राज्यपुनर्रचना आयोगाने निजामाचे स्वतंत्र राज्य बरखास्त करण्याची शिफारस केली. यामुळे हैद्राबाद शहर आंध्रकडे जाण्याचा व त्याच्या राजधानीचा प्रश्न सुटला. तेलगू, कन्नड व मराठी जनतेला निजामाच्या राजवटीतून सुटण्याची उत्कंठा लागून राहिली होती. तीही पुरी होण्याची वेळ आली. नंतर जेव्हा निजामाचे संस्थान बरखास्त होऊन त्याचे तेलगू, मराठी व कन्नडभाषिक भाग त्या त्या राज्यांत विलीन करण्याचा निर्णय झाला तेव्हा संसदेत नेहरूंनी स्वामी रामानंदांचे अभिनंदन करून त्यांना आपला पराभव झाला, तुम्ही जिंकलात असे सांगितले. स्वामीजींनी हे अभिनंदन विनयपूर्वक स्वीकारले.
आयोगाचा अहवाल प्रसिध्द होण्याच्या काही दिवस अगोदर, विदर्भ स्वतंत्र होणार अशी शिफारस अहवालात असण्याची चाहूल लागली असता, काकासाहेब गाडगीळ यांनी आपली या संबंधी काय प्रतिक्रिया असेल हे शंकरराव देव यांना सांगितले. मुबंई व मराठवाड्यासह महाराष्ट्र व दुसरा विदर्भ असे दोन महाराष्ट्र झाले तर आपण मान्य करू. पण तसे झाले नाही. विदर्भ व मुबंई महाराष्ट्रापासून अलग करण्याची आयोगाची शिफारस होती. तथापि पंडित नेहरूंनी अहवाल हा शेवटचा शब्द नसून त्यात बदल होऊ शकतो असे म्हटल्यामुळे आशेला थोडी जागा निर्माण झाली, पण ती थोडीच. धनंजयराव गाडगीळ यांनी एक पुस्तिका प्रसिध्द करून अहवालाची कठोर चिकित्सा केली. अहवालातील अनेक विसंगती दाखवून त्यांनी एकट्या महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे दाखवून दिले. आयोगाचा अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर १३ व १४ ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेत एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुंबईप्रमाणे इतरही काही विभागांबद्दल तक्रारी होत्या. म्हणून नेहरू, पंत, ढेबर व आझाद यांची उपसमिती नेमून वाटाघाटी करण्याचा निर्णय झाला. तसेच काँग्रेसजनांनी आंदोलनाच्या मार्गाने जाऊ नये आणि जे इतर पक्ष वा गट जात असतील त्यांच्याबरोबरही जाऊ नये असा आदेश काढण्यात आला.
महाराष्ट्राबद्दलच्या चर्चेसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले. दिल्लीला जाण्यास निघण्यापूर्वी शंकरराव देव यांनी मुलाखतीत सांगितले की, आता संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीआड ब्रह्मदेवही येऊ शकणार नाही. मी तो अमृतकलश घेऊन मुंबईस येणार. १७ व १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीस शंकरराव देव, हरिभाऊ पाटसकर, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, देवगिरीकर, यशवंतराव चव्हाण, नानासाहेब कुंटे, डॉ. नरवणे यांना आमंत्रण होते. बैठकीला नेहरू, पंत व मौलाना आझाद हजर होते. नानासाहेब कुंटे यांनी दोन्ही दिवसांच्या बैठकीत काय झाले याची थोडक्यात माहिती दिली आहे. त्यांनी हा वृत्तान्त लिहिताना प्रथम पंडितजींच्या स्वागतशील वृत्तीचे विशेष कौतुक केले आहे. शंकरराव व इतर काहींनी आयोगाचा अहवाल महाराष्ट्रावर कसा अन्याय करणारा आहे हे दाखवून देले. नव्या राज्यात सौराष्ट्र जोडायचा पण विदर्भ व मुबंई यांना अलग करायचे यामुळे हा अन्याय होतो असा युक्तिवाद करण्यात आला. तथापि देवगिरीकर यांनी असेही नमूद केले आहे की, या बैठकीत शंकरराव नेहरूंना उद्देशून म्हणाले, तुम्ही सूर्य आहां. तुमचा एक किरण आमच्यावर पडू द्या, म्हणजे कशी क्रांती होते ते पाहा. तुम्ही आमच्या बाजूने आलात तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र खास निर्माण होईल. भाषिक राज्यनिर्मितीच्या प्रश्नाबाबत आपली प्रवृत्ती विकृत असल्याचे म्हणणारे शंकरराव , आपल्याला सूर्य ठरवू लागल्याचे पाहून नेहरू आश्चर्यचकित झाले असतील.
कुंटे सांगतात की, नेहरूंनी अहवाल चांगल्यापैकी वाचला होता. म्हणून त्यांनी अहवालाचे पान दाखवून मराठी लोकांबद्दल मुंबई संशय असल्याचे आपल्याला अनेकांनी सांगितल्याचे नमूद केले आहे. पण आयोगाने ते आपले मत असल्याचे म्हटले नाही प्रतिवाद केला. यामुळे नेहरूंनी शंकरराव देव यांची नकळत अडचण केली. परंतु यापेक्षा पंडितजींनी अधिक अडचण नंतर केली. तुम्ही एका प्रांताचे आहांत या दृष्टीने या प्रश्नाकडे कां बघता? तुम्ही आम्ही खांद्याला खांदा लावून हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे नेहरू म्हणाले. दुस-या दिवशी मौलाना आझाद यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यांनी सांगितले की, मुंबई महाराष्ट्रात जाण्यास आपली काही हरकत नाही, पण मुंबईतील व्यापारी व उद्योगपती यांना दहशत वाटते, तिचाही विचार करायला हवा आणि तुमच्याप्रमाणे मुंबईतून जी इतर शिष्टमंडळे आली आहेत, त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. यानंतर मराठी नेत्यांनी एकत्र विचारविनिमय करून, मुंबईसह एक भाषिक राज्याची आमची मागणी कायम असून तुम्हीच निर्णय करा, असे काँग्रेसश्रेष्ठींना सांगण्याचा निर्णय झाला.