श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर
- मा. सां. कन्नमवार
२६ फेब्रुवारी १९६१ – रविवारचा दिवस ! यशवंतराव अहमदाबादच्या दौ-यावर जावयाला निघतांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांना विचारूं लागले, "काय यशवंतराव, मी परवां दिलेली दोन इंग्रजी पुस्तकें आप ण वाचलींत ना?" "नाही हो" यशवंतराव म्हणाले, "मला वेळ मुळीं मिळालाचनाही. अलीकडे कामाचा एवढा व्याप वाढला आहे की, पुस्तकें वाचायला वेळ निघतच नाही. अशीच परिस्थिति राहिल्यास मला वाटतें कीं, सहा वर्षानंतर मी अज्ञानी होऊन जाईन."
(I may become ignorant in six years )
यशवंतरावांची परिस्थिती आज ही आहे की, लोक झोपूं देतील तेव्हां त्यांनी झोपावें, लोक जेवूं देतील तेव्हां त्यांनी जेवावें. थोड्या दिवसांपूर्वी त्यांची धर्मपत्नी सौ. वेणूताई यांची प्रकृति विशेष बिघडली होती. घरींच उपचार चालू होता. रात्रीं ९ चा सुमार होता. ९।। वाजतां असेंब्लीतींल काँग्रेस आमदारांची पक्षसभा व्हावयाची होती. शिवाय कांही माणसें भेटावयाचीं राहून गेलीं होती. त्यावेळीं त्यांना आठवण झाली आपल्या रुग्ण पत्नीची ! ते लगेच मला म्हणाले, " कन्नमवारजी, तुम्ही आजची ही पक्षसभा सांभाळा. मी आत्ताच घरीं जातों. कारण, आज दिवसभरांत पांच मिनिटंदेखील माझ्या पत्नीचा-कुशल समाचार घ्यावयाला वेळ मिळाला नाही. ती आतां झोपेल. नऊ वाजल्यानंतर ती जागत नाही. मला गेलं पाहिजे."
मी चटकन् म्हणालो, " आपण आतां सारीं कामें बाजूला सारून ताबडतोब अवश्य घरी जां." ते लगेच गेले. पण कामाबद्दल आस्था व चिंता दाखविणारे, कर्तव्य व अंत:करणाची ओढ या कात्रींत सापडलेले आणि 'मी काम सांभाळतो, तुम्ही जा,' असें म्हणतांच समाधान व विश्वास दर्शविणारे सर्व भाव त्या क्षणमात्रांत त्यांच्या मुद्रेवर मला दिसून आले. ती त्या दिवशींची त्यांची मुद्रा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेली.
नागपूरचें असेंब्ली अधिवेशन संपत येऊं लागलें होतें. सर्व महिला आमदारांनी आपल्या निवासस्थानीं यशवंतरावांना जेवावयाला बोलाविलें होतें. हें जेवण दुपारी १२ वाजतां ठेवलें होतें. यशवंतरावांचे काम त्या दिवशी १२।। वाजेपर्यंत उरकूं शकलें नाहीं. त्यांना कांही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरें व एक महत्त्वाचें निवेदन विधान सभेंत द्यावयाचें होतें. मी म्हणालों, " आपण जेवण आटोपून १ वाजेपर्यंत असेंब्लींत येऊं कसे शकाल? जेवायच्या कार्यक्रमाला न गेल्यास काय हरकत आहे?" नाही, नाही, हा महिलांचा कार्यक्रम आहे. मला त्यांचा मान राखलाच पाहिजे. मी जातों आणि लगेच येतों वेळेवर." यशवंतराव म्हणाले. त्याप्रमाणे ते १ वाजावयाला ३ मिनिटें कमी असतांना विधान सभेंत येऊन पोचले. तेव्हां मी त्यांना विचारलें, "आपलें जेवण एवढ्या लवकर आटोपलें कसें?" ते म्हणाले, "मी महिलांच्या बरोबर पाटावर बसलों. घाईघाईनें वरवर थोडा भात घेतला आणि त्यांची क्षमा मागून लगेच येथे आलों. " जेवणाच्या बाबतींत त्यांचे नेहमी असेंच घडत असतें. समाधानानें जेवण करणें, वेळेवर जेवणें हें त्यांना कामाच्या गर्दीमुळें जमतच नाही. अलीकडे तर ते सचिवालयांत व विधान सभा अधिवेशनांच्या वेळीं विधान सभा भवनांतील आपल्या कार्यालयांत जेव्हा वेळ मिळेल तेव्हां जेवण करीत असतात.
सा-या कर्तव्यशील मंत्र्यांची सुखदु:खे त्यांचीं त्यांनाच माहीत ! भारताचे माजी अर्थमंत्री डॉ. मथाई यांच्या मुंबई नभोवाणीवर झालेल्या एका भाषणांत त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या वेळच्या अनुभवाचा उल्लेख केला होता. तो या प्रसंगी येथे देणें उचितच होईल. ते आपल्या भाषणांत म्हणाले होते, "स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळांत मंत्री म्हणून मी चार वर्षे काढली. काम फार महत्त्वाचें आणि जबाबदारीचें होतें आणि मला सांगायला खेद वाटतो कीं, त्या काळात फारच थोड्या प्रसंगांत मी आनंदी राहूं शकलों असेन. मंत्रिमंडळांतील मंत्र्यांच्या वाट्याला येणारें वैभव मोठे असलें तरी त्यांना स्वत:चें असें जीवन जगणें अशक्य होतें. निवांत असा वेळ त्यांना मुळी मिळतच नाही. माझ्या आयुष्यांतला असा कोणताहि अन्य काळ मला आठवत नाही की, ज्या काळांत मी मंत्री असतांनाच्या काळाइतकें कमी वाचन केलें असेल आणि तें वाचनहि माझ्याच भाषणांची कात्रणें वाचण्यापुरतेंच मर्यादित असे. यापेक्षा आखी कंटाळवाणें जीवन असें कोणतें असेल?"