यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २२

हे केवळ महाराष्ट्रतच घडले नाही, तामिळनाडूमध्ये जस्टिस पक्ष हाही ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत होता. त्याचाही पाया ढासळत गेला. सामान्य शेतकरी हा जोतिबांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी हा केंद्रबिंदूच दुर्लक्षित केला. जोतिबा व शाहू महाराज यांनी दलितांच्या उध्दारास प्राधान्य दिले होते. त्याचाही विसर ब्राह्मणेतर पक्षास पडला. या स्थितीत सत्यशोधक म्हणवणारे हे ‘सत्ताशोधक’ झाले, अशी संभावना केशवराव जेधे यांनी केली आणि त्यांच्याशी फारकत घेतली. यामुळे मसूरच्या परिषदेच्या विषयनियामक समितीत माधवराव बागल यांची शेतकरीहिताची उपसूचना अध्यक्षांनी झिडकारल्याबद्दल, यशवंतरावांना आश्चर्य व विषाद वाटला तर ते रास्तच होते. तसाच विचार केला तर देशाच्या अनेक भागांत शेतकरी जागा होऊन चळवळी करू लागला होता. गांधींच्या चळवळीच्या नंतर कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूत जंगल सत्याग्रह झाले. तर १९२६मध्ये कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली कामगार किसान पक्ष स्थापन होऊन, खंडकरी व शेतमजूर त्याने संघटित केले. यामुळे शेतक-यांना काही संरक्षण देण्यारे विधेयक सरकारने आणले आणि त्यास जमीनदारांनी केलेला विरोध मानला नाही. बिहारमध्ये शेतकरी अधिकच कंगाल होता. पण तिथल्या किसानसभेत एकवाक्यता नव्हती. त्यामुळे शेतकरी हीताचे कायदे होऊ शकले नाहीत. पण शेतकरी अस्वस्थ होते. उत्तरप्रदेशच्या प्रतापगड भागात किसानसभेची स्थापना १९१७ मध्ये झाली होती, पण तिच्या ख-या कार्याला आरंभ १९१९ मध्ये झाला. रामचन्द्रबाबा हा किसानसभेचा नेता होता. त्याच्या आंदोलनास काही वेळा हिंसक वळण लागत असे. पुण्याजवळच्या मुळशी इथे, धरण बांधण्याची योजना टाटा कंपनीने १९२१साली हाती घेतली व शेतक-यांच्या जमिनी काही किंमत देऊन घेतल्या. ही किंमत पुरेशी नसल्यामुळे जमिनी परत करण्याची मागणी करण्यात तात्यासाहेब केळकर व त्यांचा ‘केसरी’ पुढे होता. मग बाळूकाका कानिटकर, शंकरराव देव, सेनापती बापट, शिवरामपंत परांजपे हे पुढे होते. तडजोड होत नसल्यामुळे सत्याग्रह झाला; पण बापटांनी मालमोटारीच्या ड्रायव्हरवर गोळी झाडली. यामुळे आंदोलनाला वेगळे वळण लागले. तथापि कंपनीने जमिनीच्या किमती वाढवून दिल्यावर धरण झाले आणि पुढे वीजनिर्मिती होऊ लागली. या आंदोलनाबद्दल लिहिताना त्र्यं.र. ऊर्फ मामा देवगिरीकर यांनी म्हटले आहे की, स्वराज्यात अनेकदा धरणासंबंधात वाद झाले. पण तेव्हा भूमिका बदललेली होती. देवगिरीकरांच्या लिखाणाचा रोख असा की, पारतंत्र्याच्या काळात योग्य वाटत होते ते अंतिमत: तसे होते असे नाही.
 
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आत्मचरित्रात, उत्तरप्रदेशच्या अवध भागातील किसानांची दुरवस्था व ती दूर करण्यासाठी चालू झालेले संघटित प्रयत्न यांची चर्चा केली आहे. ते लिहितात की, अवध भागात जमीनदारांचे वर्चस्व होते व शेतकरी हे खंडकरी होते. त्यांना काही संरक्षण नव्हते आणि वाढीव खंड देण्यास कोणी तयार झाल्यास, कमी खंड देणा-या हुसकावून लावले जाई. अवध, प्रतापगड, बरेली इत्यादी ब-याच भागांत किसान मेळ्याव्यांत नेहरू भाग घेत होते. अनेक ठिकाणी महात्मा गाधींच्या प्रभावामुळे शांततामय सत्याग्रह होत असे, पण काही ठिकाणी लूटमार, हिंसा इत्यादी प्रकार होत. काही जणांनी दिशाभूल केल्याचा हा परिणाम असल्याचे आढळले  होते. ते कसेही असले तरी किसान जागृत झाला होता आणि त्याचे प्रश्न हाती घेणे अगत्याचे होते, असा अभिप्राय नेहरूंनी दिला आहे. (ऑटोबायोग्राफी, पृष्ठे ५९-६४.)

लंडनमधीला गोलमेज परिषदेत निराश होऊन महात्मा गांधी परत आले आणि देशाच्या राजकारणाला वेगळी गती आली. तथापि गांधी इंग्लंडमध्ये असताना, डोईजड जमीन न देण्याचा निर्णय घेऊन उत्तरप्रदेशच्या शेतक-यांनी केलेल्या मोहिमेत, पंडित नेहरू सामील झाले होते. त्यामुळे ते अटकेत होते. या स्थितीत व्हॉइसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांनी महात्मा गांधींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले असले तरी गांधी यास तयार झाले नाहीत. त्यांनी सत्याग्रहाची हाक दिली. तेव्हा त्यांना ४ जानेवारी १९३२ रोजी अटक होऊन येरवडा तुरूंगात आणण्यात आले. मग देशभर पुन्हा
सत्याग्रहाची लाट उठली. कराडमध्ये प्रभातफे-या, झेंडावंदन इत्यादी कार्यक्रम होऊ लागले आणि २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन इत्यादी कार्यक्रम झाला. तेव्हा दुस-या दिवशी यशवंतराव शाळेत वर्गात बसले असताना पोलिसांनी त्यांना पकडून नेले. नंतर त्यांनी अठरा महिन्यांची शिक्षा झाली व येरवड्याला नेण्यात आले. यशवंतरावांचे ते मॅट्रिकचे वर्ष होते. त्या परीक्षेला न बसण्याचा निर्णय त्यांनी अगोदरच घेतला होता. येरवड्याचा तुरूंग पुरता भरला असल्यामुळे, सरकारने त्याच्या मागच्या बाजूस मैदानात तंबू टाकून राजबंद्यांना तिथे ठेवण्याची व्यवस्था केली होती. यशवंतरावांना प्रत्यक्ष कारावासात अठरा महिन्यांपैकी पंधरा महिने राहावे लागले. त्यातही वर्षानंतर विसापूरच्या कारावासात बदली करण्यात आली होती. त्यांनी लिहिले आहे की, आपल्या जीवनातला हा उत्तम काळ होता. याच काळात आपली भावनाशीलता कमी होऊन विचारांची खोली वाढवण्याची संधी मिळाली. कारावासात ज्या बराकी होत्या, त्यांत राजबंद्यांची कशी वाटणी करायची हे काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ठरवले होते. त्यांतील बारा नंबरच्या बराकीत निवडक व नामवंत सत्याग्रहींना ठेवायचे आणि जे शाळा व महाविद्यालयाचे शिक्षण अर्धवट सोडून आले असतील, त्यांचे अभ्यासवर्ग या नामवंतांनी घ्यायचे अशी योजना होती. यामुळे या बारा नंबरच्या बराकीत यशवंतरावांना ठेवण्यात आले. बारा नंबरच्या बराकीत रावसाहेब पटवर्धन व आचार्य भागवत प्रमुख होते. रावसाहेबांना कारागृहाच्या कार्यालयात काम करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे त्यांनी कारागृहाच्या प्रमुखास सांगून, सत्याग्रहींना वृत्तपत्रे व पुस्तके मिळतील अशी व्यवस्था केली. पुण्याच्या ग्रंथालयातूनही पुस्तके आणण्याची सोय झाली. इतक्या लोकांना काम देण्यासारखेही काही नव्हते. बराकीतील लोकांच्या ओळखी होऊ लागल्या तेव्हा वि. म. भुस्कुटे, एस. एम. जोशी अशांशी यशवंतरावांची गाठ पडली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org