अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री -1

आमच्या या नव्या गटाला क्रांतिकारक विचारसरणीचे शिक्षण एम् एन् रॉय यांच्या लिखाणांतून मिळाले होतें. भारतीय राजकारण व समाजकारण यांची मार्क्सवादी मीमांसा एम्. एन्. रॉय यांच्यापासून हा गट शिकला होता. सातारा जिल्हा काँग्रेसने जिह्याच्या राजकीय परिषदेचे अधिवेशन एम्. एन्. रॉय यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव येथे १९३७ सालीं भरविलें. हें अधिवेशन जुन्या गटाने उधळून लावलें. पुण्याहून मुद्दाम संदेश पाठवून श्री. नाना पाटील व त्यांचे कांही सवंगडी यांना हाती धरून, ही परिषद उजव्या गटानें मोंडली. त्याच दिवश रात्री एक खाजगी जागेंत एम्. एन्. रॉय यांचेही चर्चा करण्याकरिता शे-दीडशे कार्यकर्ते जमले होते. त्या चर्चेत श्री. चव्हाण यांनी प्रामुख्याने भाग घेतला होता. श्री. चव्हाण यांनी भारतीय सामाजिक क्रांतींतील कित्तानांचे स्थान आणि राजकीय क्रांतीचे तंत्र या विषयावर रॉय यांच्याशी सविस्तर खल केला. श्री. चव्हाण यांच्या विचारांची चमक पाहून रॉय यांना विशेष कौतुक वाटलें.

आम्ही एकमेकांपासून दूर गेलो.

१९४० साल म्हणजे दुस-या जागतिक महायुद्धाचा प्रारंभकाल होय. जागतिक लोकशाहीचें संरक्षण झालें तरच वसाहतींचा व विशेषत: भारताचा स्वातंत्र्यसंग्राम सफल होईल. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य हा लढा आता महत्त्वाचा राहिला नाही. तो जिंकण्याकरिता प्रथम जागतिक लोकशाहीचा लढा जिंकला पाहिजे, असा विचार एम्. एन्. रॉय यांनी मांडला. ब्रिटिश साम्राज्याशाहीचा आर्थिक पाया दुस-या महायुद्धांत पूर्ण खतम होऊन जाईल; भारत मुक्त होण्यास नंतर अधिक अनुकूल परिस्थिती उत्पन्न होईल, त्याची चिंता आता यावेळीं नको; असें रॉय मोठ्या भविष्यवाद्याच्या आत्मविश्वासाने प्रतिपादूं लागले. मला ही रॉय यांची मीमांसा पूर्ण मान्य झाली. परंतु भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वाला हा विचार मानवला नाही वा मान्य झाला नाही. या समयी मी व माझे अेक राजकीय सहकारी मौलिक मतभेद होऊन एम् एन् रॉय यांचेबरोबर काँग्रेसमधून बाहेर पडलो; किंबहुना आम्हास बाहेर पडणें भाग पडलें. श्री. यशवंतराव चव्हाण हेच यास अपवादभूत ठरले. त्यांचे काँग्रेस संघटनेवरील प्रेम फार खोल होते. नव्या उमेदिंत निर्माण झालेलें तें प्रेम होतें. त्यांच्या प्रेमाचा विजय झाला मी त्यांच्याशी पुष्कळ विचारविनिमय केला. त्यांनी त्याबद्दल वाद न घालतांच मतभेद व्यक्त केला. कारण, ते माझ्याशी कधीच वाद घालीत नसत व आजपर्यंतहि त्यांनी माझ्याशी कधी वाद घातला नाही. त्यावेळी वाद न घालतां आम्ही एकमेकांपासून राजकीय दृष्ट्या विभूक्त झालो व एकमेकांपासून खूप दूर गेलो!

दुसरे महायुद्ध समाप्त झाले. जुन्या भारतीय राज्याच्या कायद्याखालीच प्रांतीय व क्रेदीय विधिमंडळाच्या निवडणुकींची धामधूम सुरू झाली. या धामधुमींत रॉय यांच्या रॅडिकल पक्षातर्फे कांही उमेदवार उभे केले होते. निवडणूक प्रचारांत त्या प्रसंगी सातारा रोड स्टेशनवर माझी व श्री. चव्हाण यांची अनेक वर्षानंतर गाठ पडली. श्री. भाऊसाहेब हिरे त्यावेळी महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे नेते होते, तेहि त्यांच्याबरोबर होते. या भेटींत शिष्टाचाराची सभ्यता होती; परंतु मन मोकळेपणा नव्हता. या निवडणुकींत आमचा रॅडिकल पक्ष पूर्ण हरला व त्यानंतर १९४८ सालीं या पक्षाचें आम्ही विसर्जन केले.

काँग्रेसमध्ये समाजवादी विचाराचा प्रभाव हळूहळू वाढूं लागला, परंतु त्याला त्यांत स्थिरासन लाभलें नव्हतें. कारण उजव्या गटाची छाप कमी झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसमधील समाजवादी गटास काँग्रेसमधून बाहेर पडावें लागलें. भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर लोकशाहीक्रांतीच्या दृष्टीने फार महत्त्वाची परिवर्तनें घडून येऊं लागली. ज्या प्रकारच्या राजकीय परिवर्तनांना पाश्चात्य लोकशाही राष्ट्रांमध्ये अनेक शतके वाट पाहावी लागली, दीर्घ प्रयत्न व संघर्ष करावे लागले, त्या प्रकारची परिवर्तनें भारतीय राज्यघटनेने क्षणाचाहि विलंब न लावतां घडवून आणलीं. मी लोकशाहीचें तत्त्वज्ञान व नवमानवतावाद यांचा पुरस्कार करीत महाराष्ट्रांत फिरत होतों. १९४० पासून मी काँग्रेसचा कडक टीकाकार बनलो होतों. माझ्या टीकेंत मूलभूत सिद्धांतांचा अभिनिवेश होता. त्यामुळे काँग्रेसच्या नव्या विचारसरणीकडे व ध्येयवादाकडे माझी सहानुभूतीची नजर वळूं लागली. हें ध्यानांत घेऊन काँग्रेसमधील माझ्या अनेक मित्रांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून हेच विचार बोला, असें मला स्नेहपूर्वक आवाहन दिलें. मी पडत्या फळाची आज्ञा समजून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५२ साली महाराष्ट्र प्रांतिकचा सदस्य म्हणून सातारा जिल्ह्यांतील मित्रांनी मला निवडून आणलें.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org