यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३७

महाराष्ट्रातील काँग्रेस व समाजवादी बेचाळीसच्या आंदोलनात होते. ते भूमिगत तरी होते वा बंदिवान होते. तसेच महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांतल्याप्रमाणे व्यापक किसान चळवळ नव्हती. या खेरीज समाजवाद्यांचा भर मध्यवर्गीय आणि काही प्रमाणात कामगार यांच्यावर होता. तेव्हा तेही ऑम्वेट यांची अपेक्षा पुरी करू शकत नव्हते.

सातारा जिल्ह्यात ‘पत्री सरकार’ ची स्थापना करून ज्या प्रकारचे आंदोलन झाले, ते देशातील बदलत्या वातावरणात मागे घ्यावे अशी भूमिका यशवंतराव व त्यांचे सहकारी यांनी घेतली होती. तिचा वृत्तान्त ऑम्वेट यांनी दिला आहे.या भूमिकेला अच्युतराव पटवर्धन यांची संमती असल्याचे यशवंतराव व त्यांचे सहकारी यांनी सांगितल्याचाही उल्लेख त्या करतात. उलट दुस-या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका घेतली असता, अच्युतरावांनी ती मान्य केली असा उल्लेख वर आला आहे. यामुळे गैरसमज होण्याचा संभव आहे.

यासंदर्भात भाऊसाहेब नेवाळकर यांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची पाहणी करून, अच्युतरावांना दिलेल्या अहवालात काय म्हटले होते, हे पाहणे योग्य होईल. भाऊसाहेबांच्या अप्रकाशित आत्मचरित्रात पुढील मजकूर आहे. ‘गटागटांना भेटून व व्यक्तीश: मते समजावून घेऊन ती मी न्याहाळली आणि अहवाल अच्युतरावांना सादर केला. त्यामध्ये ही चळवळ थांबवावी व अशा (हिंसक) प्रकारच्या चळवळीला आळा घालावा अशी अनेकांना अप्रिय वाटणारी शिफारस केली—

क्रांतिकार्यात कित्येकदा अतिरेक होतो. अपेक्षेप्रमाणे किंवा योजल्याप्रमाणे घडते असे नाही. हातात शस्त्रास्त्रं आली; पैसाअडका हाती खुळखुळू लागला आणि त्यांचा प्रभाव समजला, तर तो दाखवून व वापरून, पाहिजे ते स्वार्थबुध्दीने साध्य करण्याची प्रवृत्ती बळावत जाते. पुढे लोकांचा आसरा संकोच पावत गेला व क्रांतीचे उधाण ओसरत गेले की, कित्येक तथाकथित क्रांतिकारक स्वसंरक्षणासाठी व आपले ध्येय विसरून; व्यवहारी व स्वार्थी बनतात आणि तत्त्वच्युत होतात. साता-याच्या बेचाळिशी क्रांतीची अशी शोकान्तिका होऊ नये म्हणून हे आंजदोलन आटोपते घ्यावे असे मी अहवालात सुचवले होते.

या अहवालावर विचारविनिमय करण्यासाठी मुंबईत संबंधित गटांच्या प्रमुखांना पाचारण करण्यात आले. अहवालातील शिफारशी बहुतेकांना मान्य होण्यासारख्या नव्हत्याच. तथापि या समाजविरोधी कारवायांना तसेच अमानुष शिक्षाप्रकारांना त्वरित पायबंद घालण्याचा आपला निर्णय जाहीर केला. अर्थात त्यामुळे काहीच्या मनात माझ्याबद्दल कटुता निर्माण झाली. मात्र अहवालात जे घडत होते असे म्हटले होते, त्याचा प्रतिवाद कोणी केला नाही. परिस्थितीत फारसा फरक पडला असे जरी म्हणता आले नाही; तरी बैठकीचा परिणाम काहीसा झालाही. निदान समाजकंटकांना दूर करण्यात आले, यात शंका नाही.’

इंग्लंडमध्ये १९४५ च्या जुलैत झालेल्या निवडणुकीत चर्चिल यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्ष पराभूत होऊन, अँटली यांच्या मजूर पक्षास भरघोस बहुमत मिळाले. मग भारतातही १९४६ मध्ये् निवडणूक झाली. यशवंतराव यांच्यासह चार उमेदवार काँग्रेस पक्षाने विधानसभेसाठी निश्चित केले. निवडणुकीत हे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने यशस्वी झाले. मग मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक ३० मार्चला होऊन बाळ गंगाधर खेर यांची नेतेपदी एकमताने निवड झाली. सरदार पटेल या वेळी हजर होते. नंतर दोन दिवसांनी यशवंतरावांना दोन मित्रांनी आपल्याबरोबर बाळासाहेब खेर यांच्याकडे नेले. खेर म्हणाले, की आपण तुम्हांला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही, पण संसदीय सचिव (पार्लमेटरी सेक्रेटरी) म्हणून तुमची निवड केली आहे. आपल्या कामाचा विचार करता हे पद योग्यतेचे नाही, अशी यशवंतरावांची प्रतिक्रिया असल्यामुळे आपल्याला लगेच कामावर हजर होता येणार नाही, असे सांगून यशवंतरावांनी निरोप घेतला. त्यांच्या मित्रांना यशवंतरावांच्या मनात काय असेल याचा अंदाज आणि नकार देण्यात चूक होईल, असे त्यांनी सांगितले. कराडला गेल्यावर मग यशवंतरावांनी होकार देण्याचे ठरवले. मुंबईला जाऊन नवी जबाबदारी स्वीकारण्यास यशवंतराव निघाले, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन होता. तेव्हापासून यशवंतरावांच्या संसदीय जीवनाला आरंभ झाला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org