरावांनी वाढवलेल्या महाराष्ट्र काँग्रेसला द्यावे लागते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org