यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १११

साठोत्तर दशकाच्या मध्यावर शिक्षणाच्या क्षेत्रात जाणवणारा सर्वात ठळक बदल असा सांगता येईल, की शिक्षणाची शहरी अभिमुखता बदलून त्यास ग्रामीण अभिमुखता प्राप्त झाली.  शिवाजी विद्यापीठाची स्थापना या दृष्टीने प्रतीकात्मक महत्त्वाची म्हणता येईल.  यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांचा याकामी पुढाकार होता.  मराठा कुणबी अभिजनांच्या उपक्रमशीलतेला खुले करून दिलेले, कधीकाळी विरोधी पक्षांच्या कह्यात असलेले क्षेत्र असे महत्त्व उच्च शिक्षणाला प्राप्त झाले.  ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांचा ओघ काँग्रेस पक्षाकडे खेचून आणण्याच्या दृष्टीने याचा बराच उपयोग झाला.  सार्वजनिक संसाधनांपर्यंत पोचण्याचा एक राजरोस व प्रतिष्ठादायी मार्ग त्यांना या शिक्षणविस्तारात दिसला असावा.  त्यामागे शिक्षणाबाबतची आस्था असण्यापेक्षा शिक्षणसंस्थांचा आश्रयदाता असण्यातून लाभणारे राजकीय महत्त्व मिळवण्याची आकांक्षाच मोठी होती हे उघडच असले तरी माध्यमिक शाळा, महाविद्यालये यांच्या संख्येत या उपक्रमशीलतेमुळे अभूतपूर्व प्रमाणात वाढ झाली.  

मराठी भाषकांचे राज्य झाल्यावर मराठी भाषेचा सर्वांगीण विकास व्हावा, मराठी राजभाषा होऊन राज्याचा संपूर्ण कारभार मराठीतून चालावा, विद्यापीठ पातळीपर्यंत सर्व विषयांची दर्जेदार पुस्तके मराठीतून तयार करून रास्त किमतीत संबंधितांना उपलब्ध करून द्यावीत, शासन-प्रशासनाचे व्यवहारकोश, तसेच सर्व अभ्यासविषयांचे परिभाषाकोश सरकारी पुढाकाराने तयार केले जावेत, दर्जेदार मराठी ग्रंथ व नियतकालिकांना भरघोस अर्थसहाय्य व पुरस्कार दिले जावेत, अभिजात ग्रंथांची आवर्जून मराठीत भाषांतरे तयार करून प्रकाशित करावीत, अशा अनेक योजना यशवंतरावांच्या कारकीर्दीत सुरू झाल्या होत्या.  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना करून वरीलपैकी अनेक जबाबदा-यांसोबतच मराठीतून अनेक खंडात्मक विश्वकोश साकार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही त्या मंडळाकरवी अमलात आणला होता.  महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाची स्थापना करून ज्ञानविज्ञानाच्या सर्व विषयांवरची दर्जेदार क्रमिक पुस्तके तज्ज्ञांकडून लिहून प्रकाशित केली होती.  पदवी व पदव्युत्तर पातळीवरील अनेक महत्त्वाचे ग्रंथ मंडळाने तयार केले होते.  शेकडो उत्तम ग्रंथांची भाषांतरे मराठीत त्या काळात आली.  महात्मा फुले समग्र वाङ्मयाची स्वस्त आवृत्ती तसेच फुले आणि आंबेडकरांच्या साहित्याचे संपादन-प्रकाशन अशा महत्त्वाच्या कामगि-याही सरकारी यंत्रणांकरवी समाधानकारकपणे केल्या गेल्या आहेत.  थोडक्यात असे म्हणता येईल की भाषिक घटकराज्याने आपल्या भाषेच्या संवर्धन-समृद्धीसाठी, तिच्या अंगी नव्या विज्ञान-तंत्रज्ञानादी विषयांतील सकारात्मक आव्हाने पेलण्याची ताकद यावी अशी दृष्टीने आणि प्रशासन न्यायालयांपासून तमाम ज्ञानक्षेत्रांपर्यंत तिचा प्रभावी वापर शक्य करण्यासाठी जे जे करणे आवश्यक होते त्या सर्व बाबींची सुरुवात यशवंतरावांच्या महाराष्ट्राने केली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org