अशा या दुभंगलेल्या काँग्रेसने आणीबाणीनंतरची विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा महाराष्ट्रात एकूण २८८ जागांपैकी जनाता पक्षाला ९९, रेड्डी काँग्रेस ६९, इंदिरा काँग्रेस ६२, कम्युनिस्ट ९, शे. का. पक्ष १२ आणि अपक्ष ३६ असे जागावाटप झाले. यामुळे दोन काँग्रेसने एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण रेड्डी काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी तिला इंदिरा गांधी मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हत्या. तथापि यशवंतराव मोहिते यांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन तडजोडीची आवश्यकता पटवल्यावर, दोन्ही काँग्रेसचे संयुक्त मंत्रिमंडळ आले आणि वसंतदादा मुख्यमंत्री व नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. हे मंत्रिमंडळ फार काळ टिकणारे नव्हते. तिरपुडे यांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला. वसंतदादा मुख्यमंत्री असले तरी त्यांना निष्प्रभ करून अनेक महत्त्वाचे निर्णय तिरपुडे घेऊ लागले. काँग्रेसचा, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा खरा आधार सहकार क्षेत्र होते. त्यावरच घाला घालण्याच्या दिशेने तिरपुडे पावले टाकत होते आणि वसंतदादा सहाकार क्षेत्रात इतके पाय रोवून असतानाही, त्यांनी तिरपुडे यांना आवरले नाही किंवा तसे आवरण्यात ते कमी पडले. यामुळे काँग्रेस
पुढा-यांत व कार्यकर्त्यात अस्वस्थता वाटू लागली.
महाराष्ट्रात या प्रकारचा असंतोष वाढत होता तेव्हा मी दिल्लीस गेलो असताना, यशवंतराव कमालीचे अस्वस्थ दिसले. वसंतदादा तिरपुडे यांना कसे आवरत नाहीत? असे त्यांचे प्रश्न होते. त्यांना महाराष्ट्रातून अनेकांनी अडचणी कशा वाढत चालल्या आहेत याची कल्पना दिली होती. या स्थितीत मंत्रिमंडळास विरोध करून त्याचा परावभव करण्याचे विचार काहीजण करत असल्याचे मी सांगितले तेव्हा हे मंत्रिमंडळ गेलेच पाहिजे असे मत यशवंतरावांनी दिले. जंयत लेले यांना दिलेल्या मुलाखतीतही हा विचार यशवंतरावांनी अस्पष्टपणे मांडलेला दिसेल. मग शरद पवार, किसन वीर, सुशीलकुमार शिंदे, विनायकराव पाटील, गोविंदराव आदिक, प्रतापराव भोसले इत्यादींनी हालचाली चालवल्या होत्या त्या अधिक वाढवल्या. या सर्वांनी शरद पवार यांना पुढारी निवडले. पवारांच्या घरी, या आणि इतर अनेक कार्यकर्त्यांची बैठक चालू असताना, यशवंतरावांवनी मला फोन करून लगेच निर्णय घेऊ नये असा निरोप पवार व त्यांचे सहकारी यांना देण्यास सांगितले. तो निरोप मी दिलाही. पण वेळ निघून गेली होती. किसन वीर हे यशवंतरावांचे अगदी तरुणपणापासूनचे सहकारी. त्यांनी यशवंतरावांना फोन करून आता निर्णय बदलू शकत नसल्याचे कळवले आणि दुस-या दिवशी संयुक्त मंत्रिमंडळाच्या विरुद्ध बंड होऊन ते कोसळले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेस, जनता व शे. का. पक्ष यांच्या आघाडीचे मंत्रिमंडळ आले.
केंद्रातील जनता पक्षात मतभेदांना जाहीर स्वरूप येऊ लागल्यामुळे त्याचे भवितव्य अनिश्चित होत होते. मग मधू लिमये आणि जॉर्ज फर्नाडिस यांनी जनसंघाच्या मंत्र्यांच्या दुहेरी निष्ठेवर टीका सुरू केली. रा. स्व. संघाचे आदेश घेऊन जनता आघाडीत कसे राहता येईल, असा त्यांचा प्रश्न होता. याची परिणती फर्नांडिस यांच्या राजीनाम्यात झाली. पाठोपाठ राजनारायण व चरणसिंग यांनी बंडाची भाषा केली तेव्हा संजय गांधी यांनी या दोघांना बंड करून जनता पक्षाचे सरकार अल्पमतात आणल्यास काँग्रेसच्या पाठिंब्यावर तुम्ही मंत्रिमंडळ बनवा असा सल्ला दिला. तो चरणसिंग व राजनारायण यांनी ऐकला आणि जनता पक्षाचे सरकार संपुष्टात आणले. चरणसिंग यांनी लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून यशवंतराव यांना उपपंतप्रधानपद घेण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. पण आयत्या वेळे इंदिरा काँग्रेसने पाठिंबा देण्याचे नाकारल्यामुळे, हे मंत्रिमंडळ ख-या अर्थाने अस्तित्वात आले नाही. आपण चरणसिंग यांचे आमंत्रण स्वीकारण्यात चूक केली, अशी खंत यशवंतराव नंतर खाजगीत व्यक्त करत
या अवस्थेत लोकसभा बरखास्त करून निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले. तशी ती होऊन इंदिरा गांधी व त्यांचा पक्ष निर्विवाद बहुमत मिळवून अधिकारावर आला. इंदिरा काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेल्यांपैकी दीडशे जण संजय गांधी यांच्यावर निष्ठा ठेवणारे होते. त्यांना संसदीय जीवनाचा कसलाही अनुभव नव्हता. फक्त झोडगिरीत ते वाकबगार होते. नव्या परिस्थितीत इंदिरा काँग्रेसमध्ये संजय गांधी आणि त्यांची युवक काँग्रेस हे एक समांतर सत्ताकेंद्र होऊन बसले. संजय गांधींनी आणीबाणी पुकारून घटना तहकूब करण्याचा कायदेशीर सल्ला देणा-या सिद्धार्थ शंकर रे यांचा अपमान करून इंदिरा गांधींच्या वर्तुळापासून दूर केले. नंतर बरुआ, रजनी पटेल, नंदिनी सत्पथी इत्यादींनाही निरोप दिला. कम्युनिस्ट पक्षाने आणीबाणीस पाठिंबा दिला असला तरी संजय गांधी यांनी कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेस पक्षातील डावे यांच्याविरुद्ध मोहीम उघडली.