यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १०४

६.  यशवंतरावांनंतरचा महाराष्ट्र

१९५६ पासून द्वैभाषिक राज्याचे आणि मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगून यशवंतराव केंद्रसरकारात संरक्षणमंत्री म्हणून गेले.  सहा वर्षे त्यांनी या राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली.  ते येथून गेल्यानंतरच्या या राज्याच्या वाटचालीचा ऊहापोह करणे हे प्रस्तुत प्रकरणाचे प्रयोजन आहे.  विशेषतः संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला तेव्हा त्यांनी जे आदर्शचिंतन नव्या राज्याच्या संदर्भात केले होते, आणि मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या अल्पस्वल्प कारकीर्दीत ते आदर्शचिंतन प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने जी ठोस पावले पक्ष, प्रशासन, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण-साहित्य-संस्कृती इत्यादी आघाड्यांवर उचलली होती त्यांचे त्यांच्या पश्चात काय झाले हे पाहणे, त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तसे होण्याची कारणीमीमांसा करणे असाही प्रयत्न येथे केला आहे.  

भारतीय लोकशाही क्रांतीचा महिमा ज्यांच्या जीवनातून नजरेत भरतो, ज्यांच्या जीवनात भारताच्या वर्तमान युगाचा गर्भितार्थ अधिक सखोलपणे सूचित होतो आणि तमाम युगप्रेरणा, ध्येयवाद, स्थित्यंतरे व घडामोडी यांचा ध्वन्यर्थ ज्यांच्या जीवनात प्रत्ययास येतो अशा अत्यंत मोजक्या व्यक्तींपैकी यशवंतराव होते अशा आशयाचे विधान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले होते.  समस्यांचे आव्हान स्वीकारणे आणि त्या सोडविणे असा अव्याहत क्रम यशवंतरावांच्या आयुष्यात दिसून येतो.  यशवंतरावांचे हे मोठेपण वादातीत असले तरी त्यांच्यावर सर्व सद्गुणांचे आरोपण करून त्यांची विभूतिपूजा करणे येथे अभिप्रेत नाही.  किंबहुना त्यांच्या गुणांइतकेच त्यांचे दोषही मोठे होते.  त्यांच्या हातून अनेक गंभीर चुका घडल्या हे लपवण्याचे काहीच कारण नाही.  दुसरे असे की, यशवंतरावांनंतरच्या महाराष्ट्राचे सिंहावलोकन करताना एका व्यक्तीच्या कर्तुमकर्तुम शक्तीनुसार इतिहास निर्णायक वळणे घेतो असे येथे गृहीत धरलेले नाही.  यशवंतराव १९६२ नंतरही महाराष्ट्राचे प्रत्यक्ष सूत्रधार राहिले असते तर फार काही निराळे येथे घडले असते असेही नाही.  तरीपण काही माणसे अशी असतात, की ऐतिहासिक वाटचालीत त्यांचे स्थान मैलाच्या दगडाचे असते.  त्यांच्या आधीचा कालखंड त्यांनी विस्मरणात टाकलेला असतो, वर्तमानाला निर्णायक वेगळे रूप देऊन भविष्यकाळाचा इसार दिलेला असतो.  महाराष्ट्राच्या संदर्भात अशा एकाच माणसाचे नाव सांगायचे झाल्यास ते यशवंतराव चव्हाण याखेरीज दुसरे असणार नाही.  म्हणूनच त्यांच्यानंतरच्या महाराष्ट्राच्या वाटचालीची त्यांच्या निकषांवर तपासणी केल्यास ते अनाठायी होणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org