अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 8

यशवंतरावांची कार्यपद्धति

एक गणित सुटलें की लगेच दुसरें हाती घ्यावे, ही यशवंतरावांची काम करण्याची पद्धत आहे. एकाच वेळीं अन्य सा-या गोष्टींच्या विचारांची ते गर्दी करीत नाहीत. एक समस्या व्यवस्थित सुटली की मग आपलें डोकें दुस-या समस्येकडे लावावें, असा त्यांचा परिपाठ आहे. 'एका पावलाचा मार्ग जरी पुढे दिसला तरी मला पुरे आहे' असें गांधीजी म्हणत. (One step is enough for me )  याप्रमाणे एकदा आपलें पहिलें पाऊल ठाम रोवल्यावरच दुसरें पाऊल यशवंतराव टाकीत असतात. समोर असलेल्या बहुविध समस्यांनी ते गोंधळून जात नाहीत. एखादा पूल ओलांडावयाचा असल्यास तो कसा ओलांडता येईल याची आधीपासून चिंता न करतां प्रथम त्या पुलापर्यंत कसें पोचता येईल याचा विचार ते सर्वप्रथम करतात. एकामागून दुसरा अशी क्रमवारी ते लावीत असतात व कोणता प्रश्न केव्हा हातीं घ्यावा हेंहि ठरवून ठेवतात.

दोन राज्यें अलग करण्याच्या निर्णयावर वर्किग कमिटीचे शिक्का मार्तब करण्याची वेळ आली. पंडित गोविंद वल्लम पंतांना महाराष्ट्र राज्य झाल्यावरहि तें स्थिर व मजबूत राहील किंवा नाही याची शंका आली. होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यांतील काँग्रेसचें पक्षबल एकाने त्यावेळी कमी दिसलें. त्यांत विदर्भांतील राजिनामे देणा-या कांही आमदारांसंबंधीची साशंकता ! पंतांनी यशवंतरावाना विचारलें, "यशवंतराव, आगे क्या परिस्थिती रहेगी ? कितने लोग काँग्रेसपक्ष में आ रहे है ?" यशवंतरावांनी हलक्या आवाजांत उत्तर दिलें होतें की, "आज तर मजजवळ सात जणांबद्दलचीच माहिती आहे." यानंतर मोरारजींभाईंच्या घरी आम्ही व डॉ खेडकर वगैरे बसलों असतांना यशवंतरावांनी उद्गार काढले होते की, "महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर दोन महिन्यांच्या अवधींत काँग्रेस पक्ष जास्त संघटित आणि बलशाली न होता आज आहे तसाच राहील,तर मी बाजूला होऊन जाईन, राज्याचीं सुत्रे सोडन देईन." बारामती येथील लोकसभेच्या निवडणुकींत काँग्रेसला प्रचंड यश मिळाल्यामुळे विचाराचें व प्रचाराचें लोण घरांघरांत जाऊन पोचलें. जनतेचें मत बदललें व तें काँग्रेसच्या बाजूला झुकलें. भावी महाराष्ट्राच्या कल्याणाच्या दृष्टीने विरोधी पक्षांतील बरेचसे आमदार एकामागून एक काँग्रेस पक्षांत आले. यशवंतराव निर्धास्त झाले. यानंतर राज्याच्या नामाभिधानाचा प्रश्न समोर आला. राज्यविसर्जनाचा प्रश्न चर्चिला जातांना राज्याला कोणतें नांव द्यावयाचें याला यशवंतरावांनी प्राधान्य दिलें नाही. मधून मधून त्यांना जे विचारीत त्यांना ते सांगत, " त्यांत काय आहे? आपण सारे बसून सा-यांच्या विचाराने नांव ठरवूं !" ते योग्य प्रसंगाची वाट पाहात होते. अमुकच नांव द्यावें म्हणून आमदारांत मतभेद होता जरूर ! 'मुंबई राज्य', 'महाराष्ट्र राज्य', 'मुंबई-महाराष्ट्र राज्य' अशी तीन नांवे चर्चेत होती. काँग्रेस पक्षांतील निरनिराळ्या मंडळींशी, एवढेंच नव्हे तर विरोधी पक्षांच्या मंडळींशीहि अलग विचारविनिमय करून शेवटी 'महाराष्ट्र राज्य' हेंच नांव यशवंतरावांनी पसंत केलें. व मतभेदाला वाव ठेवला नाही. यशवंतरावांची काम करण्याची ही खुबी आहे की, ते सर्वांचे शांतपणे ऐकून घेतील; पण शेवटी स्वतंत्र बुद्धीने निर्णय घेतील. त्यांचा केवढा दूरदर्शीपणाचा निर्णय होता हा ! मद्रास प्रांत होऊन किती तरी वर्षे झालीं, पण आज मद्रास प्रांताच्या ऐवजी 'तामीलनाड' हें नांव असावें म्हणून तेथे चळवळ सुरु झाली आहे. 'महाराष्ट्रा'च्या ऐवजी 'मुंबई' हें नांव ठेवलें गेलें असतें तर विरोधी पक्षांच्या हाती काँग्रेसच्या विरिद्ध चळवळीचें रान पेटविण्याकरिता विस्तव देण्यासारखे झालें असतें.

शासन व काँग्रेससंघटण

यशवंतरावजींच्या प्रयत्नाने व दूरदर्शीपणाने शासनाचे व काँग्रेस संघटनेचे संबंध महाराष्ट्रांत फार चांगले असून त्यांत एकजिनसीपणा येऊं लागला आहे. काँग्रेस संघटनेच्या प्रमुख कामाकरितां आवश्यक तेवढा वेळ ते राखून ठेवतात. परंतु जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते परस्परांतील तंटेबखेडे व मतभेदाचे प्रश्न घेऊन त्यांचेकडे येतात व त्यांचेकडून निर्णयाची अपेक्षा करतात तेव्हां ते दु:खी होतात. तडजोडीनें, समन्वयानें आपापसांतील मतभेद मिटावेत अशी त्यांची मनापासून इच्छा असते. असलें सलोख्याचें वातावरण निर्माण करणा-यांना त्यांची पुरेपूर मदत असतें. या दृष्टीनें स्थानिक भानगडीचे प्रश्न स्थानिक मंडळींनीच आपसांत बसून सोडवावेत किंवा तेथेच कोणाच्या मध्यस्थीनें सोडवावेत असें त्यांना मनापासून वाटतें. स्थानिक प्रश्नांत किंवा भानगडींत त्यांना कोणीहि ओढूं नये, त्यांचा एक न् एक क्षण महत्त्वाचा मानून तो महाराष्ट्र राज्य मजबूत करण्यांत खर्ची व्हावा असें प्रत्येकाने ठरविलें पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org