अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 2

ज्यांच्यावर काँग्रेस संघटण व सार्वजनिक कार्यकर्ते सांभाळण्याची जबाबदारी नव्हती. ज्यांना जनतासंपर्क साधावा लागत नसे, सार्वजनिक व विविध कार्यक्रमांचा आणि व्याख्यानांचा तगादा ज्यांच्यामागे राहत नसे, निरनिराळ्या प्रकारच्या जन आंदोलनांना तोंड देण्याचा ज्यांना प्रसंग पडत नसे, व ज्यांच्या कामाची मर्यादा प्रामुख्याने आपल्या मंत्रिपदाच्या कामापुरतीच मर्यादित होती, त्या डॉ. जॉन मथाईंना असें म्हणण्याचा प्रसंग आला. त्या मानाने यशवंतरावजींचया कामाचा व्याप फारच मोठा आहे. काँग्रेस पक्ष, संघटना, विधानसभा पक्ष, सरकारी कामें, सार्वजनिक आणि इतर विविध कार्यक्रम व व्याख्यानांचा तगादा यामुळे आतां त्यांना इंग्रजी व मराठी भाषेंतील नवीन उत्तोमोत्तम ग्रंथ घेऊन त्यांचे मनन व चिंतन करावयास वेळ काढतां येत नाही. म्हणूनच त्यांना स्वत:बाबत तशी शंका आली व ती त्यांनी शास्त्रीजींजवळ बोलून दाखविली की, 'अशा परिस्थितींत माझ्या बुद्धीवर पुढे गंज तर चढणार नाही ना?"

यशवंतरावजींना गेल्या ४-५ वर्षांत किती तरी तुफान-झंझावाती राजकीय आवर्तांतून जावें लागलें. केवढा मानसिक ताण त्यांना सहन करावा लागला असेल ! ही तारेवरची कसरत होती. आजहि नवमहाराष्ट्राची बांधणी करतांना त्यांनी स्वत:ला सतत वाहत्या कामाच्या प्रवाहांत 'रामभरोसे' झोकून दिलें आहे. भेटी-गाठी, मुलाखती-चर्चा, सरकारी कामकाज, काँग्रेस संघटना, भाषणें, असा मोठा कार्याचा डोंगर असतांना त्यांना कंटाळलेले किंवा वैतागलेले मीं पाहिलें नाही. सदा हंसतमुख राहतात. मनस्तापाचे कांही प्रसंग येतात जरूर ! परंतु प्रसंग तो ओळखावा । राग निपटोनी काढावा ।। या समथोंक्तिनुसार ते अशा प्रसंगी संयम ठेवून मनाचा तोल जाऊं देत नाहीत. यशवंतरावांना ज्या परिस्तितींतून जावें लागलें व आज जावें लागत आहे त्या परिस्थितींतून इतर दुस-या कोणाहि मंत्रिमंहाशयांना जावें लागलें असतें तर त्यांना वेड लागल्यावाचून राहिलें नसतें, असें मला वाटतें.

कल्पिलें तें मिळालें –

१९४८ मध्ये मी नागपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असतांना ता. २ ऑक्टोबर १९४८ ला गांधी जंयतीच्या निमित्ताने, दोनहि हात जोडून नमस्कार करीत असलेले गांधीजीचें मोठे फोटो मी छापवून खेडोपाडी पोचविले होते. त्या फोटोखाली गांधीजींना प्रार्थून आश्वासन देणारी खालील वाक्यें लिहिलीं होती:-

" बापू, किसानालाहि राजसिंहासनावर चढविण्याची तुझी महत्वाकांक्षा आम्ही आपल्या रक्ताचें पाणी आणि हाडांची काडें करूनहि पूर्ण करूंच. हाच तुला आमचा प्रतिप्रणाम. सामाजिक, आर्थिक व सांप्रदायिक विषमतेच्या प्रतिकारार्थ तूं स्वत:चें केलेलें बलिदान आम्हांला नेहमीच मार्गदर्शक राहील."

प्रस्तुत लेख लिहितांना वरील वाक्यांचे मला स्मरण झालें. यशवंतराजींचे चित्र समोर आलें व माझें मत झालें की, गांधीजींची महत्त्वाकांक्षा महाराष्ट्रापुरती तरी खरी ठरली. कारण, एका गरीब शेतक-याच्या पोटी जन्माला आलेला एक सुजाण मुलगा आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्य मंत्रिपदावर आरुढ झाला आहे.

विद्यार्थी दशेंत असतांना ज्याला शाळेची फी भरतां येत नव्हती, अंगांत कोट व पायांत चप्पल घालतां येणें शक्य नव्हतें, ज्याच्या प्रिय मातेला कष्ट-मोलमजुरी करणें भाग पडलें – अशा हलाखीच्या परिस्थितींत दिवस काढलेला हा 'यशवंत' पुढे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होईल असें कोणाच्या स्वप्नांत देखील आलें नव्हतें. घरची एवढी वाईट परिस्थिती असतांना देखील भविष्याची पर्वा न करतां यशवंतरावांनी १९३० सालच्या गांधीप्रणीत असहकारितेच्या चळवळींत भाग घेतला. गांधीजींच्या राजकीय चळवळींत सामील होणें म्हणजे सर्व प्रकारच्या संकटांना कवटाळणें होतें, फकिरीशी दोस्ताना करणें होतें.

कबीरा खडा बाजार में लें लुकाटी हाथ ।
जो घर फुंके आपनो वे चले हमारे साथ ।।

असा गांधीजींचा उपदेश होता. साबरमती आश्रमाच्या एका बाजूला स्मशान होतें व दुस-या बाजूला तुरुंग होता. गांधीजी आश्रमीय मंडळींना सांगत – स्वराज्य हवें असल्यास या दोन गोष्टींची भीति तुम्हांला सोडावी लागेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org