यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १०१

लेखकाची बांधिलकी

लेखकाच्या बांधिलकीसंबंधी यशवंतरावांची भूमिका या संदर्भात नमूद करता येईल.  ते बांधिलकीचे समर्थक होते.  लिहिताना लेखकाला माणसांच्या प्रश्नांचे भान आणि जाण असणे, शोषित-दलित-उपेक्षित वर्गाच्या भवितव्याची ओढ आणि त्यांच्यावरील अन्यायाची चीड असणे- ही त्यांच्या मते उत्तम लेखकाची कसोटी असते.  त्यांच्या शब्दात,

- ''आपल्या देशात विषमतेचे, दारिद्र्याचे जे प्रश्न आहेत, शतकानुशतके उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे- या परिस्थितीच्या निर्मूलनाचा.  प्रतिज्ञा लिखणामागे आहे, की नाही, ही मी मूलभूत कसोटी मानतो.  ज्याला समाजाचे, सामान्य माणसाचे प्रेम आहे, अशा लेखकाच्या साहित्यातून समाज येणारच.  खरा साहित्यिक समाजापासून दूर असू शकत नाही.'' ('पुस्तक पुंढरी.' दिवाळी अंक १९८३, ३२).

सुंदर शब्द व प्रतिमा साहित्यात अवश्य असाव्यात.  पण 'हे शब्द व प्रतिमा यांच्या पाठीशी असलेल्या प्रेरणा या जीवनाच्या अनुभवावर अधिष्ठित आहेत, की नाहीत ?' हा प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो (कित्ता, ३३).  शंकरराव खरात, भालचंद्र नेमाडे, चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कादंब-या, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर यांची नाटके यांचा उदाहरणार्थ उल्लेख त्यांनी केला आहे.  कानेटकर यशस्वी नाटककार असले, तरी ही बांधिलकी त्यांच्यात आढळत नाही.  केवशसुतांचे वर्णन ते 'उत्स्फूर्त बांधिलकी असलेला मराठीतील पहिला आधुनिक कवी' अशी करतात (कित्ता, ३५).

त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कल्पनेचे रूढ कल्पनेहून असलेले वेगळेपणही यशवंतरावांनी स्पष्ट केले आहे.  कोणताही गट, किंवा पक्ष किंवा व्यक्ती यांच्याशी बांधून घेणे हा बांधिलकीचा अर्थ त्यांना मान्य नाही.  कारण अशा बांधिलकीतून त्यांच्या मते फक्त प्रचार-वाङ्मयच निर्माण होऊ शकते.  त्याला ते साहित्यच मानीत नसत.  स्वतःशी प्रामाणिक असलेल्या लेखकाची वैचारिक बांधिलकी त्याच्या उत्तम ललित कृतींमधून अवश्य उमटतेच.  ती बाहेरून आयात करता येत नाही वा कलम करण्याचा किंवा लादून घेण्याचाही प्रश्न नाही.  ती आतून यावी लागते.  उत्स्फूर्त वाङ्मयाच्या निर्मितीला जी प्रेरणा कारणीभूत होते, त्यात बांधिलकीची बीजे, त्यांच्या मते, अपरिहार्यतः असतातच, तेव्हा अमूक एकाच पक्षाचा वा विचारसरणीचा स्वीकार, म्हणजे बांधिलकी, हे समीकरणच चुकीचे आहे.

बांधिलकीचा संबंध संपूर्ण समाजजीवनाशी प्रामाणिक असण्याशी आहे.  विशिष्ट गटाशी वा पंथाशी केवळ नव्हे.  अशा प्रकारे यशवंतराव बांधिलकीला कोणताही विशिष्ट रंग देऊ इच्छीत नाहीत.  त्यांच्या मनातला बांधिलकीचा अर्थ अधिक व्यापक, विशिष्टतेपलीकडे जाणारा व मूलभूत आहे.  नारायण सुर्वेंच्या साहित्याला ते मानतात, याचे कारण ते मार्क्सवादी आहेत, एवढ्यापुरते सीमित नसून 'सुर्वे हे मानवी दुःखाने व्यथित होतात, त्यांच्या मनात त्वेष आहे' या कारणाने ते त्यांना लक्षणीय वाटते.  मार्क्सवादी असूनही प्रचारकी नसलेल्या साहित्याची उदाहरणे म्हणून त्यांनी मॅक्झिम गॉर्कीच्या 'मदर' या कादंबरीचे तसेच टॉलस्टॉयच्या 'वारॅ अॅण्ड पीस' या कादंबरीचे उदाहरण दिले आहे ('पुस्तक पंढरी', ३७).  अन्यत्र ते म्हणतात,

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org