यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व -१५

पहिले महायुध्द संपण्याच्या सुमारास इंग्रज सरकारने देशातील क्रांतिकारी चळवळीची वाढ होईल या कल्पनेने, प्रतिबंधक उपाययोजनेचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली. रौलॅट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीने भारतीयांवर काही बंधने लादली. त्याचा निषेध गांधी व इतर नेत्यांनी केला. युध्दात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने लढत होता. जर्मनीचा पराभव झाल्यावर तुर्कस्तानच्या सुलतानाची सद्दी संपली. तो जसा राजा होता तसाच धर्मगुरू, खलिफा होता. ही दोन्ही पदे गेल्यावर भारतातले मुस्लिम संतप्त झाले. खिलाफतीचे पुनरूज्जीवन करण्याची त्यांची मागणी गांधीनी उचलून धरली. जीनांना या मागणीत तथ्य वाटत नव्हते. तथापि मुस्लिम पुढा-यांच्या मागणीला दुजोरा दिल्यामुळे हिंदू-मूस्लिम एकी निर्माण होईल असा गांधीचा कयास होता. यामुळे रौलॅट कायदा व खिलाफत या दोन्हींसाठी त्यांनी असहकार चळवळ सुरू केली. ती सुरू होण्याच्या वेळी म्हणजे १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्यांचे निधन झाले. खिलाफत चळवळीमुळे हिंदू-मुसलमान एक होतील हा गांधींचा कयास मात्र खोटा ठरला. कारण, केरळात थोड्याच दिवसांत मोपल्यांनी बंड केल्यामुळे हिंदू व मुसलमान यांच्यातील तणाव वाढण्यास मदत झाली.
 
पहिल्या महायुध्दात भारताची इंग्लंडला झालेली मदत लक्षात घेता, युध्द संपल्यावर भरीव राजकीय सुधारणा अमलात येतील अशी अपेक्षा होती. पण जो कायदा आला तो निराशाजनक होता. म्हणून ‘उजाडले, पण सूर्य कोठे आहे ?’ असा मोठा अन्वर्थक मथळा  असलेला अग्रलेख लोकमान्यांनीलिहिला. या सुधारणा कायद्याचे गांधीनी स्वागत केले असते तरी मोतिलाल नेहरू इत्यादींनी नागाजी व्यक्त करून तो सशर्त राबवण्याचे धोरण काँग्रेसने ठरवले. या सुमारास अमृतसर येथील जालियनवाला बागेत जमलेल्या सभेवर जनरल डायरने अमानुष गोळीबार केल्यामुळे देशभर हाहाकार झाला. सरकारने मग चौकशी समिती नेमली. पण तीवर बहुसंख्य युरोपीय सभासद नेमल्यामुळे सत्य बाहेर आले नाही. नंतर मोतिलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने समिती नेमली तेव्हा या अत्याचाराचे भीषण स्वरूप जगजाहीर झाले आणि ब्रिटिश पार्लमेटमध्येही त्यावरून वादळ उठले.
 
सुधारणा कायदा राबवण्याविरूध्द काँग्रेसमध्ये मतभेद होते आणि गांधीच्या असहकाराच्या चळवळीमुळे तो राबवावा म्हणणा-यांना अडचण वाटू लागली. असहकाराच्या चळवळीमुळे गांधी कारावासात होते. ते सुटल्यावर त्यांच्याशी मोतिलाल व चित्तरंजन दास यांनी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा या दोघांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षात कायदेमंडळाची निवडणूक लढवण्यास मुभा देण्यात आली, पण वर्षभर अनुभव घेऊन फेरविचार करावा ठरले. या वेळी गांधींनी पुरस्कारलेली काँग्रेसची नवी घटना संमत झाल्यामुळे जीनांनी काँग्रेसचा त्याग केला. या घटनेप्रमाणे सविनय कायदेभंग हे काँग्रेसचे धोरण ठरले. मुंबई प्रांतात नव्या कायद्याखाली झालेल्या निवडणुकीत काही जुन्या नेमस्तांनी भाग घेतला तसेच ब्राह्मणेतर पक्षही निवडणुकीत सहभागी झाला. नंतर भास्करराव जाधव यांच्यासारखे ब्राह्मणेतर पक्षाचे नेते दिवाण नेमले गेले. तेव्हा मंत्र्यास ‘दिवाण’ म्हणत. अर्थात दिवाणास फारच थोडे अधिकार होते ही गोष्ट वेगळी. मतदारसंघाची रचना पाहता ब्राह्मणेतर पक्षाला मोठे बहुमत मिळणे शक्य नव्हते. पण तामिळनाडूमध्ये जस्टिस पक्षास भरघोस बहुमत मिळाले होते.
 
यशवंतराव माध्यमिक शाळेत शिकू लागण्यापूर्वी या घडामोडी घडल्या होत्या. माध्यमिक शाळेत शिकू लागल्यानंतर गांधींचे असहकाराचे युग सुरू झाले होते आणि त्या वेळच्या राजकीय घडामोडींबद्दल यशवंतराव त्यांचे मित्रमंडळ नेहमी चर्चा करत होते, तर प्रभातफे-या, झेंडावंदन इत्यादी कार्यक्रमांत ते भाग घेत. तथापि यशवंतरावांच्या मनावर राष्ट्रीयत्वाचा गाढ परिणाम करणारी एक घटना नमूद करण्यासारखी आहे. ती अर्थात सर्वदेश हादरवून सोडणारी होती. ती म्हणजे यतीन्द्रनाथ दास यांनी प्रदीर्घ उपोषण करून केलेल्या आत्मार्पणाची. यतीन्द्रनाथ हे वीस सालच्या आंदोलनात कारावासात गेले होते. नंतरच्या पाच वर्षात त्यांना चार वेळा बंदिवान करण्यात आले. या शेवटच्या शिक्षेच्या काळात ते मैमनसिंग इतल्या तुरूंगात असताना अधिका-यांनी त्यांचा भयंकर छळ केला, तेव्हा यतीन्द्रांनी अधिका-यावर हल्ला केला म्हणून त्यांना अंधारकोठडीत ठेवण्यात आले. तेव्हा राजकीय कैद्यांना दिल्या जाणा-या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ यतीन्द्रांनी आमरण उपोषण सुरू केले. याच कारणास्तव सरदार भगतसिंग, बटुकेश्वर दत्त इत्यादींनी उपोषण चालू केले होते. सा-या देशाप्रमाणे यशवंतराव यतीन्द्राचे काय होते याकडे डोळे लावून होते व रोजच्या बातम्यांची वाट पाहत होते. अखेरीस यतीन्द्रनाथांची जीवनज्योत मालवली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org