यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १०३

-आणि खुद्द साहित्यिक संदर्भात जरी विचार केला, तरी या साहित्याचे योगदान त्यांच्या मते मोलाचेच आहे.

''आदिवासी व उपेक्षित जाती यांची भाषा आता नव्या मराठी भाषेत येणार आहे.  हे सामुदायिक चयन किंवा देवाणघेवाण भाषेच्या दृष्टीने उपयुक्त आहे.  त्याने मराठी भाषा समृद्ध होईल.  म्हणून दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी वाटली, तरी तिचा कस, तिच्यातील राग, जर नव्या मराठीत उतरली, तर ती हवीच आहे.'' (कित्ता, २११) अशा भूमिकेतून जाणकारांनी व सामान्य वाचकांनी दलित साहित्याविषयी स्वागतशील वृत्ती ठेवावी, असा सल्ला यशवंतराव देतात.

दलित साहित्याचे अंतरंग असे आस्थापूर्वक उलगडून दाखविणारे यशवंतराव साहित्याचा विचार संकुचित दृष्टीने करीत होते, असा ठपका मात्र कुणीच ठेवू शकत नाही, किंवा त्यांना मराठी भाषेचा अभिमान असला, तरी त्यांची भूमिका संकुचित प्रदेशाभिमानाची ठरवणेही कुणालाच शक्य नाही.  भारतीय भाषा-भगिनींमधील आदान-प्रदानातून मराठी साहित्यात अखिल भारतीयत्व यावे, ऐतिहासिक अपघाताने जे आपल्या मनाचे पश्चिमीकरण झाले आहे, त्यातून संभवणारे एकारलेपण घालवण्यासाठी आशियाई व आफ्रिकी साहित्याचा तसेच संपूर्ण विश्वसाहित्याचा योजनापूर्वक, व्यापक व सखोल अभ्यास साहित्यिकांनी करावा, अशी आवाहने त्यांनी केली आहेत, हे या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे.

''भारतीयता, विश्वात्मकता व मराठीपणा हे तिन्ही गुण एकाच वेळी नांदले, तरच आपले साहित्य समृद्ध होईल, त्यात भिन्न रुचित्व येईल, इंद्रधनुष्याची प्रभा त्यावर पसरेल, असा त्यांना विश्वास वाटतो.'' (कित्ता, २१३).

अशाप्रकारे कलावंताची तरल संवेदनक्षमता, सर्जनशील नवनवोन्मेषशाली प्रतिभा, शब्दशक्तीच्या समर्थ किमयेच्या क्षमतेचे परिपूर्ण भान, व्युत्पन्न मती आणि उदंड व्यासंग, साहित्याबद्दलची चाखंदळ जाण आणि साहित्य व समाज यांच्यांतील अन्योन्याश्रयी नात्याचे यथार्थ भान, चतुरस्त्र अनुभवसंपन्नता आणि आस्वादक समीक्षाबुद्धी इत्यादी दुर्मिळ गुणांचा समुच्चय यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात होता.  अव्वल दर्जाच्या कलाकृतीसाठी लागणारा कच्चा मालमसाला असा त्यांच्या ठिकाणी भरगच्च असल्यामुळे साहित्यक्षेत्रात ते प्रचंड मोठी कामगिरी करू शकले असते.  पण राजकारणाच्या गदारोळात उभी हयात गेल्यामुळे हे ते करू शकले नाहीत.  त्यांच्यातल्या कलावंत-लेखकाने योजलेले अनेक आराखडे मनातल्या मनातच राहून गेले.  हे सर्व पाहिल्यावर ना. सी. फडक्यांनी त्यांच्या लेखणीबद्दल म्हटले आहे, तेच पटते.

''भावनेनं ओथंबलेलं, प्रभावी भाषेनं नटलेलं लेखन जी लेखणी करू शकते, ती साधीसुधी लेखणी नाही.  श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातांत शोभावी, अशीच ती आहे.  यशवंतरावांच्या लिखाणाचा आस्वाद जेव्हा जेव्हा मी घेतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात येतं, यशवंतरावांच्या रूपानं महाराष्ट्राला पडलेल्या नेतेपणाच्या ओझ्यामुळे यशवंतरावांच्या ठिकाणी जो श्रेष्ठ साहित्यिक आहे, त्याचे पूर्ण कर्तृत्व प्रगट होत नाही, ही खेदाची गोष्ट मानावी लागेल.''

भावी काळात यशवंतरावांच्या हातून विपुल साहित्यलेखन होईल, असा आशावाद त्या वेळी फडक्यांनी व्यक्त केला होता.  किमान संपूर्ण आत्मचरित्राचे लेखन त्यांच्या हातून घडून ही अशा सफल व्हायला हवी होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org