यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व -१२

सत्यशोधक समाजाची वाढ होण्यास हा वाद कारणीभूत झाला तरी त्याची एरवीही वाढ होतच होती. गेल ऑम्वेट यांनी त्यांच्या पुस्तकात, समाजाची वाढ चार टप्प्यांत झाली असे म्हटले आहे. पहिला १८७३ ते १८९० हा काळ मूळ धरण्यात गेला. मुंबई, पुणे व त्याच्या आसपारचा काही ग्रामीण भाग यांत मूळ धरले गेले. नंतर १९१० पर्यतच्या काळात शहरी भागत समाजाचे काम रूजले, पण कोल्हापूर, बेळगाव आणि पूर्वेकडे विदर्भात सत्यशोधक समाजाचा प्रसार होत गेला. तिसरा टप्पा १९११ ते १९१९ पर्यंतचा. या काळात दक्षिण महाराष्ट्र व विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात समाजाच्या शाखा स्थापन झाल्याच, शिवाय नागपूर आणि मराठवाड्यातही अशीच वाढ झाली. या तिस-या टप्प्यात अखिल महाराष्ट्राची म्हणून समाजाची परिषद होऊन मग अनेक भागांत परिषदा भरवल्या जात होत्या. १९१९ ते १९३० या काळात मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा अमलात आल्यावर, प्रांतिक विधिमंडळाची वाढ होऊन अत्यंत मर्यादित प्रमाणात राजकीय हक्क प्राप्त झाले. याचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने सत्यशोधक समाजाचे ब्राह्मणेतर पक्षात रूपांतर होऊन राजकीय व आर्थिक कार्यात तो गुंतून राहिला. (कल्चरल रिव्होल्ट इन ए कलोनियल सोसायटी, पृ. १३९) पण ऑम्वेट यांनी असाही अभिप्राय दिला आहे की, सत्यशोधक समाजाचा विस्तार होत गेला हे खरे असले तरी महात्मा फुले यांनी सामाजिक व वैचारिक परिवर्तन आरंभिले होते, ते मागे पडत गेले.
 
सत्यशोधक समाजाचा हा विस्तार दक्षिण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत झाल्यावर सातारा जिल्हा मागे राहणे शक्य नव्हते. शिवाय तो राजकीयदृष्ट्या जागृत जिल्हा होता. तेव्हा कराडमध्येही समाजाचे कार्य वाढले. यात यशवंतरावांचे वडीलभाऊ, गणपतराव सहभागी असल्यामुळे माध्यमिक शाळेत जाणा-या यशवंतरावांना त्या वेळच्या काही चर्चा ऐकावयास मिळू लागल्या होत्या. त्यांनी लिहिले आहे की, वडील माणसांच्या सर्वच चर्चाचा अर्थ समजण्याचे आपले वय नव्हते. पण गणपतराव त्यांना काही साहित्य वाचायला देत, ‘राष्ट्रवीर’ इत्यादी साप्तहिके मिळत. त्याचबरोबर यशवंतराव मुंबई-पुण्याची पत्रेही लक्षपूर्वक वाचत होते. त्यामुळे देशात वेगळे वारे वाहत असल्याचे समजू लागले होते. याच काळात केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांची करडमध्ये सभा झाली तेव्हा यशवंतराव हजर होते. जवळकर हे बोलण्यात व लिहिण्यात मोठे जहाल होते. देशाचे दुष्मन हे जवळकरांचे पुस्तक लोकमान्यांच्या संबंधात होते. हे भाषण व जवळकर यांचे पुस्तक यांच्याबाबत आपली प्रतिक्रिया काय झाली हे सांगताना यशवंतरावांनी म्हटले आहे की, महात्मा फुले व लोकमान्य टिळक ही दोन्ही मोठी माणसे. त्यांच्यापैकी कोणावरही अशी जहरी टीका होणे अयोग्य असा विचार आपल्या मनात आला. ते लिहितात की, स्वराज्याचा विचार टिळकांनी सांगितला आणि गरीबांची शिक्षणाने प्रगती झाली पाहिजे व समाजात समता निर्माण झाली पाहिजे, हा विचार जोतिराव फुल्यांनी सांगितला. हे दोन्ही विचार महत्त्वाचे, म्हणून दोन्ही माणसे आपल्या दृष्टीने मोठीच आहेत या निर्णयाला आपण आलो. पण याच संदर्भात त्यांनी आपली जी शंका व्यक्त केली ती महत्त्वाची होती. ते लिहितात की, ‘लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरूध्द लढणारे एक सेनापती आहेत, अशी माझी भावना होती. अशा थोर माणसावर टीका करणारी माणसे ही इंग्रजांचे मित्र तर नाहीत ना ?’ (कृष्णाकांठ, पृष्ठ ३४ व ५०).
 
या रीतीने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून यशवंतराव दूर राहिले. असाच प्रकार विठ्ठलराव घाटे यांचा झाला असे दिसून येईल. त्यांनी आत्मचित्रात लिहिले, “ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद माझ्या पिढीच्या डोळ्यांसमोर सारखा उभा होता. कधी जवळ, तर कधी दूर. कधी स्पष्ट दिसायचा, कधी धुक्यात असायचा; पण असायचा. माझ्या जीवनात या प्रश्नाने साता-यात प्रवेश केला व मधूनमधून चोरपावलांनी भेटी दिल्या. मी पातळीवर होतो. प्रसंगविशेषी मन हेलकावे खात असे, पण वेळ टळून गेल्यावर मी जागेवर येऊन स्थिर होई. अनेक प्रसंगी मन बावचळले, अस्वस्थ झाले, परंतु कधीच विकृत झाले नाही, हे मी माझे सुदैव समजतो ” (दिवस असे होते, पृ.२५)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org