तथापि दुस-या दिवशी सकाळी भाऊसाहेब यांच्याबरोबर नानासाहेब कुंटे, शंकररावांनी बोलावल्यावरून त्यांना भेटायला गेले. तिथे धनंजयरावही होते. मग शंकरराव म्हणाले की, काँग्रेसश्रेष्ठींनी आपली मागणी नाकारली तर दुसरा पर्याय सुचवावा. आयोगाने सुचवलेल्या द्वैभाषिकाच्याऐवजी विदर्भही सामील करून विशाल द्वैभाषिक बनवण्याचा हा पर्याय होता. म्हणजे सर्व गुजराती व सर्व मराठी भाषी एकत्र येतील. पाच वर्षानंतर काय अनुभव येतो तो पाहावा आणि वाटल्यास गुजरातने अलग होण्याची मागणी करावी. धनंजयरावांनी या पर्यायाचे समर्थन केले. कुंटे सांगतात की, या विशाल द्वैभाषिकाचा पर्याय मूळचा धनंजयराव यांचाच असावा. हिरे यांनी थोडे आढेवेढे घेऊन अखेरीस नवा पर्याय मान्य केला. कुंटे म्हणाले की, आपण काल ठरवले त्यापेक्षा हे वेगळे आहे, पण मुंबई मिळत असेल तर हा पर्याय आपण स्वीकारू. तथापि अगोदरचा निर्णय सर्वांनी घेतला असल्यामुळे नवा निर्णयही सर्वांनी घ्यावा अशी सूचना त्यांनी केली व ती मान्य होऊन दुस-या दिवशी पाटसकर यांच्या निवासस्थानी जमण्याचे ठरले. काकासाहेब गाडगीळ यांनीही मान्यता दिली, असे कुंटे यांनी लिहिले आहे.
पाटसकर यांच्या घरच्या बैठकीत नेहरूंची भेट घेण्याच्या वेळी जे होते त्यांना मग आमंत्रण देण्यात आले. चिंतामणराव देशमुखही पाटसकर यांच्याकडील बैठकीस आले होते. या बैठकीत देशमुखांनी नवा पर्याय योग्य ठरवला. त्यांचे म्हणणे असे की, यामुळे मराठी लोकांचे नव्या राज्यात चांगले बहुमत होईल आणि संमिश्र राज्यामुळे होणार नाही. धनंजयरावांनी यास दुजोरा दिला. यशवंतराव व इतर काहींनी विचारले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करायची असे ठरले असताना हा बदल कां करावा? एकभाषी राज्याचे तत्त्व सोडून द्वैभाषिक राज्य कां व कसे मागावे? आणि इतक्या घिसाडघाईने निर्णय कां घ्यावा? तथापि शंकरराव आपल्या शिष्टमंडळाचे नेते आहेत तेव्हा त्यांनी सुचवलेला पर्याय मान्य करावा, त्यास विरोध करू नये असे सर्वानुमते ठरले.(वाटचाल, पृष्ठे २०९-११) कुंटे यांनी अशी आठवण दिली आहे की, सर्वात प्रतिकूल प्रतिक्रिया यशवंतरावांनी दिली. तुम्हीच श्रेष्ठींकडे जा, आपण येत नाही असेही ते म्हणाले. तेव्हा त्यांची समजूत घालण्यात आली.
कुंटे यांनी जे लिहिले आहे त्यापेक्षा काकासाहेब गाडगीळ यांनी वेगळी हकिगत सांगितली आहे. त्यांनी आत्मचरित्रात विशाल द्वैभाषिकाची कल्पना आपण पूर्वी सरदार पटेल यांना सांगितली आणि सरदारांनी ती पसंत केली असे लिहिले आहे. आता पुन्हा त्यांनी प्रथम ढेबरभाईंना ती सांगितली व सरदारांचा हवाला दिला. मग काकासाहेबांनी देव, धनंजयराव व हिरे यांना आपली योजना समजावून सांगितली. ती त्या तिघांनी मान्य केली. हे कथन करून गाडगीळांनी काँग्रेसश्रेष्ठींच्या मनोवृत्तीचे आपले विश्लेषण ऐकवले. ते लिहितात, “ मी देव, हिरे व नानासाहेब (धनंजयराव) यांनी काय होईल याची चर्चा केली. मी म्हणालो, आपण मख्ख बसू. ही द्विभाषिक योजना गुजरात नाकारील. मुंबईचा पाटील लाथाडील. नेहरूंचा महाराष्ट्राला भयंकर विरोध आहे. त्यांचे पूर्वग्रह क्वचित नाहीसे होतात. ह्या परिस्थितीत जे नैतिकदृष्ट्या योग्य ते आपण मांडले आहे. त्यांनी नाकारले म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. माझ्या मते काही संकटातून जावे लागेल व शेवटी काँग्रेसश्रेष्ठी जुळवून देतील” (पथिक भाग २, पृ. ५६३)
हे कथन करण्यापूर्वी काकासाहेबांनी जी प्रस्तावना केली तीत काँग्रेसश्रेष्ठी अट्टल धूर्त क्लृप्तिबाज असून, सोयीप्रमाणे दृष्टिकोण बदलून राष्ट्रहिताच्या नावावर एखादा मुद्दा मांडीत व आमची गांधीभक्ती व काँग्रेसनिष्ठा यांचा भरपूर फायदा घेत अशी विधाने केली. गांधीइतकी नीतिमत्ता व श्रेष्ठ चारित्र्य एकाचेही नव्हते, राजकारण; त्यांना व्रत उरले नव्हते तर वृत्ती झाली होती. नेहरू इत्यादींबद्दल काकासाहेबांनी हे विचार बोलून दाखवल्यावर देव, हिरे, धनंजयराव यांपैकी कोणी विरोध केल्याचे नमूद नाही. तेव्हा कोणत्या मन:स्थितीत हे दिल्लीत चर्चा करत होते याची कल्पना येते. हे सर्व लिहिण्याचा उद्देश असा की, काही मराठी नेत्यांच्या या मानसिक भूमिकेचा उल्लेख फारसा झाला नाही. पण यावरून मराठी काँग्रेस नेत्यांचे आपापसात कसे संबंध होते आणि त्यांच्या काँग्रेसेश्रेष्ठींच्या संबंधीच्या भावना काय होत्या हे समजून यावे. काकासाहेबांची ही मते आणि देव यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्राची भाषा यांत काही तफावत नाही. नंतर जेव्हा मराठी नेत्यांचे शिष्टमंडळ आझाद, पंत इत्यादींना भेटले तेव्हा मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करता येणार नाही, असा निर्णय त्यांनी ऐकवला. त्यावर आपल्या योजनेचा अधिक विचार व्हावा अशी अपेक्षा मराठी नेत्यांनी व्यक्त केली.