यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १७

या वेळी पुण्यातील पर्वती मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्याची मागणी वाढू लागली होती. १९२८ मध्ये पुण्यात यूथ लीगची स्थापना झाली होती. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे इत्यादींच्या या संघटनेने हरिजनांना प्रवेश देण्याच्या मागणीस पाठिंबा दिला, आणि यासाठी स्थापन झालेल्या समितीत केशवराव जेधे होते. मग १३ ऑक्टोबर १९२९ रोजी सत्याग्रह करून हरिजनांसह मंदिरात प्रवेश करण्याचे ठरले. यांत काकासाहेब गाडगीळ, राजभोज, एस. एम. जोशी इत्यादी तीनशे सत्याग्रहीबरोबर केशवराव जेधेही होते. एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, महात्मा फुले यांनी सर्व मानव समान असल्याचे मानून दलितमुक्तीस प्राधान्य दिले असले आणि शाहू महाराजही याच मताचा पुरस्कार करून त्याप्रमाणे वागत होते तरी सत्यशोधक समाज वा ब्राह्मणेतर पक्ष यांतील अनेकांना या दलितमुक्तीच्या कामात रस नव्हता. काही तर विरोधीच होते. जेधेबंधू मात्र जोतिबांच्या दलितमुक्तीच्या कार्यक्रमाचे पाठीराखे होते. दुसरे महत्वाचे उदाहरण म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे.त्यांनी तर नंतरच्या काळात हरिजन सेवेलाच वाहून घेतले होते.
 
या अशा वातावरणात काकासाहेब गाडगीळ सांगतात की, “ महाराष्ट्रात एकभाव निर्माण करायचा तर ब्राह्मणेतरांचा विश्वास संपादन केला पाहिजे व त्याकरिता त्याग केला पाहिजे. म्हणून एके दिवशी केशवराव जेधे यांच्याकडे गेलो व म्हणालो, ‘ पाट आणा आणि चहा आणा.’ त्यांना काही समजेना. मी म्हणालो, पाटावर बसतो, चहा पितो, जोवढ्या शिव्या वा टीका ब्राह्मणवर्गावर करावयाची असेल तेवढी करा, मग विचार करा की तुमचा प्रश्न सुटला का ? तुमचा प्रश्न वास्तविक आर्थिक आहे. राजेरजवाडे, जमीनदार व सरदार सोडले तर मराठा समाज हा दरिद्री आहे. त्याने नांगरावे, लागवड करावी व मोत्यासारखे पीक सावकाराने मातीमोलाने घ्यावे. वरच्या समाजाची स्थिती आहे. मूठभर सोडले तर तीस रूपड्यांवर खर्डेघाशी करणारे असंख्य आहेत. त्यांची बुध्दी श्रीमंत अल्पवेतन देऊन घेतात. दोघांचे दुष्मन हा धनिक वर्ग व हा सावकारवर्ग आहे व त्याला राजकर्त्यांनी अभय दिले आहे. वाटेल तेवढी जानवी घाला. जेथे म्हणाल तेथे अधिकार घ्या, पण समान शत्रू नंबर एक म्हणजे इंग्रज व दुसरा धनिक व ऐतखाऊ वर्ग आहे.”  (पथिक खंड १, पृष्ठे १९१-९२)

थोड्या दिवसांनी केशवराव जेधे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी घटना होती. नंतरच्या काळात जेधे- गाडगीळ ही जोडी महाराष्ट्र काँग्रेसच्या राजकारणात गाजत राहिली. काँग्रेसची सभासदसंख्या लाखाने वाढली, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचा पाया व्यापक झाला. अशा रीतीने केशवराव जेधे व यशवंतराव चव्हाण यांनी साधारणत: एका वेळी काँग्रेसचे कार्य करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या वयात तर फरक होताच, शिवाय इतरही बाबतींत होता. जेधे यांचे घराणे थेट शिवकालापर्यत पोचत नव्हते तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात जेध्यांचे पूर्वज होते. हे घराणे मराठा समाजात प्रतिष्ठित होते आणि धनिक, मातबर असे होते. केशवराव जेधे व त्यांचे भाऊ बाबुराव सत्यशोधक समाज वा ब्राह्मणेतर पक्षाचे आधारस्तंभ होते. य़शवंतरावांचे भाऊ सत्यशोधक समाजात सक्रिय असले तरी यशवंतराव त्या पक्षात कधी गेले नाहीत; पण घरात व बाहेर चालणारी चर्चा ऐकत होते. परंतु वृत्तपत्रांचे व ऐतिहासिक कादंब-याचे वाचन यांचा वेगळा परिणाम होत होता. दिल्लीच्या नेहरू स्मारक ग्रंथालयाने अनेक प्रमुख व्यक्तींच्या स्वातंत्र्य-आंदोलनासंबंधीच्या आठवणी मुलाखतींच्या रूपाने संग्रहित केल्या आहेत. या ग्रंथालयाचे एके काळचे ग्रंथपाल हरिदेव शर्मा हे स्वत:या आंदोलनात सहभागी झालेले होते आणि एक अभ्यासू ग्रंथपाल म्हणून त्यांचा लौकिक होता. हरिदेव यांना दिलेल्या मुलाखतीत, या ऐतिहासिक कादंबरीवाचनाचा परिणाम राष्ट्रीय विचारांकडे वळण्यात झाला असे यशवंतरावांनी म्हटले आहे. याशिवाय लोकमान्य टिळकांच्या लिखाणाच्या वाचनाचा परिणाम झाला आणि देशासाठी त्यांच्यासारख्या विद्वानाने केलेला त्याग, यामुळे आपल्या विचाराला वेगळी दिशा मिळाली. स्वातंत्र्यवीर सावकरांचे काही साहित्य आपण तरूणपणी वाचले आणि सावरकरांचे साहसी जीवन, त्यांचा त्याग यानेही आपल्यावर प्रभाव टाकला होता असेही यशवंतरावांनी सांगितले. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या विचारांची महती यशवंतरावांनी स्पष्ट केली. तथापि जोतिबांनी दिलेली सामाजिक न्यायाची दृष्टी महत्त्वाची असली, तरी देशात होत असलेले परिवर्तन पाहून आपण ब्राह्मणेतर चळवळीत सामील झालो नाही, असा खुलासा यशवंतरावांनी या मुलाखतीत केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org