यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व -१४

सत्यशोधक समाजाच्या धर्तीवर तामिळनाडूमध्ये नाडर संगम आणि इतर काही संघटना काम करू लागल्या होत्या. यातून जस्टिस पक्षाचा उद्य झाला. इ. व्ही. रामस्वामी नायकार हे ब्राह्मणेतर आंदोलनाचे जहाल प्रवर्तक पुढे येऊ लागले होते. त्यांनी आत्मसन्मान आंदोलन चालवले होते. नाडर समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी नायकार यांनी रामनाडचे सर ए. पी. डी. पात्रो तसेच सर आर. के. शण्मुगण चेट्टीआर यांचे साहाय्य घेतले. नायकार यांनी हरिजनांना मंदिरे, पाणवठे इत्यादी खुले झाले पाहिजेत अशा मागण्या मांडल्या. नायकार यांनी आर्य व आर्येतर अशी विभागणी असल्याचे प्रतिपादून द्राविडी संस्कृती ही प्राचीन असल्याचा सिध्दान्त मांडला. आर्य म्हणजे ब्राह्मण, परकी ठरवले आणि तामिळनाडू  हे द्राविडीस्थान बनवण्याचा संकल्प सोडला. नायकार हे मूर्तिपूजेच्या विरूध्द प्रचार करत. तथापि ते आणि महात्मा फुले यांच्या उद्दिष्टांत महत्त्वाचा फरक होता. एकतर नायकार यांच्याप्रमाणे जोतिबांनी ब्राह्मणांचे सहकार्य नाकारले नव्हते. त्याहूनही महत्वाचा फरक हा, की जोतिबांनी महाराष्ट्राची संस्कृती वेगळी असून ते एक स्वतंत्र राष्ट्र बनवावे अशी भूमिका कधी घेतली नाही. तामिळनाडूमधील ब्राह्मणेतर पक्षाने दीर्घ काळ ही भूमिका घेतली आणि अद्यापही वेगळ्या द्राविडी संस्कृतीची भाषा, तामिळनाडूतील दोन्ही प्रमुख पक्षांतील काही जण करत असतात. उत्तर भारतास विरोध हा दुसरा एक विशेष या पक्षांत दिसून येईल.
 
महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजात सामील न होता, यशवंतराव त्यांच्या कार्याचे केवळ निरीक्षण करत होते. ते माध्यमिक शाळेत शिकत असताना देशाच्या राजकारणात ब-याच घटना घडत होत्या. तसे पाहिले तर यशवंतरावांचा १९१३ मध्ये जन्म झाल्यापासून महाराष्ट्रात व देशात अनेक खळबळजनक घडामोडी घडत होत्या. यशवंतरावांच्या जन्मानंतर एकाच वर्षानी लोकमान्य टिळक यांची मंडालेतील सहा वर्षाच्या कारावासानंतर सुटका होऊन ते पुण्यात परत आले होते. यामुळे राजकारणात काही जीव आला. तसेच १४ साली पहिले महायुध्द सुरू झाले. त्या वेळी लोकमान्य तसेच हिंदी लोक युध्दविरोधी भूमिका घेतील आणि मग सैन्यभरतीचा कार्यक्रम पार पाडता येणार नाही, अशी ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती. पण झाले उलटेच. लोकमान्यांनी युध्दाला पाठिंबा दिला. महात्मा गांधी तर सैन्यभरतीच्या कामात सहभागी होते. दक्षिण आफ्रिकेतील हिंद लोकांना मिळणा-या अमानुष वागणुकीचा प्रतिकार, सविनय कायदेभंगाची अभिनव चळवळ करून गांधीनी चालवला होता. ते काम इतरांवर सोपवून स्वदेशी परत येण्याची सूचना गोखले यांनीच गांधींना केली होती. सात साली सुरतेला काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर लोतमान्यांना काँग्रेसमध्ये मज्जाव झाला होता. तेव्हा मंडालेहून आल्यावर त्यांनी होमरूल लीगची प्रथम स्थापना केली व नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. १६ साली लखनौ इथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशना लोकमान्यंनी  मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जीना यांच्याशी विधीमंडळात मुसलमानांना किती जागा द्यायच्या याबाबत करार केला. हाच तो लखनौ करार.
 
लखनौच्या काँग्रेस अधिवेशनास महात्मा गांधी हजर आफ्रकेतील कामगिरीमुळे त्यांच्याबद्दल भारतात सर्वत्र कुतूहल होते व त्यांची मदत घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. यांतले एक म्हणजे राजकुमार शुक्ला. ते बिहारच्या चंपारण भागातले होते आणि जमीनविषयक सराकारी धोरणाची झळ लागलेल्यात त्यांची गणना होत होती. त्यांच्या आग्रहामुळे गांधीजी १७ सालच्या प्रारंभी चंपारणमध्ये गेले. चंपारणमधील बहुतेक शेती तीन जमीनदारांकडे होती. ती ते खंडाने देत. त्यासाठी ठेकेदार निवडले जात. गांधी चंपारणमध्ये जाईपर्यत निम्म्याहून अधिक शेती युरोपीय ठेकेदारांकडे होती. बंगालप्रमाने चंपारणमध्ये कुळांना काही अधिकार नव्हते. यामुळे जमीनदार व ठेकेदार मन मानेल तसे विलासात राहत. सावकारीही त्यांच्याकडे असे. जमिनीची मोजणी, जिल्हा मंडळे इत्यादी सर्वच जमीदारांच्या हाती होते. पहिले महायुध्द संपल्यावर शेतीचे भाव खाली आले. या शेतीत निळीचेही उत्पन्न घेतले जात होते. भाव खाली आले म्हणून जमीनमालकांनी खंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली. आपण सर्व करार कायदेशीरपणे केल्याचा दावा जमीनदार करत होते. या स्थितीत गांधींनी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. नायब राज्यपाल सर एडवर्ड गेट यांनी चौकशी समिती नेमून गांधींना तिचे सदस्य म्हणून काम करण्याची विनंती केली. ती गांधींनी स्वीकारली. समितीचे काम संपल्यावर तिने अहवाल दिला. चंपारणमध्ये तीन तिखिया या नावाची पध्दती रूढ होती. या पध्दतीखाली जमिनीचे वीस भाग करून त्यातील तीन निळीसाठी वापरले जात. ती रद्द करण्याची समितीने शिफारस केली आणि ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे घेतलेल्या रकमा कुळांना परत कराव्या अशी सूचना केली. या दोन मागण्या मान्य झाल्यामुळे शेतक-यांचा फार वर्षाचा प्रश्न सुटला. गांधीजींच्या या प्रयत्नामुळे एक नवे पर्व सुरू झाले.
गुजरातच्या खेडा जिल्ह्यात दुष्काळ व प्लेग यांमुळे शेतकरी हैराण झाले होते. तेव्हा १९१८ साली शेतक-यांनी गुजरात सभेतर्फे सारामाफीची मागणी केली. ही सभा होमरूल लीगवाल्यांची असल्याच्या समजुतीमुळे मुंबई सरकारने ही मागणी अमान्य केली. तेव्हा सारा न भरण्याचा सत्याग्रह सुरू झाला. गांधीजींचे त्यास मार्गदर्शन होते. पुढे काही सधन शेतकरी सारा भरू लागले. तेव्हा इतर सधन शेतक-यांनी सारा दिल्यास गरीब शेतक-यांना माफी देण्याची तडजोड सरकारने मान्य केली. गांधींनी मग म्हटले की, तडजोड करावी लागून सर्व मागण्या मान्य झाल्या नसल्या तरी शेतक-यांना काही लाभ झाला आणि मुख्य म्हणजे गुजरातचा शेतकरी यामुळे जागा झाला.