महाराज तेव्हा पन्हाळ्यावर होते. तिथे पी. सी. पाटील हजर झाल्यावर महाराजांनी त्यांची सर्व चौकशी केली. त्यांनी विचारले “ तुमच्या वडलांची शेती किती आहे ? कर्ज किती ?” पाटील यांनी उत्तर दिले, “ पंधरावीस एकर जमीन आहे, चार बैल आहेत; उसाच्या फडात वाटा आहे आणि कर्ज नाही.” महाराजांनी विचारले, “तुमची सावकारी असेल ना ?” ‘नाही’, असे उत्तर आल्यावर त्यांनी विचारले, “ मग तुम्ही आमच्याकडे स्कॉलरशिप का मागितली नाहीत ?” “ हुजुरांपर्यत दाद लागणे कठीण म्हणून काटकसरीने आतापर्यंत शिक्षण घेतले.” “ कोणत्या खानावळीत जेवीत होता ? तेथे तुम्हांला किती द्यावे लागे ?”
“ मराठ्यांच्या खानावळी शहरात नाहीत. फक्त ब्राह्मणाच्या आहेत. त्या खानावळीत दरमहाचा दर पाच रूपये असतो. शिवाय मराठ्यांना आपल्या पत्रावळी आपणच उचलाव्या लागत. म्हणून मी ब्राह्मणाच्या खानावळीचा नाद सोडला आणि ओळखीच्या मराठ्याकडे महिना साडेतीन रूपये देऊन जेवणाची सोय केली होती.” “ तेथे अभ्यास करण्यास जागा तरी हेती काय?” “त्यांच्या घरात जागा कमी होती म्हणून हायस्कूलजवळ सरकारी तालीम आहे, तेथे मामा जाधव, बळीबा पाटील, हरिबा पाटील, हिंदुराव घाटगे वगैरे पाचसहा जणांनी तालिममास्तरांच्या परवानगीने, रात्री अभ्यासाची व झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्याबरोबर मीही होतो.” आपण आता शेती करणार, कारण कॉलेजचे शिक्षण परवडणार नाही असे उत्तर पी. सी. पाटील यांनी दिल्यावर महाराजांनी विचारले,
“आम्ही खर्च दिला तर शिकाल काय ?” याचे उत्तर वडलांना विचारून देईन असे पाटील यांनी सांगितल्यावर, चार दिवस येथेच थांबून मग वडलांना विचारून येण्यास महाराजांनी सांगितले. थोड्याच दिवसांत कॉलेज सुरू झाल्यावर महाराजांनी पाटील यांना त्यात नाव घालण्यास सांगितले. त्याच वेळी आणखी तीन मराठा विद्यार्थी कॉलेजात दाखल झाल्याचे कळल्यावर, महाराजांनी कचेरीजवळच्या दत्ताच्या देवालयात हुजूरखाजगी खर्चातून तात्पुरते वसतिगृह सुरू केले. मग १९०१ मध्ये कोल्हापुरात स्वतंत्र मराठा वसतिगृह बांधले गेले. त्या पाठोपाठ लिंगायत, जैन, सोनार, मुसलमान व महार वगैरे बहुतेक जातींच्या विद्यार्थ्यासाठी महाराजांनी वसतिगृहे बांधली. या सर्वाचा फायदा बहुजन समाजातल्या विद्यार्थ्याना झाला. (माझ्या आठवणी, पृष्ठे २११-१४) बहुजन समाजात शिक्षणप्रसार होण्यास आणखी हातभार लावणारे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी साता-यात ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापन करून शाळा व महाविद्यालये सुरू केली. या प्रकारे कोल्हापूर व सातारा ही बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार करणारी प्रमुख केंद्रे बनली.
पी. सी. पाटील यांच्यासारखा एक वेगळा अनुभव यशवंतरावांना आला होता. मॅट्रीकच्या वर्गात असताना त्यांचा संस्कृत विषय आवडता असला, तरी परीक्षेच्या दृष्टीने वर्गातील शिक्षण पुरेसे होणार नाही असे त्यांना वाटले. इतर मुलांनी वर्गाव्यतिरिक्त अधिक शिक्षणाची व्यवस्था केली होती. तशी ती झाली तर पाहण्याचा प्रयत्न यशवंतराव करत होते. त्यांचे मित्र राघूअण्णा लिमये यांनी मग कराडमधल्या एका शास्त्र्याला विचारले. तेव्हा, अब्राह्मणास आपण संस्कृत शिकवणार नाही, असे उत्तर मिळाले. यशवंतरावांनी झालेल्या अभ्यासावर परीक्षा दिली व ते यशस्वी झाले. तथापि महाविद्यालयात संस्कृत न घेता पाली ही भाषा त्यांनी घेतली. हा प्रसंग तेव्हाच्या कालस्थितीचा द्योतक होता. आता काळ बदलला आहे. आज ब्राह्मण मुलेही संस्कृतकडे वळत नाहीत; इतकेच काय, मराठीपेक्षा इंग्रजी माध्यम पसंत करण्याकडे ओढा अधिक आहे.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधील वातावरणाने यशवंतराव उल्हसित झाले. त्या वेळी डॉ. बाळकृष्ण हे प्राचार्य होते. ते पंजाबमधून आलेले. बाळकृष्ण हे इतिहासाचे विद्वान होते. उत्तम वक्ते व कारभारकुशल होते आणि कोल्हापुरात त्यांना मान होता. ते पहिल्या वर्गास शिकवत नव्हते. म्हणून यशवंतरावांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि आपली माहिती करून दिली. डॉ. बाळकृष्ण यांनी सर्व नीट ऐकून घेतले आणि यशवंतरावांना सांगितले की, “ काहीही कर, पण कोल्हापूर संस्थानच्या राजकारणात पडू नको.” यशवंतरावांनी ते लगेच मान्य केले, “ पण आपण सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आजवर गुंतलो असल्यामुळे सवड सापडेल त्याप्रमाणे त्यात लक्ष घालीन” असे उत्तर दिले. त्यास डॉ. बाळकृष्ण यांची हरकत नव्हती. आपल्याकडे लक्ष ठेवण्याची विनंती यशवंतरावांनी केली. ती त्यांनी मान्य केली. राजाराम कॉलेजात तेव्हा ना. सी. फडके, माधव जूलियन हे दोन नावाजलेले प्राध्यापक होते. फडक्यांच्या शिकवण्याचा लाभ यशवंतरावांना इंटरच्या वर्गात गेल्यावर मिळाला. फडके तर्कशास्त्र उत्तमपैकी शिकवीत आणि त्यांच्या शिकवण्यावर विद्यार्थि खूश होत. फडक्यांनी संगीताचा एक क्लब काढला होता. त्याचे यशवंतराव सभासद होते. अनेक भाषणे होत. त्या वेळीही त्यांची हजेरी असे. माधव जूलियन यांच्याबद्दल यशवंतराव व इतर विद्यार्थि यांना आदर असला, तरी त्यांच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्याना त्यांच्याबद्दल प्रेम वाटावे अशी स्थिती नव्हती. आणखी एक प्राध्यापक यशवंतरावांवर प्रभाव टाकणारे होते. ते म्हणजे डॉ. बोस. ते इंग्रजी प्राध्यापक होते.