यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १

दोन शब्द...

‘यशवंतराव चव्हाण:व्यक्तित्व व कर्तृत्व ’ हे पुस्तक यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाचकांसमोर ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. प्रथमत: अशी संकल्पना होती की, मुख्यत्वे करून यशवंतरावांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकणारी छायाचित्रे एकत्रित करून चित्ररूप चरित्राच्या स्वरूपात वाचकांपुढे ठेवावीत. त्याचबरोब या छायाचित्रांतून उलगडणा-या जीवनाचा अन्वयार्थ सांगण्याच्या दृष्टीने ‘यशवंतराव चव्हण:
व्यक्तित्व व कर्तुत्व ’ याचे निवेदन करणारी एक प्रस्तावना सुरवातीस असावी. त्या दृष्टीने एकीकडे उपलब्ध छायचित्रांमधून योग्य ती छायाचित्रे निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली व त्याचबरोबर यशवंतरावांचे निकटवर्ती आणि मराठीतील नामांकित पत्रकार व सिध्दहस्त लेखक श्री. गोविंदराव तळवलकर यांना चित्ररूप चरित्राची प्रस्तावना लिहिण्याची विनंती करावी असे ठरले. श्री. गोविंदरावांनीही या विनंतीस मान देऊन एक विवेचक प्रस्तावना अभ्यासपूर्वक लिहून दिली. त्यांचे वास्तव्य सध्या अमेरिकेत असते व प्रकृतीच्याही अनेक अडचणी आहेत. परंतु यशवंतरावांविषयीच्या आत्मीयतेमुळे या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी प्रस्तावनेच्या रूपाने यशवंतरावांचे एक संक्षिप्त तरित्रच लिहिले आहे. त्यामुळे आपणांसमोर जे पुस्तक येत आहे त्याचे स्वरूप चित्ररूप चरित्राऐवजी सचित्र चरित्र असे झालेले दिसेल. हा बदल वाचकांच्या पसंतीस उतरेल याची मला खात्री वाटते.

यशवंतरावांचे जीवन म्हणजे देवराष्ट्रेसारख्या एका लहान गावातील व गरीब घरातील मुलाने आपल्या कुटुंबीयांच्या व मित्रांच्या मदतीने परंतु प्रामुख्याने स्वत:च्या हिमतीने, बुध्दिमत्तेने व कर्तुत्वाने राष्ट्रीय नेतृत्वाचे शिखर गाठण्याची जी किमया केली त्याची लक्षवेधक कहाणी. श्री. गोविंदरावांनी य़शवंतरावांविषयीचे उपलब्ध साहित्य चिकित्सक नजरेने तपासून व काही नव्याने उपलब्ध झालेली माहीती नजरेखाली घालून प्रथमत: यशवंतरावांच्या देवराष्ट्रे व कराड येथील शालेय जीवनातील हकिकत मांडली आहे. तेथील भौगोलिक व ऐतिहासिक पाश्वभूमीही कथन केली आहे. आणि तसे करताना विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळातील महाराष्ट्रामध्यें विविध विचारप्रवाह प्रभावी होते व ज्यांचे संस्कार यशवतंरावांच्या संवेदनाशीलमनावर होत होते त्यांचाही अर्थपूर्ण आढावा घेतला आहे. यशवंतरावांना पहिला कारावास घडला तो ते मॅट्रिक होण्यापूर्वीच. त्यांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे हा कारावास म्हणजे त्यांच्यासाठी एक वैचारिक विद्यापीठ ठरले. त्यानंतर त्यांचे कोल्हापूरमधील महाविध्यालयीन शिक्षण व पुणे येथील कायद्याच्या पदवीसाठी केलेला अभ्यास आणि त्याच वेळी सातारा जिल्हातील १९४२ च्या चलवळीमधील सहभाग आणि या सर्व अनुभवांमधून यशवंतरावांची झालेली वैचारिक जडणघडण यावरही प्रकाशझोत टाकलेला आहे. यशवंतराव- वेणूताई विवाह, यशवंतरावांवर ओढवलेले कौटुंबिक आघात, १९४६ ची निवडणूक व त्या वेळचे मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या मंत्रिमंडळात संसदीय सचिव या पदावर यशवंतरावांनी केलेला प्रवेश, या सर्व घटना केवळ मालिकेप्रमाणे न मांडता त्या घटनांचा अन्वयार्थही सांगितलेला आहे.
 
भरताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतरावाच्या राजकीय जीवनानेही वेग घेतलेला दिसतो. विशेषत:फाझलअली आयोगाचा भाषावार प्रांतरचनेवरील अहवाल आणि त्यातून महाराष्ट्रात उठलेले वादळ, ‘महाराष्ट्र व नेहरू यांची निवड करण्याची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करीन’ असे यशवंतरावांचे विधान व त्यासाठी सोसावी लागणारी तीव्र टीका आणि तिथून व्दैभाषिक राज्याचे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा यशवंतरावांचा प्रवास आजच्या पिढीला फारसा फारसा परिचित नसला तरी आमच्या पिढीला तो ठळकपणे आठवणारा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांच्या भूमिका हा सर्व भाग मुळातून वाचला पाहिजे.

१९६२ च्या भारत-चीन संघर्षानंतर यशवंतरावांच्या जीवनाला एक वेगळे वळण मिळाले. आधीचे संरक्षणमंत्री श्री. कृष्ण मेनन यांच्या राजीनीम्यानंतर पं.नेहरूंनी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांची निवड केली व त्यानंतर २२ वर्षे कृष्णाकाठच्या यशवंतरावांनी यमुनातीरी दिल्लीच्या राजकारणात व्यतीत केली. हा सर्व कालावधी वाचकांसमोर जिवंत करताना श्री. गोविंदरावांनी यशवंतरावांचे मौलिक विचार, १९६९ मध्ये राष्ट्रपतींच्या निवडमुकीमध्ये झालेल्या गुंतागु्ती व समज-गैरसमज , १९७५ मध्ये आणीबाणीच्या वेळी यशवंतरावांची झालेली कुचंबणा आणि यशवंतरावांसारखा महाराष्ट्राचा नेता राष्ट्रच्या पंतप्रधानपदापर्यंत पोचला नाही याविषयी माणसाला वाटणारी खंत, या सर्व बाबी वस्तुस्थिताच्या प्रकाशात विवेकपूर्ण समालोचन करून मांडलेल्या आहेत. त्यांचे विवेचन किंवा निष्कर्ष सर्वांनाच मान्य होतील असे नाही. परंतु आपल्या भूमिका मांडताना त्यांनी सर्व ठळक उपलब्ध माहितीचा आधार घेऊन विवेचन केलेले आहे.