औद्योगिक वसाहतींची स्थापना हे एक प्रगतिशील पाऊल होते. या वसाहती स्थापन करण्यासाठी पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली होती, पण त्या वसाहतींत उद्योगधंदे स्थापन करण्याचे काम हे खाजगी गुंतवणूकदारांचे होते. राज्याच्या अविकसित भागांत लहान व मध्यम कारखानदारी वाढीला लागावी हा या मागे उद्देश होता. तसेच केवळ शेतीमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार नसून त्यास उद्योगधंद्यांची जोड मिळाली पाहिजे या दृष्टीने वसाहतींची कल्पना निघाली. या विधेयकांमुळे खरी अडचण समितीची झाली. कारण या विधेयकांत किरकोळ दुरुस्त्या सुचवण्यापलीकडे जाऊन विरोध करणे शक्य नव्हते.
दुसरी आघाडी होती मंत्रीमंडळाची. त्या आघाडीवर काम करताना गुजराती मंत्र्यांचा फार विरोध होणार नाही हे पाहावे लागत होते. ते कठीण गेले नाही. महाराष्ट्राच्या काही योजनांसाठी योजनेतील आर्थिक तरतूद वापरली न गेल्याचे आढळून आले. यशवंतरावांनी एक उदाहरण दिले आहे. मूंबई व पुणे या विभागांच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या, तरतुदींपैकी तीन कोटी रुपयांची रक्कम खर्च झाली नव्हती. हा प्रश्न मंत्रिमंडळापुढे आला तेव्हा तो कसा सोडवायचा, असे यशवंतरावांनी विचारले; तेव्हा गुजराती मंत्र्यांनी ती रक्कम पश्चिम महाराष्ट्रावर खर्च करण्यास अनुमती दिली. हे काम या रीतीने कौशल्याने पार पडले.
याप्रमाणे मुंबई राज्यातील वातावरण सुधारण्यात यशवंतराव यशस्वी झाले; हे त्यांचे विरोधक तसेच काँग्रेसश्रेष्ठी यांना मनोमन पटले होते. मुंबईतील व्यापार व उद्योग क्षेत्रांतील ज्या व्यक्ती महाराष्ट्राच्या संबंधात खरीखोटी भीती बाळगत होत्या किंवा तशी भीती असल्याचा बहाणा करत होत्या, त्यांचाही संशय दूर झाला. पण राज्य सुरळीतपणे चालणे, त्यात सलोखा राहणे ही गोष्ट निराळी. तथापि लोकांच्या मनाला लागलेली खरी बोच नष्ट झाली होती काय? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागत होते. याचा प्रत्यय मधूनमधून विधानसभेच्या पोटनिवडणुका होत किंवा नगरपालिकांच्या निवडणुकी होत तेव्हा येत असे. मराठवाड्यात ५७ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते. पण नंतरच्या काळात विधानसभेच्या पोटनिवडणुकांत यश आले नाही. पाच जिल्हा बोर्डांच्या निवडणुकांपैकी काँग्रेसला चार जिंकता आल्या. याचा अर्थ मराठवाड्यातही काँग्रेस दुर्बळ झाली होती. या निवडणुका व पोटनिवडणुकांची परिणती काय होणार, याची कल्पना पंडित नेहरू व गोविंदवल्लभ पंत यांना आली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी इंदिरा गांधी यांची निवड झाली होती. त्या अनेक राज्यांचे दौरे करत होत्या. महाराष्ट्राच्या काही भागाचा त्यांनी दौरा केला तेव्हा परिस्थितीचा अंदाज त्यांनी घेतला. यामुळे ५९ साल उजाडल्यावर या प्रमुख नेत्यांच्या द्वैभाषिकासंबंधीच्या विचारात बदल होऊ लागला. त्या सुमारास चीनने भारताच्या सीमेवर चालवलेल्या हालचाली, चिंता करण्यासारख्या होऊ लागल्या होत्या. देशातले वातावरण सीमेवरील घटनांमुळे कसे व किती बदलेल याची कल्पना येणे शक्य नव्हते, पण ते बदलेल असे मानण्यास जागा होती. लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका ६२ साली होणार होत्या. सध्याचे वातावरण असेच टिकले किंवा अधिक बिघडले, तर महाराष्ट्र व गुजरात हे काँग्रेसला भरघोस पाठिंबा देणारे विभागच हातचे जाण्याचा धोका काँग्रेसश्रेष्ठींना दिसू लागला असावा. यामुळे द्वैभाषिकाच्या फेरविचारास चालना मिळाली.
प्रतापगडच्या समारंभानंतर व निदर्शनांनंतर यशवंतराव दिल्लीला गेले असता, पंडित नेहरूंनी त्यांना हैद्राबाद इथे काँग्रेस महासमितीची बैठक होईल तेव्हा भेटण्यास सांगितले. याबद्दल वाच्यता होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. याप्रमाणे यशवंतराव नेहरूंना भेटले. या भेटीसंबंधी यशवंतरावांनीच लिहून ठेवले आहे. त्यावरून असे दिसेल की, नेहरूंनी त्यांना महाराष्ट्र व गुजरातमधील परिस्थिती कशी आहे; गुजरात व विदर्भातल्या काही व्यक्तींची नावे घेऊन त्यांच्याशी संबंध कसे आहेत; कारभारयंत्रणा कशी चालू आहे आणि अधिका-यांचा प्रतिसाद कसा आहे? असे प्रश्न विचारले. यशवंतरावांनी या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. कारभा-यांचा प्रतिसाद उत्तम असून विकासाची कामे होत आहेत, परंतु – इतके म्हणून ते थांबले. तेव्हा, ‘हे परंतु काय,’ असा प्रश्न नेहरूंनी विचारला. त्यास यशवंतरावांनी उत्तर दिले की, विकासाची कामे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी द्वैभाषिकाची गरज नाही अशी लोकभावना असून ते संतुष्ट नाहीत. इतके बोलून यशवंतरावांनी इतर मंत्र्यांशीही तुम्ही बोलणे बरे, तुम्हांला ते त्यांच्या मनातले सांगतील, अशी नेहरूंना सूचना केली. तेव्हा नेहरूंनी हसत सांगितले की, आपण अगोदरच काही मंत्र्यांशी बोललो असून त्यावरून तुमचे विश्लेषण बरोबर आहे. शासकीय दृष्ट्या द्वैभाषिक चांगले चालले आहे, पण राजकीय दृष्ट्या ते तसे नाही, हाच तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे ना? तुमच्या मनातले आहे हे खरे काय? त्यावर यशवंतरावांनी होकार दिला आणि आपल्या बोलण्यासंबंधी कोणाला काही कळू नये अशी इच्छा व्यक्त केली. (ऋणानुबंध, पृष्ठे ८८-९०)