२१ तारखेला एक दिवसाचा संप करून विधानसभेवर मोर्चा नेण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या आधी एक दिवस अगोदर मुख्यमंत्री मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी लोक बिथरतील अशी भाषणे केल्यामुळे, विधानसभेवरील मोर्चा अनर्थकारक होईल अशी एस. एम. यांना धास्ती वाटली. मोर्चा विधानसभेवर येत असल्याचे कळताच त्यांनी नौशेर भरूचा आणि अमूल देसाई यांना बरोबर घेऊन तो चौपाटीकडे वळवला. तिथे त्यांनी व डांगे यांनी ठरवले, की संप बेमुदत झाला तर मराठी व गुजराती असा संघर्ष होईल व ते बरोबर नाही. म्हणून या दोघांनी दुस-या दिवशी कामाला जाण्याचे आवाहन केले. यामुळे अनर्थ टळला. कुंटे यांनी लिहिले आहे की, जे एस. एम., भरूचा व अमूल देसाई यांनी केले ते शंकराराव देव, हिरे, देवगिरीकर यांनी करायला हवे होते. कुंटे यांनी याबद्दल शंकररावांना विचारले तेव्हा आपण आदल्या दिवसापासून उपोषण सुरू केल्याचे कारण त्यांनी दिले. पण मोर्चाच्या ठिकाणी न जाण्याइतके तुम्ही अशक्त झाला नव्हता, असे उत्तर कुंटे यांनी दिले. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे देव यांचे नेतृत्व तेव्हाच संपुष्टात आले. मग संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन होऊन तिच्याकडेच नेतृत्व गेले.
या त्रिराज्य योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंत्री राजीनामे देतील, मुख्यत: हिरे देतील असे शंकररावांनी एस. एम. यांना सांगितले होते. पण राजीनाम्यासारखी कोणी कृती करायची नाही व विरेधी पक्षांबरोबर जाऊन काही करायचे नाही असा आदेश काँग्रेसश्रेष्ठींनी दिल्यावर विधानसभेतील या योजनेवरील चर्चा तहकूब करण्याची सूचना हिरे यांनी मांडली आणि राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे न देता, प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे देण्याचे नंतर ठरले. म्हणजे हे पाऊलही चुकीचे पडले. चर्चा तहकुबीला काँग्रेसश्रेष्ठींनी अनुमती दिल्यामुळे आता राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचे मत यशवंतरावांनी दिले. मंत्र्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय झाल्याचे देवगिरीकर यांनी चिंतामणराव देशमुख यांना घाईने कळवले म्हणून त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तो बराच गाजला. तो देताना केलेल्या भाषणात त्यांनी नेहरूंवर बरीच कडक टीका केली आणि महाराष्ट्राबद्दल आकस असल्याचा आरोप केला. पण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे राजीनामे आले नाहीत आणि आपली फसगत झाली म्हणून देशमुख उद्विग्न झाले.
त्रिराज्य योजनेला मंजुरी देणा-या ठरावावरील विधानसभेतील चर्चा, तहकूब करण्याची सूचना काँग्रेसश्रेष्ठींनी मान्य केल्यावर राजीनामे देण्याची गरज नाही, अशी भूमिका यशवंतरावांनी घेतल्यामुळे शंकरराव देव संतापले. मग हिरे, कुंटे, देवगिरीकर शंकररावांना भेटायला गेले असता, देव हि-यांना म्हणाले, यशवंतरावांना काढून टाका. हे देवगिरीकरांनी यशवंतरावांना सांगितले. त्यावर यशवंतरावांनी शंकरराव देव यांना २३ नोव्हेंबर १९५५ रोजी लिहिले, “आपल्या इच्छेवरून भेटण्यास येण्यार होतो. दरमान्य माझी व श्री. मामा देवगिरीकर ह्यांची भेट झाली व त्यांच्याकडून व इतर स्नेह्यांशी जी चर्चा झाली तिचा सारांश समजला. विशेषत: माझ्यासंबंधी झालेल्या चर्चेनंतर तुमच्या उपोषणाच्या काळात मी आपल्याशी चर्चा करून आपणांस मनस्ताप देणे योग्य नाही असे मला वाटते. माझ्या स्वाभिमानाच्या दृष्टीनेही मी अधिक चर्चा करणे युक्त नाही असे मला वाटत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वीकारायच्या मार्गासंबंधात तुमच्या व माझ्यामध्ये स्वच्छ फरक आहे. हे परवा पुन्हा एकदा स्पष्ट झाले व पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टींची उजळणी करून आपणास त्रास द्यावा अशी माझी इच्छा नाही. काँग्रेसनिष्ठेतून अंती संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल असा माझा विश्वास आहे व याच मार्गाची चोखाळणी, शक्य त्या आत्मक्लेशांतून करण्याची मनाची तयारी केली आहे.” (संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, पृष्ठे १०९, ११०) हा मार्ग थोड्याच दिवसांत जाहीररीत्याच वेगळा झाला. यशवंतरावांनी आपल्या स्वाभिमानाच्या दृष्टीने शंकररावांना भेटणे युक्त वाटत नसल्याचा उल्लेख केला आहे. तो कां? याबद्दल य. दि. फडके यांनी चौकशी केल्यावर शंकररावांनी यशवंतरावांसंबंधी अशिष्ट भाषा वापरल्याचे कळून आले. तिचा इथे पुनरूच्चार करण्याचे कारण नाही. यानंतर शंकररावांनी यशवंतरावांची माफी मागितली, पण तीत अर्थ नव्हता.
त्रिराज्य योजना जनतेने उग्र निदर्शने करून धुडकावून लावली होती. पोलिसांनी अनेक कठोर उपाय योजले. अनेकदा गोळीबार झाला आणि अनेकांचा बळी जात होता. कित्येक तुरूंगात गेले. मोरारजीभाईनी काहीही समजुतीने न घेण्याचा पण केल्याचे दिसले. पुढे दादर इथे लोकांची निदर्शने चालू असता एका पोलिसाचा जीव धोक्यात येत असल्याचे कळताच, त्याला संरक्षण देण्यास पुन्हा एस. एम.च आले. त्यांच्या या कृत्यामुळे संघर्षाला हिंसक वळण लागू नये यासाठी ते किती शिकस्त करत होते हे दिसून आले. पण याची जाणीव न ठेवता, सरकार मात्र दडपशाही कमी करत नव्हते. राज्यात अनेक ठिकाणी लोक निदर्शने करत होते, पण आंदोलनाचे मुख्य केंद्र मुंबई हेच होते.