अभिनंदन ग्रंथ -अस्पृश्य व नवदीक्षित बौद्ध -1

गुलामी पद्धतीची महार वतनदारी नष्ट केली

ना. यशवंतरावजी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर गुलामी पद्धतीची महार वतनी पद्धति नष्ट करणारा "Bombay Inferior village watan's Abolition Act 1958" कायदा त्यांनी केला. या वतनी पद्धतीमुळे पूर्वाश्रमींच्या महार समाजाचा सर्व दृष्टीने अध:पात झालेला होता. त्यामुळे त्यांचे जीवनच सर्वस्वी गुलामप्रमाणे बनलेलें होतें. महार वतनदारांच्या कामाची यादी निश्चित नव्हती. महार हा हरकामी, सांगकामी वतनी गावकारगार होता. त्याला कोणीहि काम सांगावें, कांहिहि काम सांगावें, अशीच दैनंदिन व्यवहारांत वस्तुस्थिति होती.

महार वतनदाराच्या घरच्या किती माणसांनी व कोणी काम करावें हें निश्चित नव्हतें. त्याच्या घरांत असेल त्याने, मग तो गडी असो वा बाई असो, म्हातारा असो वा तरणा असो, मुलगी असो वा सून असो, सांगेल तें काम, अंगावर पडेल तें काम केलेंच पाहिजे, असा महारांच्या वतनी कामाचा दंडक असे.

महार वतनदाराच्या कामाचे तास नियमित नव्हते. महाराने किती तास, किती वेळ काम करावें याला प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारांत कांही नियमच नव्हता. सांगेल त्यावेळीं, सांगेल त्या ठिकाणीं महाराने कामासाठी हजर राहिलें पाहिजे. मग ऊन असो वा पाऊस असो ! थंडी असो वा वारा असो ! दिवस असो वा रात्र असो ! महार आजारी असो वा इतर दु:खांत असो, चोवीस घंटे गुलामाप्रमाणे महार गावकामगाराच्या गळ्याभोवती वतनी कामाचा फास होता.

महार गावकामगार हा दोन घरचा चाकर होता. महार हा एकीकडे सरकारचा व दुसरीकडे रयतेचा चाकर असे. एक महार व त्याचे अनेक धनी असाच हा वेगळा प्रकार होता. एक मालक व त्याचे अनेक मजूर असतात, पण त्याच्या उलट हा प्रकार होता. त्यामुळेच महाराला अनेक धन्यांच्या दारीं सेवाचाकरी बजावावी लागत असे.

-आणि या सर्व कामासाठी वेतन तरी काय होतें...? तर महारांना 'महारकी' नांवाची जमीन असे. टीचभर रानाची ही 'महारकी' पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पावसाने जर का डोळे वटारले तर या जमिनींत कांहीच सापडत नसे. त्यांतच वतनी हक्काने रयतेकडून मिळणारे बलुते चालू काळांत मिळणें अवघड झालें होते.

असा हा वतनी गावकामगार महारांचा प्रश्न होता. या वतनी कामामुळेच महारांचे जीवन सर्वस्वी गुलामाप्रमाणे झालें होतें. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'महार वतन म्हणजे विसाव्या शतकांतील गुलामगिरी आहे' असें म्हणत होते. ही वतन गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी १९२२ सालीं व नंतर १९३७ सालीं कायदेमंडळांत 'बिल' आणलें होतें. परंतु राज्यकर्त्या पक्षांनी तें फेटाळून लावलें. ही वतनी गुलामगिरी नष्ट करण्यासठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेलीं तीस वर्षे सर्व दृष्टीनी सतत प्रयत्न झाले; पण सत्ताधीशांनी या महार-वतनी प्रश्नाचें मूलभूत महत्त्व कधी जाणून घेतले नाही. ही विसाव्या शतकांतील महार-वतनी गुलामगिरी शेवटीं मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हण यांनी नष्ट केली.

ना. यशवंतरावजी यांचे जीवन खेड्यांत गेल्याने त्यांना 'महार-वतनी गुलामी पद्धतीच्या' कामाची पूर्ण कल्पना असणें स्वाभाविक आहे. 'महार-वतन' हें या समाजाच्या प्रगतीच्या मार्गांतील मोठी धोंड आहे याची जाणीव ना. यशवंतरावजींच्या पुरोगामी मनाला असली पाहिजे. म्हणूनच मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हातांत सत्ता येतांच त्यांनी 'Bombay Inferier Village Watan's Abolition Act 1958' हा कायदा करून पूर्वाश्रमीच्या महार समाजाला वतनी गुलामगिरीच्या दावणीतून मुक्त केलें; व त्याबरोबर 'वतनी जमिनी' पूर्णशेतपट्टीच्या तिप्पट किंमत घेऊन वहिवाटदार मालकांना मालकी हक्काने परत ताब्यांत दिल्या. ना. यशवंतरावजी यांनी महाराष्ट्रांतील एका मोठ्या वर्गाला विसाव्या शतकांतील गुलामगिरींतून मुक्त केलें, हें ऐतिहासिक स्वरुपाचें चिरस्मरणीय असें मूलगामी कार्य होय. याबद्दल त्यांना कोणीहि धन्यवादच देईल. ना. यशवंतरावजी यांच्या पुरोगामी विचाराला, मध्ययुगी-सरंजामदारी पद्धतीच्या पोटी जन्मास आलेली 'वतनी पद्धती'च पटणें शक्य नव्हतें आणि जनतेच्या खालच्या थरांतून निर्माण झालेल्या या नेत्याच्या विशाल दृष्टीला 'महार वतनी पद्धती' मान्य होणे कदापि शक्य नव्हतें. मुख्यमंत्री या नात्याने ना. यशवंतरावजी व त्यांच्या पूर्वीचे मुख्यमंत्री यांच्या विचारांतील व दृष्टींतील मुलभूत फरक येथे स्पष्टपणे जाणवतो. यांतच त्यांचा थोरपणा सामावलेला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org