यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २

यशवंतरावांच्या आकस्मिक निधनानंतर आता जवळजवळ ३० वर्षे लोटली आहेत. त्यांच्या ह्यातीतील अनेक वावटळी आता शमल्या आहेत, वाद-विवादांचा धुरळा खाली बसला आहे. त्यामुळे काळाच्या विपरित रीतीनुसार त्यांच्या जीवनातील अनेक घटना अधिक स्पष्टपणे दिसून त्यांच्याविषयी तारतम्याने निष्कर्ष काढणे शक्य झाले आहे. तसेच साधेपणा, राष्ट्रीय दृष्टिकोन, सुसंस्कृतपणा, संवेदनशीलता व परमतसहिष्णुता या राजकारणातच नव्हे तर इतर क्षेत्रांतही दुर्मिळ होत चाललेल्या गुणांमुळे जसजसा काळ जातो तसतशी यशवंतरावांच्या कर्तुत्वाला एक वेगळीच झळाळी येताना दिसते.

चरित्रलेखन ही लेखकाची सत्तपरिक्षाच असते ! एकीकडे ऐतिहासिक वस्तुस्थिशी प्रामाणिक राहून चरीत्रनायकाच्या व्यक्तित्वाचे यथातथ्य वर्णन करावे लागते व त्या त्या काळातील घटना व विचारप्रवाह यांच्या संदर्भात चरित्रनायकाच्या कृतींचा अर्थ लावावा लागतो. थोर व्यक्ती आपल्या कर्तुत्वाने त्या त्या कालखंडावर ठसा उमटवत असतात. परंतु त्यांच्याही जीवनाशी देशकालपरिस्थितीचा संबंध अनिवार्यपणे येतो. यशवंतरावांसारख्या राजकीय नेत्याच्या जीवनातील संघर्ष म्हणजे चरित्रलेखकाची कसोटीच असते. कारण त्या त्या संघर्षमय प्रसंगात चरित्रनायकाने घेतलेली भूमिका व तिचे यथायोग्य विवेचन करीत असतानाच चरित्रनायकावर किंवा त्या प्रसंगातील इतर नेत्यांच्या भूमिकेवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते. या सर्व दिव्यांमधून श्री. गोविंदरावांचे लिखाण तावूनसुलाखून निघेल असे वाटते.

या पुस्तकामध्ये य़शवंतरावांची २२८ छायाचित्रे समाविष्ट केलेली आहेत. शक्यतो त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग व त्यांच्या कौटुंबिक व राजकीय जीवनातील महत्त्वाच्या व्यक्ती यांविषयींची समाविष्ट असावी असा प्रयत्न केलेला आहे. त्या काळच्या तंत्राज्ञानानुसार सर्व छायाचित्रे कृष्णधवल आहेत. काही छायाचित्रे कालौघात खराब झालेली आहेत. शक्य त्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही छायाचित्रे उत्तम दर्जाची नसतानादेखील त्यांचे ऐतिहासिक व प्रासंगिक महत्त्व लक्षात घेऊन ती ग्रंथात समाविष्ट केलेली आहेत.
 
जन्मशताब्दीच्या वर्षात प्रकाशित होणा-या या सचित्र चरित्राच्या रूपाने यशवंतरावांचे जीवन व त्यांचे असामान्य कर्तुत्व पुन्हा एकदा महाराष्ट्रतील जनतेपुढे ठसठशीतपणे उभे राहील असा मला विश्वास वाटतो!
                                 

शरद पवार