सत्तारुढ पक्ष व विरोधी पक्ष
- पां. वा. गाडगीळ
सत्तारुढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे लोकशाहींतील संबंध, या प्रश्नाचा नजीकच्या दृष्टीने व दूरच्या दृष्टीने असा दुहेरी विचार करावा लागतो. तसेंच तात्त्विक आणि व्यावहारिक अशाहि दोन्ही दृष्टींनी या प्रश्नाचा विचार करावा लागतो. लोकशाही ही मानव समाजाची अगदी नैसर्गिक राजव्यवस्था आहे अथवा ती सर्वोत्तम व्यवस्था आहे अशीं जीं सिद्धान्तसूचक विधाने केलीं जातात ती खरी नव्हेत. सामान्यत: शंभरांच्या समूहांतील ५१ चा निर्णय बाकीच्या ४९ नीं मानावा हा लोकशाहीचा तांत्रिक संकेत आहे. पण ४९ वा जर अशी वाटली की, आपलेंच मत निश्चित बरोबर व संशयाचीत आहे आणि - मतवाले हे मूर्ख आहेत, त्यांचे मत हें अनर्थकारी आहे म्हणून शारीर बलोपयोगाने ५१ चें मत मोडून काढलें पाहिजे, जर तेथे लोकशाही संपुष्टांतच येते. संख्येने जे जास्त त्यांचे म्हणणे बरोबर व संस्थेचे कमी त्यांचे म्हणणे चूक असा सिद्दान्त अशास्त्रीयहि आहे. ज्या अल्पसंख्यांना शारीर बलाधिक्य आहे व आपल्या मताच्या सत्तेबद्दल संपूर्ण विश्वास आहे त्यांनी सत्यमताच्या बजावणीसाठी शारीरबळ न वापरणें हा अधर्म होय, असेंहि कोणी म्हणूं शकेल. उलट, बहुतमत वाल्यांचेंच मत ग्राह्य असें एकदा ठरलें म्हणजे शारीर बलोपासना न करता बहुसंख्य हे निर्बलतेनें व निर्बुद्धपणें जगाचा व्यवहार करतील बहुसंख्य हे निर्बलतेने व निर्बुद्धपणे जगाचा व्यवहार करतील अथवा सत्य संशोधन न करतां अथवा उलट अल्पसंख्यांना क्रूरपणे वागवतील. हेंहि अशक्य नाही. बहुमताची सत्ता हे बिकालबाधित सत्य होय अथवा अशी सत्ता लोकल्याणकारी असतेच असा जो एक सुप्त समज पुष्कळांचा असतो तो चुकीचा आहे एवढें दाखविण्यासाठी वरील मुद्दे मांडले आहेत.
तरमग बहुमताची सत्ता ती लोकशाही हें मत का रुंढ झालें, त्याला अपवाद आहेत का, ते कोणते, हा प्रश्न ब-याच दीर्घ लेखनानें चर्चिण्यासारखा आहे. ती सर्व चर्चा येथे न करतां लोकशाही अस्तित्वांतयावी हें मत मान्य करूनच मी पुढे बोलतों. लोकशाही मान्य करण्यासाठी पहिली अवश्य गोष्ट आहे ती ही की, जे ( समजा) शंभर घटक लोकशाही संघटनेचे असतील त्यांच्यांत बहुमताचा निर्णय मान्य करायचा, या मुद्दावर नुसतेंच बहुमत नव्हे, तर एकमतच हवें. ब्रिट्रिश पार्लमेंटांत प्रत्येक निर्णय बहुमताने ठरवितात. याचा अर्थ अल्पमतवाल्याना बहुमताचें म्हणणें चुकीचे वाटले तरी ते त्याविरुदध शारीरबल न वापरतां बहुमतापुढे मान तुकवितात. म्हणज अल्पमतवाल्यांनी सुद्धा बहुमताचा निर्णय हाच शिरसावंध मानावा, हें मत बहुमतवाल्यांच्या इतकेंच अल्पमतवाल्यांना मान्य असतें. ज्या देशांत बहुमतवाल्यांच्या हातीं सत्ता असेल व अल्पमतवाले म्हणजे विरोधी पक्ष हे उघड उघड कम्युनिस्ट अथवा फॅसिस्ट असतील, अशा देशांत लोकशाही शाश्वत राहील अशी खात्री देतां येणार नाही. कारण, त्या अल्पसंख्य विरोधकांत शारीरबळ कमी असेपर्यंत ते बहुमतापुढे मान तुकवितील शारीरबळ वाढले की बंड करणें हें त्यांच्या तत्त्वाला सुसंगतच आहे. तसेंच कम्युनिस्ट व फॅमिस्ट हे बहुमतांत आले तर अल्पमतवाल्यांना कायमचे नेस्तनाबूद करण्यासाठी ते आपल्या सर्व बळाचा उपयोग करतील हेंहि त्यांच्या सिद्धान्ताशी सुसंगतच आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, बहुमतवाल्यांचे राज्य असावें या सिद्धान्तावर निष्ठा असणा-या एकजिनसी समाजांतच लोकशाही सुरक्षित राहते. असा एकजिनसी निष्ठेचा समा नसेल तेथे लोकशाही डळमळीतच राहणार.