यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ११

पुढे काही काळाने यशवंतराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव झाले, १९५२ च्या निवडणुकांनंतर नागरी पुरवठा व स्थानिक स्वराज्य खात्याचे मंत्री झाले.  या प्रत्येक वेळी मोरारजींच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला.  एवढेच नव्हे, तर भाषावार प्रांतपुनर्रचना झाल्यानंतर जेव्हा द्वैभाषिक मुंबई राज्य करायचा निर्णय वरिष्ठ काँग्रेस-नेत्यांनी घेतला, तेव्हा त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर यशवंतराव येण्यालाही मोरारजी देसाईच कारणीभूत झाले.  मोरारजींना असा हट्ट धरला, की मुख्यमंत्रिपदावर आपली निवड व्हायची, तर ती अविरोधच झाली पाहिजे.  आपल्याविरुद्ध जर कोणी उमेदवार उभा राहिला, तर आपण निवडणुकीतून बाहेर पडू.  त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रातल्या प्रश्नावर जनभावना खूप तीव्र झालेल्या होत्या.  मोरारजी हे संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक असल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे मत त्यांच्या विरुद्ध संतप्त होते.  अशा परिस्थितीत आपली अविरोध निवड होऊ शकेल, असे मोरारजींना वाटावे, याला राज्यातील राजकीय वस्तुस्थितीचा मुळीच आधार नव्हता; पण ते आपल्या आग्रहावर अडून होते.  काही अंशी त्यांचा तो अहंकारच होता.  भाऊसाहेब हिरे त्यावेळी मराठी जनतेत लोकप्रियतेच्या शिखरावर होते, कारण ते संयुक्त महाराष्ट्रवादी होते.  त्यांनी मोरारजींविरुद्ध मुख्यमंत्रिपदाच्या निवडणूकस्पर्धेत उतरण्याचा निर्णय जाहीर केला.  मोरारजींनी आपले नाव मागे घेतले.  यशवंतराव चव्हाण निवडणुकीत उतरले.  मोरारजींनी आपला दुराग्रह सोडला असता, तर गुजराती आमदारांच्या पाठिंब्यावर भाऊसाहेब हिरेंना पराभूत करूनही त्यांना निवडणूक जिंकता आली असती.  यशवंतराव त्याच पाठिंब्याच्या आधारे भाऊसाहेब हिरेंना शह देण्यात यशस्वी झाले.

मोरारजींच्या या अप्रत्यक्ष अनुग्रहाने का मिळालेले असेना, द्वैभाषिकाचे मुख्यमंत्रिपद चव्हाणांनी आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावरच निभावले.  ते पद म्हणजे मोठीच जोखीम होती; पण यशवंतरावांनी ती अवघड जबाबदारी कुशलपणे पार पाडली.  प्रक्षुब्ध जनमताच्या झंझावाताला यशस्वीपणे तोंड देत त्यांनी द्वैभाषिकाची नौका सहीसलामत संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीच्या किना-याला लावली.  संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर त्यांनी आधीच आपल्या कर्तबगारीच्या बळावर दावा प्रस्थापित केला होता आणि त्या पदावर आपला कायमचा ठसा उमटविणारी त्यांची कारकीर्द पाहून नेहरूंनी अत्यंत संकटाच्या क्षणी त्यांच्यावर देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची अवघड जबाबदारी विश्वासाने सोपवली होती.  गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान अशी पदे यशवंतरावांनी केंद्र सरकारात सांभाळली आणि अखेरचे पद वगळता बाकीच्या पदांच्या कारभारावर त्यांनी स्वतःच्या व्यक्तित्वाची व नेतृत्वगुणाची छाप पाडली होती.  आयुष्यात प्रत्येक पद जणू एकेक प्रचंड आव्हान घेऊनच यशवंतरावांच्या पुढ्यात उभे ठाकले होते आणि त्यांनी आपल्या कमावलेल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या आव्हानांवर यशस्वी मात करण्याची मर्दुमकी गाजवून टीकाकार-विरोधकांनाही चकित करून सोडले होते.  परिणामी त्यांचा लौकिक 'संकटमोचक नेतृत्व' (मॅन ऑफ क्रायसिस') असा झाला असल्यास नवल नाही.  प्रत्येक पदासोबत आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यातूनच जणू त्यांच्या नेतृत्वाला नवनवे आयाम प्राप्त होत गेले.  जबाबदा-यांच्या वाढत्या ओझ्यानुसार त्या पेलणा-या त्यांच्या बाहूंचे बळ वृद्धिंगत होत राहिले.  आधीच्या प्रत्येक पदाने त्यांची पुढील नव्या पदासाठीची पूर्वतयारीच जणू करून दिली होती !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org